वाकडी'तील विकृती अन्‌ बेजबाबदारपणाचं विकृत दर्शन! 

सचिन जोशी
सोमवार, 18 जून 2018

जामनेर तालुक्‍यातील वाकडी गाव आठवडाभरात अचानक प्रकाशझोतात आलं... तेदेखील जिल्ह्यात, राज्यात नव्हे; तर देशभरात. पण, दुर्दैवानं एका वाईट अन्‌ नकारात्मक गोष्टीनं. लहान मुलांच्या खोडीला अमानुष मारहाणीची शिक्षा करणाऱ्या शेतमालकाच्या कृत्यावरून. वाकडीतील घटना विकृतीचंच दर्शन घडविते. मात्र, त्यानंतरच्या घडामोडीही बेजबाबदारपणाचं विकृत दर्शन घडविताहेत, हे वेगळं सांगायला नको. या घटनेकडं अल्पवयीन मुलांना अमानवी मारहाण यादृष्टीने न बघता त्यास जातीय रंग देण्याचा काही माध्यमं, कथित समाजसेवी आणि पुढे जाऊन त्यावर "राजकीय पोळी' भाजणाऱ्या राजकारण्यांचा बेजबाबदारपणा अधिक दुर्दैवी म्हणावा लागेल... 

खरंतर गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात अशा प्रकारच्या दोन दुर्दैवी घटना घडल्या. जळगावातील समतानगरात आठवर्षीय मुलीची अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले; तर त्यापाठोपाठ जामनेर तालुक्‍यातील वाकडी येथे मानवतेला लाजवणारा प्रकार "व्हायरल' झाला. दोन्ही घटना त्या- त्या जागी कमालीच्या गंभीर आहेत. त्यातील गांभीर्याबाबत तशी तुलनाही होऊ शकत नाही. तरीही केवळ जातीय रंग देत समाजातील वातावरण दूषित करण्याची, जातीय तेढीचे राजकारण करण्याची संधी वाकडीच्या घटनेत असल्याने समाजातील संधिसाधूंनी ती हेरली आणि त्या घटनेचेच अधिक भांडवल केल्याचे दिसून येईल. 
वस्तुत: वाकडी येथील घटना भटक्‍या- विमुक्त समाजाचा शेतमालक आणि अनुसूचित जातीच्या अल्पवयीन मुलांमधील वैयक्तिक वादाचा परिणाम आहे. विहिरीत पोहण्याच्या कारणावरून मालकाने कोवळ्या मुलांना (मग ते कुठल्याही जातिधर्माचे असो) अशा प्रकारे बेदम मारहाण करत, त्याचा व्हिडिओ करणे, तो व्हायरल करणे याला विकृतीच म्हटली पाहिजे. हे विकृत कृत्य निंदनीय आहेच, याबद्दलही कुणाच्या मनात शंका नाही. मात्र, या मारहाणीच्या कारणाकडे केवळ जातीय अस्पृश्‍यता, विहीर बाटविण्याच्या पैलूने पाहणे मूर्खपणाचे ठरेल आणि त्यालाही विकृतीच म्हणावे लागेल. 

अर्थात, ही विकृती आहे, हे माहीत असूनही समाजातील काही घटक त्यामागे धावत सुटले. स्थानिक व बाहेरच्या नेत्यांसह अगदी राष्ट्रीय पातळीपर्यंत या घटनेचे पडसाद उमटले. अपुऱ्या माहितीच्या आधारे किंवा स्थानिक नेत्यांच्या चुकीच्या "इनपुट्‌स'द्वारे राहुल गांधींनीही या घटनेला थेट "सवर्ण-दलित' वादाचा रंग देत आपले अज्ञात जगासमोर आणखी एकदा उघड केले. राजकीय पक्षांनी अशा प्रश्‍नांवरून राजकारण करू नये, अशी अपेक्षा करणेही मूर्खपणाचे. म्हणून या घटनेत राजकारण होणेही स्वाभाविक आहे आणि तसे ते होतेय... 

या घटनेप्रकरणी शेतमालकासह शेतातील गड्याविरुद्ध "ऍट्रॉसिटी'सह पोक्‍सो, आयटी ऍक्‍टअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या आरोपींना कठोर शासन झालेच पाहिजे. मात्र, या घटनेच्या निमित्ताने समाजात तेढ निर्माण करण्याचा "आगीत तेल ओतण्या'सारखा प्रकार पुन्हा अनुभवायला मिळाला. अशा घटनांमध्ये समाज व प्रसारमाध्यमांची भूमिका तशी खूप महत्त्वाची ठरते. अनियंत्रित व उत्तरदायित्व नसलेल्या "सोशल मीडिया'च्या मागे "ओरिजिनल' मीडियाही वाहवत जातो; किंबहुना हा "सोशल मीडिया'च प्रिंट, इलेक्‍ट्रॉनिक मीडियाला "ऑपरेट' करतोय की काय, अशी स्थिती निर्माण होणे, हे आपल्या तंत्रज्ञानाने प्रगत (?) झालेल्या समाजाचे दुर्दैवच... 

Web Title: marathi news jalgaon vakli