वर्तमानात जगले तरच तरुणांचे भविष्य उज्ज्वल : तुषार गांधी

वर्तमानात जगले तरच तरुणांचे भविष्य उज्ज्वल : तुषार गांधी

जळगाव : आजची तरुणाई देशाचे वर्तमान आहेत. त्यांना वर्तमानाची जाणीव करून द्यायला हवी. ती जाणीव झाल्यास त्यांना प्रश्‍न समजायला लागतील. तरुणांनी वर्तमानात जगल्यास त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, असे मत महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले. 
गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजित "नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्प'च्या उद्‌घाटन सत्रात ते बोलत होते. कस्तुरबा सभागृहात झालेल्या या सोहळ्यास फाउंडेशनचे विश्वस्त दलिचंद जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, फाउंडेशनच्या विश्वस्त ज्योती जैन आदी व्यासपीठावर होते. यावेळी जैन परिवारातील स्नुषा सौ. अंबिका अथांग जैन उपस्थित होत्या. 
तुषार गांधी म्हणाले, की आज अनेक जण नेतागिरी करताहेत, नेतृत्व करीत नाहीत. लीडर असे बना ज्यांना पाहूनच प्रेरणा मिळायला हवी. बापूंचे जीवन प्रेरणादायीच होते. आपण एकमेकांचे सुतीहार घालून स्वागत केले. हा सुतीहार म्हणजे राष्ट्रबंधन व्हायला हवे. आपल्यातील भाषा, जात, प्रांत यांचे वाद मिटवायचे असतील, तर खादीचा स्वीकार करायला हवा, म्हणजे आपण सर्व एकाच पातळीवर येऊ. 

शेतकरी आणि युवक संकटात : डॉ. अय्यंगार 
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अय्यंगार म्हणाले, की आजचा शेतकरी आणि युवक संकटात आहेत. राजकारणात भ्रष्टाचार व कुटिलता वाढली आहे. त्यावर महात्मा गांधीजींचे तत्त्वज्ञान महत्त्वाचे ठरते; परंतु आपण गांधीजींचे ऐकले नाही. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांचे संपूर्ण जीवन शेतकरीमय होते, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. 
फाउंडेशनचे अधिष्ठाता डॉ. जॉन चेल्लादुरई यांनी प्रास्ताविक केले. सुरवातीला अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साने गुरुजींची "खरा तो एकचि धर्म' ही प्रार्थना सादर केली. गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी अश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले. भुजंगराव बोबडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. 
 
आगळेवेगळे स्वागत! 
कॅम्पला देशभरातून आलेल्या तरुणांनी एकमेकांना सुतीहार घालून आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत केले. स्वागतावेळी तरुणांनी हाती फलक धरून Be the change you want to see in the world (जे परिवर्तन आपणास अपेक्षित आहे, तसे आपण आधी स्वतः बनूया) असा महत्त्वाचा संदेश दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com