विरोधक एकमेकांना म्हणू लागले ‘कहो ना प्यार है......!’ 

प्रा. सी. एन. चौधरी
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

शिवसेना- भाजप युती संदर्भात वर्षभरापासून सुरू असलेल्या चर्चा व शंका- कुशंकांचे गुऱ्हाळ युतीच्या निर्णयानंतर आता थांबले आहे. युती झाली असली तरी पुढे काय? दुभंगलेली मने कधी व केव्हा जोडणार? हे प्रश्न मात्र कायमच आहेत. पाचोरा-भडगाव मतदारसंघात तर सेना- भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असलेले मतभेद विकोपाला जाऊन पोलिसांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे दोघांतील मतभेद व सूडभावना संपेल काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वरिष्ठ पातळीवर युती झाली पण स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते कसे एकत्र येणार? हे यात महत्त्वाचे आहे.

शिवसेना- भाजप युती संदर्भात वर्षभरापासून सुरू असलेल्या चर्चा व शंका- कुशंकांचे गुऱ्हाळ युतीच्या निर्णयानंतर आता थांबले आहे. युती झाली असली तरी पुढे काय? दुभंगलेली मने कधी व केव्हा जोडणार? हे प्रश्न मात्र कायमच आहेत. पाचोरा-भडगाव मतदारसंघात तर सेना- भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असलेले मतभेद विकोपाला जाऊन पोलिसांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे दोघांतील मतभेद व सूडभावना संपेल काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वरिष्ठ पातळीवर युती झाली पण स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते कसे एकत्र येणार? हे यात महत्त्वाचे आहे. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते जसजशा निवडणुका जवळ येतील त्याप्रमाणात परस्पर विरोधी मतभेद विसरून एकमेकांजवळ जाऊन जबरदस्तीने ‘कहो ना प्यार है....!’ म्हणत कशा प्रकारे दाद, साद व सहकार्य मिळविण्यात कितपत यशस्वी होतात? हे येणारा काळच स्पष्ट करणार आहे. 
 
गेल्या साडेचार वर्षांच्या काळात शिवसेना भाजपच्या वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या विरोधात अक्षरशः गरळ ओकली. स्वबळ दाखविण्याच्याही धमक्या दिल्या आणि आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोघांनी गळ्यात गळा घालून युतीच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्याचा निर्धार केला आहे. किंबहुना, पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणूकप्रसंगी प्रचाराच्या मुद्द्यावरून खासदार ए. टी. पाटील व आमदार किशोर पाटील यांच्यात पडलेली वादाची ठिणगी गेल्या साडेचार वर्षांपासून धगधगत असून, आता त्याचा वणवा चांगलाच वाढला आहे. 
आमदार किशोर पाटील यांनी भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन व खासदार ए. टी. पाटील यांना अनेकदा खुले आव्हानही दिले आहे. त्या आव्हानाला दोघा लोकप्रतिनिधींनी सरळ उत्तर दिले नसले, तरी छुप्या पद्धतीने दोघांतील एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युती होणार नाही, या विचाराने मंत्री महाजन यांनी आमदार किशोर पाटील यांच्याविरोधात बऱ्याच इच्छुकांना आश्वासन देऊन कामाला लावले. स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून टीकाटिपणी व विरोध केला असा शिवसेनेचा सरळ आरोप आहे. पंचायत समितीत भाजपची सत्ता असल्याने विविध योजना, कामे व बैठकांमधून शिवसेना- भाजपतील मतभेद उघडपणे स्पष्ट झाले. पाणीटंचाई आढावा बैठकीच्या कारणावरून दोघांतील मतभेदांनी तर पोलिस स्टेशन गाठले. शिवसेनेच्या १३ पदाधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. त्यानंतर पंचायत समितीच्या सभापती विरोधातही गुन्हा दाखल झाला. 
आमदार किशोर पाटील यांनी जनसंवाद कार्यक्रमासह शिवसेनेच्या बैठकांमध्ये मंत्री महाजन व खासदार ए. टी. पाटील यांचा समाचार घेण्याची एकही संधी आतापर्यंत सोडली नाही. मंत्री महाजन व खासदार पाटील यांनी जनतेसमोर येऊन आपण केलेली कामे सांगावीत, मंत्री महाजनांनी माझ्या विरोधात उमेदवाराचा शोध न घेता व नको त्यांना खतपाणी न घालता स्वतः माझ्यासमोर उभे राहावे व अजमावून घ्यावे असे खुले आव्हान आमदार किशोर पाटील यांनी दिले. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार आर. ओ. पाटील यांनी उमेदवारी निश्चित मानून गेल्या वर्षभरापासून सुरू केलेली तयारी तसेच जामनेर मतदारसंघात शिवसेनेचे दिपकसिंह राजपूत यांनी सुरू केलेली तयारी यासोबतच पाचोरा मतदारसंघात आमदार किशोर पाटील यांना आव्हान देण्यासाठी अमोल शिंदे, डॉ. संजीव पाटील, प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांना उमेदवारी देण्यासाठीची गिरीश महाजन यांची भूमिका या बाबी दोघांमधील मतभेद व 
ओढाताण वाढविणाऱ्या ठरल्या. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचा सूरही आतापर्यंत व्यक्त होत राहिला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तर एकमेकांना कट्टर शत्रू मानून झुंजत राहिले. विविध कार्यक्रम व मेळाव्याप्रसंगी एकमेकांच्या विरोधात उघडपणे बोचरी घोषणाबाजी ही आतापर्यंत झाली. दोघांतील संबंध कमालीचे ताणले गेलेले असताना आता दोघात युती झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांची मोठी पंचाईत झाली आहे. कार्यकर्ते उघडपणे आपल्या भावना व्यक्त करू लागले आहेत. आपापसातील मतभेद विसरून एकमेकांजवळ जाऊन खांद्याला खांदा लावून एकमेकांचा प्रचार करायचा कसा? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असले तरी इच्छा व मानसिकता नसताना शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांना नाइलाजाने एकमेकांना ‘कहो ना प्यार है....’ म्हणत निवडणुकांची तळी उचलावी लागणार हे मात्र निश्चित ! 
 

Web Title: marathi news jalgaon virodhak yuti