सातपुड्यातील टायगर कॉरिडोर संकटात...

राहुल रनाळकर
सोमवार, 18 मे 2020

एकीकडे शहरी जनता कोविडशी लढण्यात मग्न आहे, तर दुसरीकडे सातपुड्याच्या टायगर कॉरिडोरमध्ये शिकारी वनसंपदा नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. या शिकाऱ्यांना स्थानिकांची साथ मिळते आणि मग कसा वनक्षेत्रातील अतिक्रमणांचा वणवा कसा पेटत घेतो, वाचा सविस्तर....

जळगाव : ताडोबा, मेळघाटपेक्षाही जुनं आणि समृद्ध असलेल्या यावल अभयारण्याला गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण आणि वृक्षतोडीचे ग्रहण लागले आहे. काही केल्या हे ग्रहण सुटण्याचे नाव घेत नाही. अनेक वर्षे या जंगलात माणसांचा शिरकाव झालेला नव्हता. आगीमुळे जंगलांची थोडीफार हानी व्हायची. पण, अलीकडे वनक्षेत्रात लागलेला अतिक्रमणांचा "वणवा' हा त्या नैसर्गिक आगींनाही लाजवणारा आहे. आता तर अतिक्रमणाला शिकाऱ्यांचीही जोड मिळाली आहे. वनक्षेत्रातील या नव्या "वणव्या'मुळे सातपुड्यातील शिल्लक असलेला "टायगर कॉरिडॉर' संकटात आहे. काय आहे हा वणवा? काय आहे या वणव्याचे स्वरूप? काय आहेत या वणव्याची कारणे..? 

जगभरात आत्ताशी थैमान घातलेल्या कोरोनाने चंगळवादी आणि भौतिकवादी मानवी संस्कृतीला पुन्हा नैसर्गिक जीवनपद्धतीकडे जाण्याचा मार्ग दाखवायला सुरवात केली आहे. यात निसर्गाचे आणि वनसंपदेच्या समतोलाचे अनन्य साधारण महत्त्व घराघरांत पटू लागले आहे आणि ही बाब भविष्यातील वन्यजीव आणि वनसंपदेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरणारी आहे. यावल वनक्षेत्रामध्ये गव्यांचे कळप, वाघ, हत्ती आणि असंख्य दुर्मिळ पक्ष्यांची नोंद यापूर्वी झाली आहे. पण सध्या यावल वनक्षेत्रात माणसांचा विशेषतः अन्य राज्यातून आलेल्या आदिवासी लोकांची वस्ती आणि हस्तक्षेप प्रचंड प्रमाणात वाढलाय. 

नक्की वाचा :  जळगाव जिल्हा त्रीशतकाच्या उंबरठ्यावर 

दोन बछड्यांची नोंद 
यावल अभयारण्यात चार वर्षांपूर्वी वाघाचे दोन बछड्यांची नोंद झालेली आहे, हे बछडे आता मोठे झाले आहेत. वाघांचा संचार असलेले जंगल म्हणजे वनसंपदा पुनरुज्जीवित होण्याच्या हालचाली म्हटल्या जातात. त्यामुळेच शिकाऱ्यांचा वावरही या जंगलांमध्ये वाढतोय. अलीकडेच वनाधिकाऱ्यांवर झालेला गोळीबार हा याचीच साक्ष पटवून देणारा आहे. 

क्‍लिक कराः Video : ट्रॅव्हल्स- गॅस टॅंकरशी धडक; पाच जणांचा मृत्यू?

पाडे चारवरून सोळावर 
काही वर्षांपूर्वीच्या नोंदीनुसार यावल अभयारण्यात गाडऱ्या, जामन्या, ऊसमळी आणि लंगडाआंबा हे चारच पाडे होते. पण, परराज्यातून येथे बस्तान बसविणाऱ्यांमुळे सध्या या पाड्यांची संख्या तब्बल 15 ते 16 एवढी झालीय. वनक्षेत्रावर, निसर्गावर झालेल्या मानवी आक्रमणाचा, हस्तक्षेपाचा हा सर्वांत मोठा पुरावा आहे. परराज्यातून आलेल्या या लोकांनी वनक्षेत्रात अतिक्रमणाचा अक्षरशः "वणवा' पेटवला आहे. याला कारणीभूत म्हणजे या लोकांचा जागेचा लोभ आणि लाकूड तस्करीतून मिळणाऱ्या प्रचंड पैशांचा हव्यास... या लोकांच्या हव्यासापोटीच "टायगर कॉरिडॉर' आज मोठ्या संकटात सापडला आहे. हा "टायगर कॉरिडॉर' वाचवायचा असल्यास यावल वनक्षेत्रातून हे अनधिकृत लोक बाहेर काढण्याशिवाय अन्य कोणताही मार्ग सध्या तरी दिसत नाही. 
 

राजकीय उदासीनता कारणीभूत 
आपल्याकडे स्थानिक नेत्यांना या अभयारण्याचे महत्त्व वाटत नाही. शिवाय या विषयाचे गांभीर्यही त्यांना नाही. खरे तर राजकीय पाठिंबा मिळाल्यास वनखात्याला कारवाई करण्यासाठी बळ मिळणार आहे. अन्यथा कारवाई केल्यानंतर राजकीय कनेक्‍शनमधून कारवाई ढिली करणे सुरूच राहील. परिणामी कितीही अतिक्रमण आणि अवैध धंदे केले, तरी इथे कारवाई होत नाही असा संबंधितांमध्ये असलेला समज अधिकच प्रबळ होत जाईल. 

- अभय उजागरे, ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon tiger corridor satpuda crisis