फारुख, रफिक भाई भाई...जिथे भीती तिथे जाती! 

रईस शेख  
गुरुवार, 9 एप्रिल 2020

संशयित रुग्ण आढळलेल्या परिसरासह संबंधित रुग्णांचे राहते घर, त्यांचे शेजारी आणि संक्रमणाचा धोका असलेल्या ठिकाणांवर औषध फवारणी वाहनाचे चालक रफिकभाई व स्वत: औषध फवारणीची जबाबदारी असलेले फारुखभाई हे दोघे भावंड या लढ्यात सैनिकाची भूमिका पार पाडत आहेत. 

जळगाव : शहरातील उस्मानिया पार्कमधील एकत्र कुटुंबातील दोन्ही कर्ते पुरुष महापालिकेत कार्यरत आहेत. कायम कर्मचारी मोहम्मद रफिक आणि न्यायप्रविष्ट कामगार फारुख कादरी सध्या "कोरोना फायटर' म्हणून शहरात ओळखले जाऊ लागले आहेत. देशावर घोंघावत असलेल्या महारोगाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. शहरातही "कोरोना'बाधित रुग्ण आढळल्याने मेहरुण, सालारनगर यासारखे परिसर "सील' करण्यात आले आहे. अशा ठिकाणांवर औषध फवारणी करून ते निर्जंतुक करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जिथे कोणी जाण्याची हिंमत करत नाही, अशा ठिकाणी जळगावचे फारुखभाई "मास्क' लावून न घाबरता एखाद्या सैनिकाप्रमाणे तुटून पडतात, तर औषध फवारणी वाहनाचे चालक रफिकभाई हे देखील आपले कर्तव्य निडरपणे बजावतात. 

जळगाव शहरात "कोरोना'चे दोन "पॉझिटिव्ह' रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या आरोग्य यंत्रणेसह पोलिस, महापालिका प्रशासन अहोरात्र परिश्रम करीत आहे. याशिवाय, महापौर, नगरसेवकांसह काही संस्थांच्या प्रतिनिधींनी रस्त्यावर उतरून स्वच्छता व औषध फवारणीची धुरा हाती घेतली आहे. मात्र, कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेल्या ठिकाणांची जबाबदारी महापालिकेच्या मलेरिया विभागातील मोजक्‍या कर्मचाऱ्यांवर आली आहे. मलेरिया विभागातील चालक मोहम्मद रफिक व त्यांचे भाऊ फारुख कादरी या दोघा भावंडांनी स्वत:ला "कोरोना'विरुद्धच्या लढ्यात झोकून दिले आहे. संशयित रुग्ण आढळलेल्या परिसरासह संबंधित रुग्णांचे राहते घर, त्यांचे शेजारी आणि संक्रमणाचा धोका असलेल्या ठिकाणांवर औषध फवारणी वाहनाचे चालक रफिकभाई व स्वत: औषध फवारणीची जबाबदारी असलेले फारुखभाई हे दोघे भावंड या लढ्यात सैनिकाची भूमिका पार पाडत आहेत. 

क्‍लिक कराः  कोरोना इफेक्‍ट: कॉस्मेटिक उत्पादकांना कोट्यवधींचा फटका ! 
 

कुटुंबात होती भीती.. 
रफिक आणि फारुख हे दोघे बंधू आठ सदस्यांच्या एकत्र कुटुंबात राहतात. "कोरोना'चा रुग्ण आढळून आल्यावर संबंधितांच्या घरात व परिसरात फवारणीसाठी फारुखभाईंना बोलावण्यात येते. घरात रात्री बेरात्री फोन वाजला, की कुटुंबातील इतर सदस्य घरातून निघताना भीतीने दाटून आलेल्या चेहऱ्याने रवाना करीत असतात. पत्नी, मुले तर "एखाद दुसरे कोणी नाही का तुमच्या शिवाय..तुम्ही आजारी पडले तर! अशा "धीरगंभीर' प्रश्‍नाने हादरून सोडतात. मात्र, कर्तव्यनिष्ठे पुढे कुटुंबाची भीती बाजूला सारत दोन्ही बंधू टाळाटाळ न करता प्रत्येक वेळी कामाला धाव घेतात. 

नक्की वाचा : बांधकाम क्षेत्रासाठी दुष्काळात तेरावा महिना 
 

"कोरोना' आल्यापासून मी घरात तिसऱ्या मजल्यावर एकटा राहतोय. 15 दिवसांपासून एका घरात राहून पत्नी-मुलांना भेटू शकत नाही. भाऊ रफिकचेही तसेच, कामावरून परतल्यावर पूर्वी मुले गाडीजवळ धावून येत. आता पत्नी गरम पाण्याची बादली घेऊन येते. अंगणातच औषध टाकून साबणाने स्वच्छ अंघोळ करून माझ्या खोलीत ठेवलेले जेवण घेऊन झोपतो. कर्ता पुरुष असल्याने पत्नी व मुलांनी खूप विरोध केला. मात्र वडील मोहम्मद हनिफ यांनी बाजू उचलून धरत मला प्रोत्साहित दिल्याने हिंमत वाढली. 
- फारुख कादरी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon two brother malireya vibhag coron hptspot Spray the drug