जलसंपदामंत्र्यांच्या गोटातील अनेकांना धडकी; वनजमीन फसवणूक प्रकरण

जलसंपदामंत्र्यांच्या गोटातील अनेकांना धडकी; वनजमीन फसवणूक प्रकरण

जळगाव : वाघूर धरणक्षेत्रात कंडारी- भागपूर शिवारात नजर पोचेल तिथवर वनविभागाच्या मालकीची जागा परस्पर गट क्रमांकात उपगट क्रमांक निर्माण करून बोगस कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. दाखल गुन्ह्यांत 11 पैकी 6 संशयित "पॅदे' अटकेत असून, मास्टरमाइंड वाळूमाफिया मुकुंद ठाकूरसह वकील, बिल्डर, स्थानिक गावगुंडांच्या टोळीसह जलसंपदामंत्र्यांच्या गोटातील "चिकन्या' चेहऱ्याचा गुन्ह्यात संशयित म्हणून सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी अभ्यासाअंती समोर आले आहे. 
शिवाजीनगर पुलावर दोन पोलिस कर्मचाऱ्यांना चिरडून ठार मारण्याच्या प्रयत्नात जुलै 2016 मध्ये दाखल प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात फरार संशयित मुकुंद बलविंदरसिंग ठाकूर "मास्टरमाइंड' आहे. त्याच्यासह त्याचा भाऊ सुरेंद्र बलविंदरसिंग ठाकूर (दोन्ही रा. बालाजीपेठ), कंडारीचा तलाठी रवींद्र पंढरीनाथ बहादुरे (रा. गुजराल पंप), ऍड. प्रदीप निवृत्तिनाथ कुळकर्णी (रा. दादावाडी, जळगाव), रूपेश भिकमचंद तिवारी (इंद्रप्रस्थनगर), सतीश प्रल्हाद सपकाळे (रा. भारत डेअरी, नवीपेठ), कैलास दशरथ बारी, राजेंद्र बुधोजी बारी, सुभाष दशरथ बारी, गणेश बारी, सुनील दशरथ बारी (सर्व रा. नवीपेठ) ही संशयितांची नावे समोर आली आहेत. तिन्ही गुन्ह्यांत स्टॅम्पवेंडर बारी बंधू आणि मुख्य संशयित मुकुंद ठाकूर कायम आहेत. संशयित म्हणून शहरातील गुंड टोळ्यांचे सरदार, नगरसेवकांसह महापालिकेतील पदाधिकारी आणि विशेष म्हणजे जलसंपदामंत्र्यांच्या संपर्कातील संशयित तपासात निष्पन्न होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

अटकसत्रात 6 जणांना बेड्या 
रूपेश तिवारी, कैलास दशरथ बारी, राजेंद्र बारी, सुभाष बारी, गणेश बारी, सुनील बारी, अशा सहा संशयितांना पथकाने अटक केली आहे. मुकुंद ठाकूरच्या घरावर पथक गेले. मात्र, खाली हात परतले. अटकेतील संशयितांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. 


नजर पोचेल तिथवर विक्री! 
मौजे भागपूर गट क्रमांक 64, 65, 66, 76, 102, 121, 126, 135, 136, कंडारी शिवारातील गट क्रमांक 372, 12, 13, उमाळे शिवार व परिसरातील वनविभागाच्या अखत्यारीतील 378 हेक्‍टर 72 आर इतक्‍या प्रचंड मोठ्या प्रमाणात जमिनीचा जागीच सौदा करून खरेदी- विक्री होऊन पहिल्याच तीन तक्रारींत फसवणुकीचा आकडा नऊ कोटी सात लाख 10 हजारांपर्यंत पोचला आहे. हा आकडा 500 कोटींच्या वर पोचण्याची शक्‍यता जाणकारांतर्फे वर्तवली जात आहे. 

तक्रारदारांना धमक्‍या..
जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या समितीने अहवाल दिल्यानंतर संशयितांनी वनजमिनीचा गट क्रमांक 375 चे बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर उपगट जोडून सरकारी योजनेंतर्गत ही जमीन भूमिहीन शेतकऱ्यांना अल्प नजराणा भरून मिळणार असल्याची बतावणी करून त्यांचा खोटे सातबारा उतारे बनवून, नंतर ते संबंधितांना खरेदीखताने विक्री केल्याने जिल्हा प्रशासनाने फसवणूक झालेल्यांनीच पोलिसांत फिर्याद द्यावी, असे जाहीर केल्यानंतर तक्रार करू शकतील, अशांना निरोप पाठवण्यात आला. भाऊंना भेटून घ्या... तुमचे पैसे परत मिळून जातील, तक्रार केली तर होणार काही नाही. तुमचेच बरे-वाईट होण्याची भीती दाखविली जात आहे. परिणामी आज तीन तक्रारदार पोचले असून, आणखी तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com