ठेवी वसुलीचा कृतीबद्ध आराखडा कागदावरच! 

देविदास वाणी
मंगळवार, 22 जानेवारी 2019

जळगाव ः जिल्ह्यातील विविध पतसंस्थांमध्ये ठेवीदारांच्या अडकलेल्या 510 कोटींच्या ठेवी वसूल करण्यासाठी तत्कालीन सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी ठरवून दिलेला कृतीबद्ध कार्यक्रम थंडबस्त्यात केव्हाच जमा झाला आहे. माजी जिल्हा उपनिबंधकांनी केवळ कागदी घोडे नाचविले. नव्याने बदलून आलेले जिल्हा उपनिबंधकही त्याच वाटेवर जात असल्याचे चित्र जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे आहे. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी 7 जानेवारीस झालेल्या लोकशाही दिनात जिल्हा उपनिबंधकांच्या कामकाजावर ताशेरे ओढले. अद्यापही जिल्हा उपनिबंधकांनी कृतीबद्ध कार्यक्रमासाठी पावले उचलली नाहीत. 

डिसेंबर 2016 ला तत्कालीन सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी 1200 कोटी रुपये वसुलीचा कृती आराखडा (ऍक्‍शन प्लॅन) आखून दिला होता. त्याची अंमलबजावणी जानेवारीपासून सुरू केली असती तर डिसेंबर 2017 पर्यंत या आराखड्यानुसार कर्जाची वसुली झाली असती. जुलै 2017 मध्ये कर्जमाफीच्या अर्जाचा गोंधळ सुरू झाला. तो अद्यापपर्यंतही सुरूच आहे. 
कर्जमाफीचे काम आता जवळपास बंद झाले आहे. मात्र, सहकार विभाग अजूनही ऍक्‍शन प्लॅननुसार काम करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. नवीन जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड आल्यानंतर नव्या जोमाने विभाग काम करून ठेवीदारांना न्याय मिळवून देईल, अशी आशा होती. मात्र, तसे चित्र नसल्याने ठेवीदार संघटना आता विविध प्रकारचे आंदोलन करू लागले आहेत. 

24 कोटींचे वाटप 
आतापर्यंत वसूल रकमेपैकी ठेवीदारांना 24 कोटींचे वाटप झाले आहे. त्यातील ज्येष्ठांच्या वाट्याला किती रक्कम आली, त्याबाबत सहकार विभागाकडे माहिती नाही. पतसंस्थाच वसुलीच्या रकमेतून काही रक्कम ठेवीदारांना देतात. त्यात ज्येष्ठ, महिलांना अग्रक्रमाने ठेवीच्या रकमा दिल्या पाहिजेत, असा नियम आहे. त्याला डावलून ठेवीच्या रकमेचे वाटप सुरू आहे. परिणामतः अनेक ज्येष्ठ ठेवीदारांना पुरेसा औषधोपचार घेता येत नाही. पाल्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देता येत नाही. 
 
आम्ही दर लोकशाही दिनात ठेवींचे पैसे मिळण्यासाठी तक्रार अर्ज देतो. मात्र, आम्हाला केवळ आश्‍वासन मिळते. प्रत्यक्षात ठेवी मिळत नाही. माझ्या आजारपणावर खर्च करायला माझ्याकडे पैसे नाहीत. अनेक वेळा आंदोलन केले तरी सहकार विभाग लक्ष देत नाही. 
- यशवंत गजरे, ठेवीदार 

गेल्या दहा- बारा वर्षांपासून ठेवी परत मिळण्यासाठी आमचा लढा सुरू आहे. पतसंस्थांकडून वसुली होत नाही. ऍक्‍शन प्लॅननुसार काम झाले असते तर आतापर्यंत अनेक ठेवीदारांना ठेवीच्या रकमा परत मिळाल्या असत्या. सहकार विभाग झोपेचे सोंग घेत आहे. 
- नामदेव भंगाळे, ठेवीदार 

आकडे बोलतात... 
जिल्ह्यात पतसंस्था : 119 
कर्ज थकबाकीदार : 47 हजार 
अडकलेल्या ठेवींची रक्कम : 510 कोटी 
वसुली करावयाच्या ठेवी : 1200 कोटी 
अडचणीतील पतसंस्था : 81 

Web Title: marathi news jalgaon thevi kruti aarakhada pending