टेम्पो ट्रॅव्हल्सला ट्रकची धडक; तीन ठार, पाच जखमी.

आल्हाद जोशी
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

एरंडोल ः भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलमधील तीन जण जागीच ठार झाले. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात आज पहाटे साडेपाचच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एरंडोलपासून पाच किलोमीटर अंतरावरील पातरखेडे गावाजवळील आश्रमशाळेजवळ झाला. अपघातात मयत व जखमी यावल तालुक्‍यातील मोरूल येथे विवाह समारंभाच्या स्वागत समारंभास जात होते. दरम्यान ग्रामीण रुग्णालयात डॉक्‍टर उपलब्ध नसल्यामुळे नागरीकांनी संताप व्यक्त केला. 

ठाणे येथील सय्यद व मलिक परिवारातील सदस्य टेम्पो ट्रॅव्हल्स (क्र- एम.एच. 04 जी.पी.2777) ने मोरूळ (ता.यावल) येथे मुलीच्या विवाहाच्या स्वागत समारंभासाठी जात होते. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास एरंडोलपासून पाच किलोमीटर अंतरावरील पातरखेडे गावाजवळ त्यांच्या वाहनास समोरून येणाऱ्या ट्रक (क्रमांक ओ.आर. 15 एम. 0739) ने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पोमधील आरीफ मेहबूब मलिक (वय 50 रा. मुंब्रा, ठाणे), फिरोजखान रशीद खान (वय 31, रा. जिलानी हाउस राबोडी ठाणे) व ताहिरा नजीर सय्यद (वय 50 रा. राबोडी ठाणे) हे ठार झाले. तर कलीम याकुब मलक (वय 48 रा. ठाणे वेस्ट), स्वालेहा कलीम मलक (वय 43 रा. ठाणे), मकसूदअली सय्यद (वय 44 रा. ठाणे), निसारअली सय्यद सय्यद (वय 72 रा. ठाणे), आलमबी शेख (वय 45 रा. जिलानी हाउस ठाणे) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजेच्या सुमारास अपघात झाल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी होती. 
 
उपजिल्हा रूग्णालयात डॉक्‍टर नाही 
अपघात झाला त्यावेळी सुरगाणा येथील उपनगराध्यक्षा तृप्ती चव्हाण यांचे पती दिपक चव्हाण हे मित्रांसह वाहनाने जळगावकडे जात असतांना त्याना अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी त्वरित वाहनातून उतरून सर्व जखमीना आपल्या गाडीतून एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नसल्याने जखमींवर वेळेवर उपचार होऊ शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. माजी उपनगराध्यक्ष जाहिरोद्दिन शेख यांनी शहरातील डॉक्‍टरांना अपघाताची माहिती दिल्यानंतर डॉ. फरहाज बोहरी, डॉ. मुस्तकीमखान गुलाबखान व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख यांनी त्वरित रुग्णालयात येऊन जखमींवर उपचार केले. सुमारे साडेसातच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पाटील रुग्णालयात आल्यामुळे याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना जाब विचारला. अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांचे जीव वाचू शकले असते; अशी संतप्त प्रतिक्रिया उपस्थित असलेल्या नागरिकांनी व्यक्त केली. 
 
Web Title: marathi news jalgaon tempo traval truck accident 3 daith