जगणं झालं कठीण अन्‌ जीव झाला स्वस्त! 

जगणं झालं कठीण अन्‌ जीव झाला स्वस्त! 

कारण अगदीच किरकोळ.. पोलिसांत तक्रार केल्याचं. त्यावरून राग इतका अनावर व्हावा की, दोन-चार जणांनी मिळून भर रस्त्यात, दिवसाढवळ्या एका व्यक्तीचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला. एकीकडे महामार्ग, शहरातील रस्त्यांवरून वापरणं अन्‌ पर्यायानं जगणं कठीण झालंय.. तर दुसरीकडे, गुंडांच्या दहशतीनं जीव अगदीच स्वस्त. जळगावसारख्या लहान महानगरातही आता भरदिवसा हत्या, प्राणघातक हल्ले होऊ लागले याचा अर्थ कायद्याचा धाक राहिलेला नाही, हे वेगळे सांगण्याची आवश्‍यकता नाही. 

नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी ज्या महत्त्वपूर्ण बाबींना हात घातला, त्यापैकी "स्मार्ट सिटी' ही योजना अग्रभागी होती. त्यानंतरच्या पाच- सहा वर्षांत किती शहरं "स्मार्ट' झालीत, हा प्रश्‍न आहे. पण, ज्या देशातील शहरी आणि ग्रामीण जनतेचं जगणंच कठीण असेल, अशा देशात शहर आणि गाव "स्मार्ट' कधी आणि कशी होतील? जळगावसारख्या छोटा जीव असलेल्या शहरानं तर हे स्वप्नच पाहू नये, अशी स्थिती. 
गेल्या काही महिन्यात, वर्षांत जळगावही आता "क्राइम सिटी' म्हणून कुख्यात होऊ लागलेय. काही महिन्यांपूर्वी जळगावातील प्रसिद्ध मू. जे. महाविद्यालयातील पार्किंगमध्ये तरुणाची भरदिवसा चॉपरने भोसकून हत्या करण्यात आली. तत्कालिक कारण पार्किंगचा वाद सांगितले जात असले तरी त्यामागे पूर्ववैमनस्य असल्याचे नंतर समोर आले. पूर्ववैमनस्य असले तरी, क्षुल्लक कारणावरून या घटनेत तरुणाचा बळी गेला. नंतरच्या कालावधीतही सातत्याने जळगाव शहरात हाणामारी, प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडत गेल्या. मनसे कार्यकर्ता श्‍याम दीक्षितच्या खुनाची घटनाही ताजीच आहे. बिअरबारमध्ये टेबलवर बसण्याच्या वादातून ही हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी वाटत असले तरी त्यामागे मोठे कारण व राजकीय पदाधिकारी असल्याची चर्चा आहे. महिन्यातून किमान तीन-चार वेळा अशाप्रकारच्या हल्ल्याच्या घटना घडत असून, पोलिस यंत्रणा या घटनांसमोर हतबल झाल्याचे दिसत आहे. 
मुळात या घटनांमागे भरटकलेली तरुणाई असल्याचे तज्ज्ञ सांगतात. एकतर जळगावात ठराविक वगळता उद्योग विकसित झालेले नाहीत. एमआयडीसीची सध्याची स्थिती बिकट आहे. आहे ते उद्योग बंद पडत असून, बेरोजगारीचे प्रमाण कमालीचे वाढत आहे. जे चांगले शिक्षित तरुण आहेत, ते स्थलांतरित होऊन मुंबई-पुण्याला स्थायिक होताना दिसताहेत. उर्वरित तरुणांचे काय? हा प्रश्‍न कायम आहे. अशा बेरोजगार तरुणाईतूनच मग गुन्हेगारी उदयास येते, आणि ती जोर धरू लागते. दुर्दैवाने या तरुणाईला दिशा देणारी व्यवस्था आपल्याकडे नाही आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणारी पोलिस यंत्रणा केवळ बघ्याच्या भूमिकेत आहे. 
शनिवारच्या बांधकाम ठेकेदाराच्या हत्या प्रकरणात या घटनेआधी संबंधित ठेकेदाराच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे संबंधित मारेकऱ्यांबद्दल दोन-तीन तक्रारी केल्या होत्या. तात्पुरत्या कारवाईव्यतिरिक्त त्यात काही झाले नाही. पोलिसांनी वेळीच कठोर भूमिका घेतली असती, तर ही हत्या टळू शकली असती, असा मृत ठेकेदाराच्या नातलगांचा दावा आहे. असे खरोखरच असेल तर पोलिस यंत्रणा नेमकी काय करतेय? 
शहरात विकासकामे होणार नाहीत.. रस्त्यांचे भाग्य उजळणार नाही, त्यातील खड्डे सामान्यांचे बळी घेत राहणार.. महामार्ग मृत्यूचा मार्ग म्हणून दररोज बळी घेतोय.. उद्योग विकसित होणार नाहीत, व्यवसाय चालणार नाहीत. मग, बेरोजगारी आणि त्यातून उदयास येणारी गुन्हेगारी वाढणार नाही तर काय होणार? चोऱ्या, दरोडे, घरफोड्या तर पोलिस थांबवू शकले नाहीत. आणि अशात खून, प्राणघातक हल्ले असे भरदिवसा होत राहिले तर शहरात दहशतीचे साम्राज्य पसरून सामान्यांचे आधीच कठीण झालेले जगणे अधिकच वेदनादायी होईल.. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com