पाणी आरक्षण बैठकीस मुहूर्त मिळेना

पाणी आरक्षण बैठकीस मुहूर्त मिळेना

जळगाव ः जिल्ह्यात यंदा दुष्काळजन्य परिस्थिती आहे. यामुळे तीव्र पाणीटंचाईची स्थिती आहे. गिरणा धरणातून नाशिक जिल्ह्याला पाणी सोडण्यावरून एक ऑक्‍टोबरला लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी आवाज उठवून जिल्ह्याचे पाणी नाशिकला जाऊ देणार नाही, असे सांगत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाद घातला होता. आता 26 दिवस झाले, तरी पाणी आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधींची बैठक झालेली नाही, हे विशेष. 
गिरणा धरणातून नाशिक जिल्ह्यातून मालेगावसह इतर गावांना पाणी सोडण्याबाबत गिरणा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एक ऑक्‍टोबरला मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर खासदार ए. टी. पाटील, आमदार डॉ. सतीश पाटील, किशोर पाटील, उन्मेष पाटील यांनी गिरणेच्या पाण्यावर अगोदर जळगाव जिल्ह्याचा आहे, असे सांगत पाणी इतर जिल्ह्यांना देऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाणी सोडण्याच्या प्रश्‍नावर जिल्हा प्रशासनाला सर्व लोकप्रतिनिधींची व गिरणा पाटबंधारे अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे सांगितले होते. नियोजन समितीच्या बैठकीनंतर सोळा दिवसांनी 17 ऑक्‍टोबरला पाणी आरक्षणाबाबत बैठक दुपारी तीनला ठरविली होती. मात्र, ती आदल्या दिवशी तांत्रिक कारण दाखवून रद्द केली. 
गिरणातून पाण्याचे आवर्तन न सोडल्यास गिरणापट्ट्यातील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागेल. जनावरांनाही पाणी मिळणाणार नाही, अशी स्थिती आहे. यामुळे लोकप्रतिनिधींनी गिरणेतून अगोदर गिरणापट्ट्यात आवर्तन सोडावे, अशी मागणी करून नाशिक जिल्ह्याला पाणी देण्यास विरोध दर्शविला होता. 
धरणातील पाण्यावर ज्या गावांचे आरक्षण आहे ते द्यावेच लागेल, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाची आहे. यामुळे इतर जिल्ह्यांना पाणी देऊ देणार नाही, असे चालणार नाही. यात तडजोड करून मार्ग काढावा लागेल. त्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गिरणा पाटबंधारे धरणाचे अभियंता, लोकप्रतिनिधी यांची बैठक बोलावून नेमकी काय परिस्थिती आहे, याची माहिती समोर येणे आवश्‍यक आहे. अन्यथा एकीकडे पाणीटंचाई वाढत जाईल अन्‌ वेळ निघून गेली, अशी म्हणण्याची वेळ प्रशासनावर येऊ नये एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे. 

 
पाणी आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधींची बैठक गत आठवड्यातच होणार होती. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे बैठक पुढे ढकलण्यात आली. आगामी आठवड्यात पाणी आरक्षणाबाबत बैठक आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 
- राहुल मुंडके, निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com