विहिरींनी गाठला तळ; टँकरही फिरकेना! 

live photo
live photo

मेहुणबारे (ता. चाळीसगाव)ः अभोणे गाव व तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. सद्यःस्थितीत दोन्ही ठिकाणी आठ दिवसांपासून पाण्याचे टँकर बंद आहेत. दरम्यान, तांड्यावर आठ दिवसांत सात विवाह सोहळे पार पडले. मात्र, लग्नसोहळ्यालाही विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. 
अभोणे गावात व तांड्यावर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आजूबाजूच्या शेतातून पाणी आणावे लागते. अभोणे गाव व तांडा हे कळमडू ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येतात. तांड्याजवळच्या ग्रामपंचायतीच्या विहिरीला पाणी नसल्याने नळाद्वारे पाणीपुरवठा होत नाही. 

लग्नसोहळ्यांना पाणीटंचाई ग्रहण 
अभोणे तांडा येथे आठ दिवसांत सात विवाहसोहळे पार पडले. या सोहळ्यांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. तांडा वस्तीलगतच्या काही विहिरींना पाणी आहे. मात्र, ज्यांची आहे, त्यांनाही टंचाई भासेल, यामुळे ते भरू देत नाही. पन्नास रुपये खर्च करून दोनशे लिटर पाणी येथील ग्रामस्थांना विकत घ्यावे लागते. एका लग्नासाठी दहा हजार लिटर टँकरचे पाणी लागत आहे. विवाहसोहळा पाण्याअभावी पुढे ढकलावे लागत आहे. 

टँकर बंद 
अभोणे गाव व तांडा येथील पाणीटंचाई संदर्भात पंचायत समितीकडून पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले होते. आठ दिवसांपासून प्रशासनाने येथील दोन्ही गावाचे टँकरचे पाणी बंद केले आहेत. त्यामुळे तांड्यावर व गावात पाण्यासाठी महिलांना एक ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. या दोन्ही ठिकाणी प्रशासनाने अचानक पाण्याचे टँकर बंद का केले? असा प्रश्न आता ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. पाण्याच्या शोधासाठी दाहीदिशा भटकावे लागत आहे. अभोणे गाव व तांड्यावर प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, आशी मागणी होत आहे. 

हातपंपावर २४ तासात भरतात दोनच हंडे 
अभोणे गावात दोन हातपंप आहेत. यातील एक बंद आहे. तर दुसरा सुरू असला तरी दिवसभरात त्याला केवळ दोनच हंडे पाणी येत असल्याचे ग्रामस्थांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. त्यामुळे दोन हंडे पाणी भरण्यासाठी या हातपंपावर ग्रामस्थांच्या भांड्यांची लांबलचक रांग लागलेली असते. अजून मे महिना जायचा असल्याने यापेक्षाही गंभीर परिस्थिती होण्याची वाट न पाहता, प्रशासनाने अभोणेकरांची पाण्याची समस्या तातडीने सोडवावी, अशी आर्त मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. 

प्रशासन दखलच घेत नाही 
कविता पाटील सरपंच :- अभोणे गाव व तांड्यावरील पाण्याचे टँकर प्रशासनाने अचानक बंद करून टाकले.लगेचच आम्ही बंद टँकर सुरू करण्यासाठी गटविकास अधिकारी यांना या संदर्भात पञ पाठवले.प्रशासनाने या पञाची कुठलीही दखल घेतली नाही.यामुळे आज दोन्ही ठिकाणच्या महीलांसह ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.प्रशासनाने येथील पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडवावा. 


रोजंदारी बुडवावी लागते 
वंदना राठोड ः आमच्याकडे कुठलेच वाहन नाही. कामाला गेली तरच पोटाला खायला मिळेल, अशी परिस्थिती आहे. सध्या पाण्यासाठी रोजंदारी बुडवावी लागत आहे. पाणी भरताना विहिरीत पडण्याची भीती असते. कोणाचा तरी जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल का? 

दिवसभर पाण्याचाच ध्यास 
सुरेखा चव्हाण : मी माहेरी आली असून मला सुद्धा पाण्यासाठी शेत शिवारात पायपीट करावी लागत आहे. घरात पाणी नसल्याने कोणत्याच कामात चित्त लागत नाही. दिवसभर पाण्याचाच विचार असतो. पाण्यासाठी महिलांचेच जास्त हाल होत असतात. एवढी गंभीर समस्या निर्माण झालेली असताना प्रशासनाने टँकर बंद का केले? 

अभोणे तांड्यावर मी नुकताच जावून आलो. कोणीही पाण्याची समस्या मांडली नाही. या दोन्ही ठिकाणी पाण्याची काय अडचण आहे. त्यासंदर्भात माहिती घेऊन तातडीने उपाययोजना करण्यात येतील. 
- अतुल पाटील गटविकास अधिकारी, चाळीसगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com