तूरडाळ प्रतिकिलो दहा रुपयांनी महागली ! 

तूरडाळ प्रतिकिलो दहा रुपयांनी महागली ! 

जळगाव ः यंदा तुरीचे उत्पादन घटले असून, तूरडाळीची बाहेरून होणारी आवक देखील कमी झालेली आहे. या तुलनेत दोन महिन्यांपासून मागणी वाढल्याने मार्केटमध्ये तूरडाळीचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी तूरडाळीच्या दरात गेल्या पंधरा दिवसात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे. 
महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर तूरडाळीचे उत्पादन घेतले जाते. मुख्य म्हणजे यंदा पाऊस कमी झाल्याने तुरीचे अपेक्षित उत्पादन होऊ शकले नाही. याशिवाय म्यानमार आणि ब्रह्मदेश येथून तूरडाळीची आवक जिल्ह्यात होत असते. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस तूरडाळीचा हंगाम सुरू होतो. तो साधारण जानेवारी- फेब्रुवारीपर्यंत सुरू राहतो. परंतु नुकताच संपलेल्या हंगामात तुरीचे उत्पादन पुरेसे न झाल्याने सध्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होऊ लागला आहे. यामुळे दर अधिक वधारले आहेत. तूरडाळीचे दर येत्या काही दिवसात आणखी वधारण्याची शक्‍यता व्यापारी वर्गातून सांगण्यात आले. 

पंधरवड्यात वाढ 
तुरीची आवक सुरू झाल्याच्या सुरवातीला प्रतिक्विंटल भाव सात हजार ते साडेसात हजार रुपये इतका होता. तो आता साडेआठ ते नऊ हजार रुपयांपर्यंत पोहचले आहे. परंतु गेल्या पंधरा दिवसांत तूरडाळीच्या दरात अधिक वाढ झाली आहे. जळगावच्या मार्केटमध्ये तूरडाळीचे प्रतिकिलो दर 75 रुपये इतके दर होते. हेच दर आठ दिवसांपूर्वी 80 रुपयांवर होते. तर आजचे दर प्रतिकिलो 85 ते 90 रुपयांवर पोहचले आहेत. 

दोन महिन्यात अधिक मागणी 
लग्नसराईला फेब्रुवारी महिन्यापासून सुरवात झाली आहे. परंतु मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात लग्नाच्या मोठ्या तिथा असतात. यामुळे तूरडाळीच्या मागणीत याच महिन्यात मोठी मागणी वाढते. तर अनेकजण घरात वर्षभराचा साठा करण्यासाठी गहू, तांदूळ, डाळींची खरेदी करतात. मात्र तूरडाळीचे उत्पादन यंदा कमी असल्याने मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती मार्केटमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे तूरडाळीचा सध्या पुरवठा कमी पडू लागला आहे. 

"तुरीचे यंदा उत्पादन कमी झाले आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातून होणारी आवक कमी झाली आहे. यात मागणी वाढल्याने तूरडाळीच्या दरात गेल्या पंधरा दिवसात वाढ झाली आहे.' 
- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com