स्पर्धेचे युग.. गुणांची शर्यत.. अन्‌ अपेक्षांसह दप्तराचे ओझे..! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

"मुलांच्या दप्तराचे ओझे' हा गेले काही दिवस शिक्षणक्षेत्रात गाजत असलेला विषय. आजच्या स्पर्धेच्या युगात गुणांमागे धावणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांना तसे करण्यास भाग पाडणाऱ्या शाळा व पालकांनाही त्यांच्यावर पाठीवरील दप्तराचे ओझे दिसत असले, तरी ते जाणवत नाही, ही शोकांतिका आहे. 

"मुलांच्या दप्तराचे ओझे' हा गेले काही दिवस शिक्षणक्षेत्रात गाजत असलेला विषय. आजच्या स्पर्धेच्या युगात गुणांमागे धावणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांना तसे करण्यास भाग पाडणाऱ्या शाळा व पालकांनाही त्यांच्यावर पाठीवरील दप्तराचे ओझे दिसत असले, तरी ते जाणवत नाही, ही शोकांतिका आहे. 
दप्तराच्या वाढत्या वजनाचा परिणाम फक्त शरीरावरच होतो असे नव्हे, तर तो मनावरही होतो. मुलांकडून गरजेपेक्षा जास्त पुस्तकांच्या वाचनाची, लेखनाची शिक्षकांची व पालकांची अपेक्षा असते. क्रमिक पुस्तकांसह अन्य पुस्तकांचे वाचन, पाठांतर अर्थात घोकंपट्टी म्हणजे अभ्यास, हे सध्याच्या अभ्यासपद्धतीचे अविभाज्य अंग बनले आहे. जितकी जास्त घोकंपट्टी तितके जास्त गुण, जितके जास्त गुण तितके यश अधिक हे सध्याचे गणित आहे. त्यामुळे निरनिराळी पुस्तके, वर्गपाठ-गृहपाठाच्या वह्या, तोंडी-लेखी परीक्षा हे आणि एवढेच मुलांचे विश्‍व झाले आहे. त्यामुळे फारच लहान वयात मुले नैराश्‍याच्या आहारी जाऊ लागली आहेत. दप्तराचे वजन कमी झाले तर निश्‍चितच त्यांच्या मनावरील दडपणही कमी होईल. शासन-प्रशासन, शालेय स्तरावर दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी ते अपूर्ण आहेत. 
शिक्षण हे हसतखेळत व्हायला हवे. तो मुलांचा अधिकार आहे. वाढीच्या वयातील मुलांच्या मानसिकतेचा दूरगामी परिणाम त्यांच्या भविष्यातील जीवनावर होत असतो. बालपण जितके आनंदी, तितकी उत्साही मानसिकता, अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टीकोनही तेवढाच सकारात्मक, तेवढेच भविष्य उज्ज्वल. येणारी पिढी सक्षम बनवण्याची ही एक साखळी आहे. याबाबत शासनाने जरी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन ठरवून दिले असले तरी शाळा आणि जबाबदार नागरिक म्हणून शिक्षक आणि पालक या दोघांनीही याबाबत विचार करायला हवा. सुरवातीच्या काळात शाळेचे दप्तर म्हणजे ठराविक क्रमिक पाठ्यपुस्तके, पाटी-पेन्सिल, त्या त्या विषयांच्या वह्या एवढेच मर्यादित होते. परंतु गेल्या काही दशकात भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र अशा विषयांसोबत त्या पाठ्यपुस्तकांवर आधारित प्रश्नोत्तरांची गाईडसदृश पुस्तके, स्वाध्याय अशा पुस्तकांची शालेय अभ्यासक्रमाबरोबर वर्णी लागली. 
काही वर्षांपूर्वी तंत्रज्ञानासारखा विषयही अभ्यासक्रमात समाविष्ट झाला. मूल्यशिक्षणासारख्या विषयासह हस्तकला, चित्रकला, शारीरिक शिक्षण असे मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणारे काही विषय होतेच. प्रत्येक विषयाच्या वह्या, पुस्तके घेणे बंधनकारक झाले. सर्जनशीलतेला वाव देण्याऐवजी दप्तराचे वजन वाढविण्याचे काम या विषयांनी केले. दुर्दैवाची बाब म्हणजे या विषयांतही सर्जनशीलतेऐवजी घोकंपट्टीलाच अधिक महत्त्व आहे आणि पाल्याच्या या शैक्षणिक प्रगती वर पालकांना कोणताही आक्षेप तर नाहीच, उलट त्याच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यात पालकांना धन्यता वाटते. 

गैरसमजाचा वजनाला हातभार 
जितक्‍या जास्त वह्या-पुस्तके, तितके चांगले शिक्षण असा एक चुकीचा समज पालकांमध्ये गेल्या काही वर्षांत दृढ झाला आहे. पाल्य शिकत असलेली शाळा वेगवेगळ्या पुस्तकांची, निरनिराळ्या उपक्रमांच्या साहित्याची मागणी करत असतील तर ही शाळा त्याला आधुनिक व अद्ययावत स्वरूपाचे शिक्षण पुरवत आहे आणि ते पाल्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाला पूरक आहे, असा पालकांना भ्रम होतो. पाल्य वर्गात शिकवलेले सर्व काही पानेच्या पाने भरून वह्यांमध्ये उतरवून काढत आहे व शिक्षक भरपूर वर्गपाठ लिहून घेत आहेत याचा अर्थ मुले भरपूर अभ्यास करत आहेत हाही असाच एक गोड गैरसमज आहे. या वाढत्या पुस्तकांमुळे मुलांच्या दप्तराचे वजन आवश्‍यकतेपेक्षा जरा जास्तच वाढत असले व ते त्याला पेलणे अशक्‍य असले, त्याचा त्याला त्रास होत असला, तरी शाळांनी वाढवलेल्या दप्तरांच्या वजनाविषयी बहुतांश पालकांचा कोणताही आक्षेप नसल्याचेच दिसून येते. फारच कमी पालक दप्तराच्या वाढत्या वजनाविषयी तक्रार करताना दिसतात आणि तेही विद्यार्थ्याला पाठदुखीसारखा काही त्रास होत असेल तरच दप्तरामुळे मुलांना होणाऱ्या त्रासाची पालकांना बऱ्याचदा कल्पना असते, परंतु शाळेकडे तक्रार केली तर त्याचे परिणाम मुलांना भोगायला लागतील, या कारणासाठी काही पालक गप्प बसतात. 

आरोग्याच्या अनेक समस्या 
गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांमध्ये पाठदुखीचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांची हाडे मोठ्यांच्या तुलनेत नाजूक असतात. एखादी प्रौढ व्यक्ती जेवढे वजन पेलू शकेल, तेवढे लहान मूल निश्‍चितच पेलू शकणार नाही. मुलांच्या पाठदुखीसारख्या तक्रारीमुळे दप्तराच्या वाढत्या वजनाचा प्रश्न उजेडात आला. दप्तराच्या वाढलेल्या वजनामुळे मुलांच्या मणक्‍यावरही परिणाम होऊ शकतो. काही मुले खूप लांबून शाळेत येतात. अशा वेळी अर्ध्या तासाहून अधिक काळ हे वजन मुलांच्या पाठीवर राहते. त्यामुळे पाठीला वाक येऊ शकतो. तसेच वाढीच्या वयात मुलांच्या उंचीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. 

शिक्षणसम्राटांचे अर्थकारण 
असे म्हटले जाते, की लहान मुले ही मातीच्या गोळ्यासारखी असतात. त्याला जसा आकार दिला तसे ते वळते. मुलांचे देखील तसेच आहे. सुयोग्य शिक्षण मिळाले, तरच देशाची भावी आदर्श पिढी तयार होईल. समाजात शिक्षणाचा प्रसार झाला, तरच समाजाची प्रगतीकडे वाटचाल होईल या हेतूने अनेकांनी शिक्षणाचे काम हाती घेतले. मात्र या शिक्षणसम्राटांनी शिक्षण क्षेत्रातल्या बाजारीकरणाला सुरवात केली. अर्थकारणाचे वेगळे आयाम शिक्षणक्षेत्राला प्राप्त झाले. केवळ शिक्षण क्षेत्रातील लोकच याला कारणीभूत नाही तर नवा पालकवर्गही जबाबदार आहे. आपल्या पाल्याला जास्तीत जास्त चांगल्या अर्थात महागड्या शाळेत कसे घातला येईल यासाठी पालक प्रयत्न करतात. त्यामुळेच खासगी शाळा, सीबीएससी, आयसीएससी तसेच इंटरनॅशनल स्कूल्स या शाळांना "अच्छे दिन' आले. तर शिक्षणाइतकेच प्रदर्शनालाही महत्त्व आले. अधिक विषय, त्या विषयांची पुस्तके, नामांकित प्रकाशनाची गाईडसदृश पुस्तके, प्रत्येक विषयाच्या वर्गपाठ-गृहपाठ अशा एकापेक्षा अधिक वह्या हे सगळे शाळांच्या मागणीप्रमाणे उपलब्ध करून देण्यात पालकांना मोठेपण जाणवत आहे. 

नियम कागदावरच! 
शासनाने दप्तराच्या ओझ्याबाबत अनेकदा नियम काढले. प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन ठरविले जाते मात्र हे वजन खरोखर अमलात आणले जात आहे की नाही याबाबत कोणतीही तपासणी होत नाही. त्यामुळे नियम काढल्यानंतर आठवडाभर या नियमाचे पालन केले त्यानंतर शाळा, विद्यार्थी हे पुन्हा आपल्या पद्धतीनुसार वागतात. त्यामुळे शासनाचे हे नियम कागदावरच दिसून येत आहे. 

एवढ्या ओझ्याची गरज आहे का? 
प्रत्येक मुलाची प्रकृती, ठेवण वेगळी असते. एखादे मूल जेवढे वजन उचलू शकेल, तेवढे दुसरे मूल उचलू शकेलच असे नाही. काही मुले सुदृढ तर काही मुले अशक्त असतात, काहींना जन्मतःच काही शारीरिक दोष असतात. अशी मुले दप्तराचे वजन उचलू शकतील असे नाही. सर्वसाधारणपणे मूल अडीच किलोपर्यंत वजन उचलू शकतो. पण ते किती वेळ पाठीवर राहते यावरही ते अवलंबून असते. मात्र एवढ्या वजनदार दप्तराची खरंच गरज आहे का ?. दप्तरात जास्त वजन वह्यांचेच असते. रोज वेगवेगळ्या विषयांच्या गृहपाठ-वर्गपाठाच्या वह्या, स्वाध्याय नेण्यापेक्षा मुलांनी फाईलिंगची सवय लावायला हवी. 

अनावश्‍यक वस्तू टाळा 
मुलांचं दप्तर म्हणजे अनेकदा गोडाऊन असतं. या ओझ्यामुळे पाठ दुखतेच शिवाय त्याचे इतरही त्रास असतातच. या दप्तरात अनेक गोष्टी असतात ज्या गरज म्हणून मुलांना सांभाळाव्या लागतात. शालेय मुलाचं हे दप्तराचं ओझं कमी व्हावं यासाठी शाळांनी उपाययोजना करायला हव्या. यात जुनी पुस्तके शाळेतच वापरावी तसेच दोनशे पानी वह्यांऐवजी शंभर पानी वह्या वापराव्या. तर इतर विषयांसाठी देखील याच स्वरुपाच्या उपाय योजना कराव्या. चित्रकलेचे साहित्य हे शाळेतच ठेवावे अथवा आठवड्यातून एकच तासिका ही चित्रकलेची ठेवावी. 

किती अपेक्षा, किती ओझे 
स्पर्धेच्या युगाचं अवडंबर करत मुलांवर बालपणापासूनच अपेक्षांचं ओझं लादलं जातं. दप्तराच्या ओझ्यापेक्षाही हे ओझं कमालीचं असतं. ज्या वयात खेळा-बागडायचे दिवस असतात, त्याच वयात आपण (पालक या अर्थाने) मुलांना धावायला लावतो. "आउट ऑफ मार्क्‍स'ची स्पर्धा पहिलीपासूनच सुरू होते. गुणांची पद्धत हद्दपार केल्याचे मानले जाते, प्रत्यक्षात गुणांवर आधारित "ग्रेड' सिस्टिमचं काय? गुणांशिवाय तर ग्रेड तयार होत नाही. घटक चाचणी, सहामाही परीक्षेवर मर्यादा घालण्यात आल्या. मात्र, शाळा या परीक्षांशिवाय अभ्यासक्रम पुढे नेऊ शकत नाही, आणि परीक्षाच नको ही भूमिका पालकांनाही मान्य होणार नाही. म्हणून शासनाची मूक संमती, शाळांची गरज आणि पालकांच्या अपेक्षानुसार परीक्षाही सुरू आहेत, गुणही दिली जात आहेत. आणि या साऱ्या बाबींचं ओझं अर्थातच कोवळ्या चिमुकल्यांवर पडतंय... आणि ही मुलं जशी वाढता, तसे ते ओझेही वाढत आहे. 

 

Web Title: marathi news jalgaon third ete school bag