वृक्षलागवड मोहिमेचा फज्जा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

जळगाव ः शासनाकडून वृक्ष लागवड मोहीम राबवून 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट घेतले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र जेथे आवश्‍यक आहे, तेथे खड्डे खोदून रोप लागवड करण्यात येत आहे. परंतु, शहरातील मेहरूण तलाव परिसरात या मोहिमेचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी लागवड केलेली काहीच रोपे जगविण्यात यश आले. त्यामुळे आता त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. तरीही अजून रोपांची लागवड करण्याची प्रतीक्षा आहे. 

शासनाने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध शासकीय विभाग, शाळा, ग्रामपंचायत यांना जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय सामाजिक संस्था, व्यक्ती हे देखील वृक्ष लागवडीत स्वयंस्फूर्ती सहभाग घेत आहेत. त्या अनुषंगाने महापालिका प्रशासनालाही उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हिरवळीने नटलेल्या मेहरूण तलाव परिसरात मोकळ्या जागांवर रोप लावण्याचे निश्‍चित करत तेथे खड्डे खोदण्यात आले आहेत. रोपांची लागवड होऊन त्यांचे संगोपन करत जगविल्यास खऱ्या अर्थाने उद्दिष्ट साधता येईल. परंतु उद्दिष्ट पूर्तता कागदावर आणि प्रत्यक्षात रिकामे खड्डे पाहावयास मिळत आहेत. 
 
तलाव परिसरात शेकडो खड्डे 

महापालिका हद्दीतील मेहरूण तलाव परिसरात अनेक ठिकाणी मोकळी आणि रिकामी जागा आहे. या जागेवर रोपांची लागवड करण्यासाठी शेकडो खड्डे खोदण्यात आले आहेत. मात्र हे खड्डे रोप जगतील, अशा पद्धतीने खोदण्यात आलेले नसून, केवळ अर्धा फूट खोल इतकीच माती काढण्यात आलेली आहे. यामुळे या खड्ड्यात रोप लावले तरी ते जगेलच याची शाश्‍वती नाही. तसेच दोन खड्ड्यांमधील अंतर हे योग्य हवे, मात्र, त्यात कुठलाही ताळमेळ दिसत नाही. मुळात मेहरूण तलाव परिसरात खोदण्यात आलेले खड्ड्यांमध्ये अर्धा पावसाळा होऊन देखील रोपांची लागवड झालेली नाही, हे विशेष. 

"त्याच' जागेवर खोदले खड्डे 
मेहरूण तलावावर तयार करण्यात आलेल्या गणेश घाटापासून संपूर्ण परिसरात यावर्षी रोप लागवड करण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्यांच्या ठिकाणी गेल्यावर्षीही रोप लागवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, एका ठिकाणीही रोप जगले नसल्याचे पाहण्यास मिळाले. यामुळे रोपांची केवळ लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे काम होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

Web Title: marathi news jalgaon tree plantation mohim