श्रीक्षेत्र तरसोद मार्गावर केला "ऑक्‍सिजन पार्क'! 

live photo
live photo

जळगाव : स्वच्छतेचे महाराष्ट्रातील "ब्रॅण्ड ऍम्बॅसडर' बनलेल्या धर्माधिकारी प्रतिष्ठानने अशाच प्रकारच्या सेवाभावातून श्रीक्षेत्र तरसोद येथील रस्त्यावर दुतर्फा शेकडो वृक्ष लावून, त्यांचे संगोपन करून "ऑक्‍सिजन पार्क' विकसित केला आहे. पावसाळ्यात "कॉमन' वाटणारी ही वनराई उन्हाळ्यात गणेशाच्या दर्शनार्थ जाणाऱ्या भाविकांना दिलासा देणारी ठरते. प्रतिष्ठानच्या या कामाचे गणेशभक्तांकडून कौतुक होत आहे. 
जळगावपासून अवघ्या सात- आठ किलोमीटरवर श्रीक्षेत्र तरसोद हे गणपतीचे जागृत देवस्थान असलेले गाव. महामार्गापासून तीन किलोमीटरवर गाव व पुढे सव्वा किलोमीटरवर मंदिर आहे. जळगाव जिल्ह्यातून हजारो भाविक विशेषत: चतुर्थीला मंदिरात जातात. जळगाव, भुसावळ येथून पायी जाणाऱ्या भाविकांची संख्याही बऱ्यापैकी आहे; परंतु या दोन्ही रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे गणेशभक्तांचे प्रचंड हाल होतात. 

वनराईने नटला रस्ता 
रस्त्यांच्या दुरवस्थेचे नकारात्मक चित्र असताना महामार्गापासून गावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा कडुनिंब व अन्य झाडे अगदी रांगेत लागलेली दिसतात. साधारणत: पाच- सात वर्षांची ही झाडे आता बऱ्यापैकी मोठी झाली आहेत. झाडांच्या बुंध्याला रंग दिलेला आणि वनराई नटल्यासारखा हा रस्ता दुतर्फा दिसून येतो. महाराष्ट्रभर आपल्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून स्वच्छता कामाचा आदर्श ठेवणाऱ्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ही रोपे 2013 मध्ये लावली. जवळपास साडेचारशे रोपे लावून ती गेल्या पाच वर्षांत चांगल्याप्रकारे जगविण्यात आली. त्यामुळे आता ती सावली देणारी झाडे बनली आहेत. 

परिसर बनला "ऑक्‍सिजन पार्क' 
चौपदरीकरणात जळगाव- भुसावळदरम्यान महामार्गाच्या दुतर्फा अनेक झाडांची कत्तल झाली. त्याबदल्यात "न्हाई'ने नव्या वृक्षांची लागवड केलेली नाही. त्यामुळे महामार्गावर उन्हाळ्यात वाहनधारकांना प्रचंड त्रास होतो. त्यातच तरसोदकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्याने त्यांना सावलीसाठी निवाराही मिळत नाही, अशी स्थिती या परिसरात झाली होती. मात्र, धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या वृक्षसंवर्धनाच्या कार्याने परिसर "ऑक्‍सिजन पार्क' बनला आहे. त्यामुळे गणेशभक्तांसह तरसोद येथील ग्रामस्थांमधून प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुक होत आहे. 
 
झाडे वाचली पाहिजेत 

तरसोद रस्त्याची दुरवस्था झाल्याने नवीन दीडपदरी रस्ता मंजूर करण्यात आला असून, या कामांतर्गत रस्ता रुंदीकरणात यापैकी काही झाडे कापली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत मोठ्या मेहनतीने जगवलेली ही झाडे न कापता बुंध्यापर्यंत रस्ता रुंदीकरण करावा, अशी मागणी होत आहे. झाडे वाचवूनही रस्ता रुंदीकरण होऊ शकते, अशी भूमिका ग्रामस्थांनी "सकाळ'कडे मांडली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com