लहरी पावसाने "खरीप' गुदमरला! 

लहरी पावसाने "खरीप' गुदमरला! 

जळगाव ः पावसाच्या लहरीपणाचा फटका यंदाही शेतकऱ्यांसह नागरिकांना बसला आहे. पावसाला जूनच्या सुरवातीस जोरदार सुरवात झाली. मात्र, नंतर दिलेली उघडीप खरिपाच्या उत्पादनाला मारक ठरली. उशिराने झालेल्या पावसाने खरिपाची पिके जेमतेम उभी आहेत. उडीद, मुगाचे उत्पादन आताच सरासरी तीस टक्‍क्‍यांनी घटले आहे. जिरायती कापसाला चोवीस तास झालेल्या संततधार पावसाने जीवदान मिळाले असले, तरी बोंडअळी किती नुकसान करते, यावर कपाशीचे भवितव्य अवलंबून आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामामुळे पावसाचा लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना दरवर्षी बसत आहे. भारतात पावसाचा काळ जून ते सप्टेंबर असे चार महिने समजला जातो. जिल्ह्याची सरासरी 663.3 मिलिमीटर आहे. आज अखेरपर्यंत 391 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरी 59 टक्‍के पाऊस झाला आहे. हा पावसाचा शेवटचा महिना. यात पाऊस किती पडतो, यावर कापसाचे उत्पादन व पुढील रब्बी हंगाम अवलंबून आहे. 

जमिनीला भेगा पडल्या 
जूनच्या सुरवातीच्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. मात्र पावसाने बराच खंड पडल्याने अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवले. नंतर मात्र जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने दुबार पेरण्या टळल्या. ऑगस्ट महिन्यात दोन वेळा संततधार पाऊस झाला. यामुळे काहीअंशी पाणीटंचाई मिटली. पिकांना जीवदान मिळाले. मात्र त्यानंतर तब्बल महिना उलटला तरीही पावसाने जोरदार हजेरी लावली नाही. आता जमिनीला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. यामुळे जमिनीत ओल शिल्लक नाही. कपाशींसह सोयाबीन, उडीद, सूर्यफूल, ज्वारी, बाजरी आदी पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. पावसाअभावी दाणे बारीक पडत आहेत. 

तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढला 
पाऊस नसल्याने पानातील रस शोषणाऱ्या तुडतुडे, फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाच्या विश्रांतीमुळे मूग, उडीद, ज्वारी, बाजरीच्या उत्पादनात पंचवीस ते तीस टक्‍के घट येणार आहे. यामुळे आता पावसाची गरज आहे. पावसाअभावी मूग हातचा गेला आहे. उडदाचे नुकसान होईल. मात्र पाऊस झाला नाही तर जिरायती कपाशीचे मोठे नुकसान होईल. आगामी रब्बी हंगाम कोरडा जाईल. या महिन्यात अधिकाधिक पाऊस पडल्यास पुढील पाच ते सहा महिने पिकांना जीवदान देणारा ठरेल, असे कृषी तज्ज्ञांना वाटते. 
 
मुगाचे मोठे नुकसान 
खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेला मूग, उडीद काढण्यास सुरवात झाली. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मुगाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक मुगाचा फुलोरा पावसामुळे झडून गेला आहे. यामुळे मुगाचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगतात. जेव्हा पाऊस झाला तेव्हा मुगाला फुलोरा होता. संततधार पावसाने तो गळून गेला. उडदाला मात्र शेंगा होत्या. पावसामुळे उडदाचे दाणे भरले गेले. आता उडदाची काढणी सुरू झाली आहे. 
 
उपायांमुळे बोंडअळीला आळा 
जिल्ह्यात 22 ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव जुलै महिन्यात जाणवण्यास सुरवात झाली होती. मात्र कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या गावागावात सभा घेतल्या. त्यात कामगंध सापळे लावण्याबाबत सूचना केल्या. यामुळे बोंडअळीच्या नरमादींना अटकाव झाला. आता तूर्त सर्व ठिकाणी बोंडअळीचा पायबंद झाला आहे. अजूनही बोंडअळीच्या पायबंदासाठी शेतकरी उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत. 
 
आकडे बोलतात.. 
खरिपाचे क्षेत्र हेक्‍टर : 8 लाख 10 हजार 209 
पेरणी झालेले क्षेत्र : 7 लाख 37 हजार 67 
कापसाचे क्षेत्र : 5 लाख 10 हजार 913 

 
आतापर्यंत झालेल्या पावसामुळे खरिपाला जीवदान मिळाले आहे. असे असले तरी अद्यापही पावसाचे तीव्र गरज आहे. आता पाऊस झाला तर कपाशीला फायदा होईल. रब्बीचा हंगाम चांगला राहील. यामुळे पावसाची नितांत गरज आहे. 

- अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, जळगाव. 

जळगाव तालुक्‍यात बोंडअळी नाही 
जळगाव तालुक्‍यात उडीद, सोयाबीन, मूग या पिकांच्या उत्पादनात पावसाअभावी घट झाली आहे. आता पावसाची नितांत गरज आहे. आता दमदार पाऊस झाल्यास ज्वारी, मका, कापूस यांच्या उत्पादनात चांगली वाढ होईल. पावसाचे चिन्हे दिसत नसली तरी सप्टेंबर महिन्यात माघारीचा पाऊस दमदार पडतो असा आजवरचा अनुभव आहे. यामुळे कपाशीच्या उत्पादन वाढू शकते. काही ठिकाणी कपाशीवर बोंड अळीच्या पतंगाचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करण्यात आलेल्या औषधे, किटकनाशकांमुळे पतंगाचा अटकाव करणे शक्‍य झाले आहे. सोबतच शेतकऱ्यांना निंबोळी अर्काची फवारणी करण्याचेही सांगण्यात आले आहे. जनजागृती ठिकठिकाणी राबविली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com