उमेदवार ठरलेले.. मुलाखतीचा केवळ "फार्स' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

जळगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती वरकरणी "सीरियस' वाटत असल्या तरी मुलाखतींची प्रक्रिया केवळ "फार्स' आहे, प्रत्येक राजकीय पक्षाचे प्रभागनिहाय उमेदवार पक्के झालेत, असे बोलले जात आहे. या मुलाखतींच्या माध्यमातून पक्षसंघटनासह सामाजिक कार्याबाबत विचारणा होत असली तरी खर्च किती करणार, हाच मुख्य निकष असल्याचे सांगितले जात आहे. 

निवडणुका आल्या की पक्ष कार्यालये गजबजू लागतात. त्यातही पालिका निवडणुकांच्या वेळी तर चांगलीच गर्दी होत असते. सध्या जळगाव महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने हे चित्र बघायला मिळत आहे. कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी होतेय ती प्रामुख्याने उमेदवारीसाठी. 
जळगाव महापालिका निवडणुकीत प्रमुख पक्ष म्हणून भाजपसह सत्ताधारी खानदेश विकास आघाडी-शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्याकडे चांगलीच गर्दी झाली आहे. यांच्यासह समाजवादी पक्ष, आप, मनसेकडूनही उमेदवारांना आवाहन करण्यात आले असून त्यांच्याकडेही ओघ सुरू झाला आहे. आठवडाभरापासून इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. प्रभाग व आरक्षित प्रवर्गनिहाय मुलाखती घेतल्या जात आहेत. 

उमेदवार ठरलेले 
गेल्या अनेक वर्षांचा अनुभव हा आहे की या मुलाखती केवळ दाखविण्यापुरत्या असतात. प्रत्यक्षात विविध राजकीय पक्षांचे बहुतांश उमेदवार ठरलेले असतात. याही वेळी तीच स्थिती आहे. कोणाला कुठल्या प्रभागातून उतरवायचे, हे पक्के झालेले आहे. मात्र, मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची केवळ चाचपणी केली जात आहे. 

पैसा किती लावणार 
अलीकडे निवडणुका प्रचंड महाग झाल्या आहेत. खर्चाची मर्यादा असली तरी ती पाळणे उमेदवार व पक्षांच्या व्यक्तिगत आचारसंहितेत कधीच बसले नाही, बसत नाही. त्यामुळे या मुलाखती घेतानाही प्रमुख निकष पैसा किती खर्च करणार, हाच असल्याचे सांगितले जात आहे. अर्थात, जोडीला सामाजिक कार्य, पक्ष संघटन म्हणून योगदानासह जातीय समीकरणही लक्षात घेतले जात आहे, हा भाग वेगळा. अशीच उमेदवारी ठरत असली तर मुलाखतींचा फार्स कशाला? असा सामान्य प्रश्‍न कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे. अर्थात, यामुळे सामान्य व गरीब कार्यकर्ता मात्र प्रत्येकवेळी निवडणुकीतील उमेदवारीच्या प्रक्रियेपासून वंचित राहतो.

Web Title: marathi news jalgaon umedvar interview