जलसंधारणाच्या तंत्राने जोपासला वनसंवर्धनाचा मंत्र 

अमोल कासार
मंगळवार, 23 जुलै 2019

जळगाव : दिवसेंदिवस वनक्षेत्र कमी होत असल्याने पर्जन्यमान्याचे प्रमाणात देखील कमी होत आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील बहुतांश गावांना दुष्काळाची झळा सोसावी लागली. मात्र यावल वनक्षेत्रात ओघळ नियंत्रण, माती, दगडी बांध यांसह नैसर्गिक पाणवठे ही जलसंधारणाची कामे पूर्ण झाली. त्यामुळे वनक्षेत्रातील जमीन ओलिताखाली आली असून दुष्काळी परिस्थितीत वनक्षेत्राची हानी झाली नाही. शिवाय, या वनक्षेत्रातील गावांना दुष्काळाचे सावट त्याठिकाणी दिसले नसल्याने जलसंधारणाच्या तंत्राने वनसंवर्धनाचा विकास चांगल्या पद्धतीने झाला आहे. 

जळगाव : दिवसेंदिवस वनक्षेत्र कमी होत असल्याने पर्जन्यमान्याचे प्रमाणात देखील कमी होत आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील बहुतांश गावांना दुष्काळाची झळा सोसावी लागली. मात्र यावल वनक्षेत्रात ओघळ नियंत्रण, माती, दगडी बांध यांसह नैसर्गिक पाणवठे ही जलसंधारणाची कामे पूर्ण झाली. त्यामुळे वनक्षेत्रातील जमीन ओलिताखाली आली असून दुष्काळी परिस्थितीत वनक्षेत्राची हानी झाली नाही. शिवाय, या वनक्षेत्रातील गावांना दुष्काळाचे सावट त्याठिकाणी दिसले नसल्याने जलसंधारणाच्या तंत्राने वनसंवर्धनाचा विकास चांगल्या पद्धतीने झाला आहे. 

सातपुडा पर्वताच्या पायथ्यालगत असलेल्या यावल वनपरिक्षेत्रात मोठ्याप्रमाणात वनक्षेत्र आहे. याठिकाणी सागवान, अंजन, घावडा या वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. वनसंवर्धानासाठी शासनाच्या 33 कोटी वृक्षलागवडीतंर्गत गेल्या चार वर्षांत मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्यांचे संवर्धन देखील केले जात आहे. अर्थात, या वृक्षलागवडीपैकी किती वृक्ष जगली, याबाबत शंका व्यक्त होत असते. 

यंदा यावल वनक्षेत्रासाठी 30 लाख 29 हजार वृक्षांच्या लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत 15 लाख वृक्षांची लागवड पूर्ण करण्यात आली आहे. या माध्यमातून जवळपास 50 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम येत्या महिनाभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. 

वनसंपदा चोरणाऱ्यांवर नजर 
सातपुड्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असून त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट करून त्याची अवैध वाहतूक केली जात असते. याला आळा घालण्यासाठी वनविभागातर्फे ठिकठिकाणी एसआरपी कॅम्पसह वनरक्षकांचे फिरते पथकाकडून त्यांच्यावर करडी नजर ठेवली जात असते. 

आगीवर नियंत्रणासाठी 27 पथके 
उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे वनांमध्ये आगीच्या घटना घडतात. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपवनसंरक्षक प्रकाश मोराणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल यांसह वनसंरक्षकांची 27 पथके तयार करण्यात आली आहे. या पथकाकडून उन्हाळ्यात वनात लागणाऱ्या आगीवर नियंत्रण ठेवले जाते. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी आगीमुळे वनसंपदेचे नुकसान कमी झाले. 

पाच हजार कुटुंबांना गॅस 
यावल वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात दुर्गम ठिकाणी आदिवासींची लहान लहान गावे आहेत. या ठिकाणांवरील लोक स्वयंपाकासाठी वनसंपदेचा वापर करीत होते. वनविभागाने ही तोडली जाणारी वनसंपदा वाचविण्यासाठी प्रत्येक गावात संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करीत त्यांच्या माध्यमातून 25 गावांतील 5 हजार कुटुंबांना मोफत गॅस कनेक्‍शन मिळवून दिले. 

वनपर्यटनस्थळांचा विकास 
यावल वनक्षेत्रामध्ये पाल, उनपदेव, मनुदेवी, कमळजादेवी ही देवस्थान व पर्यटनस्थळे आहेत. याठिकाणी दरवर्षी पर्यटक येत असल्याने जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून या क्षेत्रांचा विकास करण्यात आला आहे. 

अतिक्रमणाविरोधात खटले 
यावल वनक्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाली होती. वनविभागाकडून स्थानिक पोलिस व एसआरपींना सोबत घेऊन वनविभागाच्या कार्यक्षेत्रात झालेले अतिक्रमण कारवाई करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला देखील दाखल करण्यात आला आहे. 

वन्यजीवांचा मुक्त संचार 
यावल अभयारण्यात पूर्वीपासूनच वाघ, बिबट्या, काळवीट, चित्ता, रानडुक्कर, नीलगाय या वन्यजीवांचा वावर आहे. वनक्षेत्र कमी झाल्यामुळे हे वन्यजीव गावाकडे वळत असल्याने वनविभागातर्फे गेल्या काही वर्षात अभयारण्यात वृक्षसंवर्धन केले. यामुळे आता हे वन्यजीव अभयारण्याच्या क्षेत्रातच संचार करीत असतात. 

वनक्षेत्राच्या संवर्धनासाठी वनविभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असतात. बऱ्याचदा अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र नष्ट होते, त्यावरील नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जातात. अपुऱ्या कर्मचारीबळामुळे काही प्रमाणात कारवाईला मर्यादा येतात. मात्र, स्थानिक लोकांमध्ये जनजागृती करून हे काम अविरत सुरू आहे. 
- प्रकाश मोराणकर, उपवनसंरक्षक, यावल वनविभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon vansanvandharn day jalsandharan