केळी उत्पादकांना 100 कोटींचा फटका

residentional photo
residentional photo

रावेर : जिल्ह्यातील तापमानाचा पारा मागील आठवड्यापासून 43 अंशांपर्यंत पोचल्याने कापणीवर आलेल्या केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या तीव्र उन्हामुळे केळी घडाचे वजन, गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत असून, हेक्‍टरी सरासरी दीड लाख रुपयांचे नुकसान होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. केळी हे उष्ण कटिबंधातील पीक असले, तरी त्याची वाढ 37-38 डिग्री सेल्सिअस तापमानात चांगली होते. मात्र, तापमान चळिशीपार गेल्यावर पिकाचे मोठे नुकसान होते. 

गेल्या आठवड्यापासून तापमानाने 43 चा आकडा ओलांडला असून, येत्या आठवड्यात 24 ते 26 एप्रिल दरम्यान ते 48 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज अनेक वेबसाइटवर वर्तविण्यात आला आहे. ही सर्वच केळी बागांसाठी धोक्‍याची घंटा आहे. 

तापमानाचा परिणाम 
उच्च तापमानात केळीची पाने पिवळी पडतात, वाळतात, घड सटकतात, खोड मध्येच वाकून कोसळते. झाड उभेच राहिले, तरीही त्यावरील केळीच्या घडाच्या दर्जावर विपरीत परिणाम होतो. अशा घडाची चमक निघून जाते, केळीची गोलाई, लांबी (वाधा) यावर परिणाम होतो. अशा वेळेस झाडास फक्त पाणी दिले गेल्यास घडाचे वजन 4-5 किलोने कमी होते. दर्जा घसरून वजनही कमी झाल्याने प्रतिघड 40 ते 50 रुपये म्हणजे एकूण 20 टक्के नुकसान होते. अशा केळीला क्विंटलला दोन-तीनशे रुपये कमी भाव मिळतो. एका हेक्‍टरमध्ये किमान 3600 झाडे लागवड असेल, तर हेक्‍टरी सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान होते. 

पाणी मर्यादितच हवे 
तापमान वाढले, की शेतकरी पाणीपुरवठा वाढवितात. केळीला उन्हाळ्यात प्रति खोड 25-30 लिटर पाणी पुरते. काही शेतकरी 50-60 लिटर पाणी देतात. या अतिरिक्त पाण्यामुळे केळीच्या खोडाच्या मुळांजवळील सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीत खालच्या बाजूला वाहून जातात. त्यामुळे केळीला मर्यादित प्रमाणात पाणी देण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. 

अन्नद्रव्ये देण्याची शिफारस 
तापमान 40-41 डिग्री सेल्सिअस पार झाल्यानंतर केळीला दर चार दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये देण्याची शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. यात प्रत्येकी हजार खोडांना युरिया अडीच किलो, पोटॅश साडेसहा किलो आणि मॅग्नेशिअम अर्धा किलो द्यायला हवे. तापमान 45 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास पालाशची मात्रा साडेसात, साडेआठ किलो केली, तर वाढलेल्या ऊन आणि तापमानाचा फारसा परिणाम केळीवर होणार नाही, असे जैन इरिगेशनचे कृषितज्ज्ञ राहुल भारंबे यांनी सांगितले. केळीच्या पानांचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी ग्रीन मिऱ्याकल आणि केओलिन स्प्रे करण्याचा उपायही प्रभावी ठरतो. 


7,000 हेक्‍टर 
प्रभावित बागा 
... 
60 ते 65 टन 
सरासरी उत्पन्न 
.... 
10 ते 15 टन 
तापमानामुळे घट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com