असह्य त्रास... आणि नागरिकांवर का आली स्वःताचे घर सोडण्याची वेळ ! 

भूषण श्रीखंडे
मंगळवार, 10 मार्च 2020

कंपोस्टच्या जागेवर आता कचऱ्याचे डंपिंग झाले असून, साचलेल्या व कुजलेल्या कचऱ्याची दुर्गंधी बाजूलाच असलेल्या गायत्रीनगरात पसरत असल्याने कॉलनीतील प्रत्येक घरातील सदस्य आजारी पडलेला आहे. त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या दुर्गंधीमुळे आजारामुळे थेट घर सोडण्याची वेळ आली आहे. 

जळगाव ः घराच्या खिडकीतून डोकावताच दिसतात ते कचऱ्याचे ढीग.. त्यात सकाळी आणि सायंकाळी तर दुर्गंधीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्‍कील झाले आहे. डासांच्या प्रादुर्भावाने घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत लोक आजारी पडत असल्याने गायत्रीनगरातील नागरिकांना थेट घर सोडण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेचे अधिकारी, नगरसेवकांना याबाबत तक्रार करूनही दखल घेत नसल्याची ओरड नागरिकांनी केली आहे. शहरात सफाई मक्तेदाराने पंधरा दिवसांपासून काम बंद केल्याने सर्वत्र स्वच्छतेची बोंबाबोंब झाली आहे. त्यामुळे सर्वत्र कचरा साचलेला असून, महापालिकेच्या कायमच्या कर्मचाऱ्यांची संख्या अपूर्ण पडत आहे. 

रहिवास परिसरात डंपिंग ग्राउंड 
मक्तेदाराला मेहरुण तलावाजवळील महापालिकेच्या मालकीच्या बंद टीबी रुग्णालयाची जागा घंटागाड्या व कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांना डेपोसाठी दिली आहे. तसेच या ठिकाणी तत्कालीन आयुक्त उदय टेकाळे यांनी ओल्या कचऱ्यातून कंपोस्ट खत करण्यासाठी जागा तयार केली. कंपोस्टच्या जागेवर आता कचऱ्याचे डंपिंग झाले असून, साचलेल्या व कुजलेल्या कचऱ्याची दुर्गंधी बाजूलाच असलेल्या गायत्रीनगरात पसरत असल्याने कॉलनीतील प्रत्येक घरातील सदस्य आजारी पडलेला आहे. त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या दुर्गंधीमुळे आजारामुळे थेट घर सोडण्याची वेळ आली आहे. 

आर्वजून पहा : सापडलेल्या एक लाख रूपयांच्या बॅगसोबतचा प्रवास...पांडूरंगाच्या दर्शनापेक्षाही... दिले याला प्राधान्य 

संसर्गजन्य आजारांचा फैलाव 
टीबी रुग्णालय परिसरात कंपोस्टसाठी केलेल्या जागेत कचरा तसाच पडून असल्याने त्याची प्रचंड दुर्गंधी आजूबाजूच्या वसाहतींमध्ये सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यात कचरा साचल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने गायत्रीनगरातील प्रत्येक घरात किमान एकतरी सदस्य आजारी आहे. यात मलेरिया, टॉयफाईड, दुर्गंधीमुळे श्‍वसनाचे त्रास, उलट्या चक्कर अशा आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे महापालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

घर सोडण्याची आली वेळ 
मेहरुण तलावाच्या शिवाजी उद्यानालगतच गायत्रीनगर आहे. या वसाहतीमध्ये सुमारे शंभर घरांची संख्या असून, कॉलनीला लागून असलेल्या महापालिकेच्या जागेत साचलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे होणाऱ्या त्रासाने नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कॉलनीतील काही नागरिकांना स्वत:चे घर सोडून शहरात अन्य ठिकाणी भाड्याने अथवा त्यांच्या मुलाकडे जाऊन राहण्याची वेळ आली आहे. दुर्गंधीमुळे घरातून बाहेरही पडणे दुरापास्त झाल्याची भावना नागरिकांनी बोलून दाखवली. 

...तर नगरसेवकाच्या दारापुढेच कचरा टाकू 
या समस्यांबाबत अनेक महिन्यांपासून गायत्रीनगरातील नागरिक नगरसेवकांपासून, राज्य शासनाच्या तक्रार निवारणाच्या ऍपद्वारे तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तक्रार करत आहेत. परंतु, अधिकारी तसेच नगरसेवक ही समस्या सोडविण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे आता तत्काळ ही समस्या न सोडविल्यास नगरसेवकाच्या घरीच हा कचरा नेऊन टाकण्याचा इशारा नागरिकांना "सकाळ'शी बोलताना दिला. 

नक्की वाचा :  होय.. जळगावातही "सोलापुरी पॅटर्न' राबवूच : जिल्हाधिकारी, प्रभारी...आयुक्त डॉ. ढाकणे 
 

श्‍वान निर्बिजीकरणाच्या केंद्रामुळे दुर्गंधी 
टीबी रुग्णालयात महापालिकेने शहरातील मोकाट कुत्रे निर्बिजीकरणाचे केंद्र खासगी मक्तेदाराच्या माध्यमातून सुरू केले आहे. परंतु, येथे एका खोलीत रोगट व आजारी तसेच शस्त्रक्रिया झालेल्या कुत्र्यांना ठेवले जात असल्याने तेथे अतिशय दुर्गंधी पसरली आहे. ही दुर्गंधी सर्वत्र पसरत असून, त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. 

दृष्टिक्षेपात.... 
- टीबी रुग्णालय परिसरात कचऱ्याचे ढीग 
- प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला 
- बंद व पडीक खोल्यांमध्ये गैरकारभार 
- गायत्रीनगरातील प्रत्येक घरात रुग्ण 
- बाजूलाच शाळा, स्पोर्टस्‌ क्‍लबच्या मुलांनाही त्रास 
- अधिकारी, नगरसेवकांचे समस्येकडे दुर्लक्ष 

तत्काळ उपाययोजना हवी 
आशा तुलसी ः घराच्या बाजूलाच महापालिकेच्या जागेत साचलेला कचऱ्याचा प्रचंड त्रास दररोज सहन करावा लागत आहे. सकाळी व सायंकाळी दुर्गंधी, डासांचा एवढा त्रास असतो की आम्हाला घराच्या बाहेर पडणे देखील मुश्‍कील झाले आहे. यावर तत्काळ उपाययोजना करणे आवश्‍यक असून हे आता असह्य झालेले आहे. 

आजारी रुग्ण वाढले 
स्वाती चव्हाण ः घराला लागून हे टीबी रुग्णालयाच्या मोकळ्या जागेत हा कचरा साचलेला आहे. त्यामुळे घराचे दरवाजे, खिडक्‍या बंद करून देखील दुर्गंधी येत असल्याने आजारांचे प्रमाण वाढले आहे. तक्रार करून देखील घेतली जात नाही. 

दुर्गंधीचा त्रास असह्य 
मधू अहुजा ः घरात व घराच्या बाहेर तर सायंकाळी बसणे मुश्‍कील झाले आहे. मुलांच्या कधी परीक्षा संपतात आणि आम्ही गावाला निघून जातात याची वाट आम्हाला बघावी लागत आहे. एवढा त्रास आम्ही सहन करत आहे. महापालिका व नगरसेवक याकडे लक्ष देत नाही. 

किती सहन करायचे? 
शमिला भगवाणी ः बाजूच्या कचऱ्याचा एवढा त्रास वाढला आहे की आमच्या घरासोबत कॉलनीतील 
सर्वच घरातील लहान मुले, वृद्ध आजारी पडलेले आहेत. त्यामुळे आम्ही येथे कसे राहत आहोत हे आम्हालाच माहीत. किती दिवस हे सहन करायचे? 

डासांचा प्रादुर्भाव 
कमलेश परडकर ः महापालिकेकडून येथे अशास्त्रीय पद्धतीने कचऱ्याचे विल्हेवाट येथे लावली जात आहे. त्यात येथे कचरा साचल्याने डास, मच्छरांचा मोठा प्रादुर्भाव वाढल्याने प्रत्येक घरात रुग्ण आहे. त्यामुळे नगरसेवक, महापालिकेने तत्काळ दखल घेऊन ही समस्या सोडवावी. अन्यथा आम्ही कचरा नगरसेवकांच्या घरून नेऊन टाकू. 

क्‍लिक कराः वाळूने भरलेले ट्रॅक्टर पेटविले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Time to leave home for residents of Gayatri Nagar