Loksabha 2019 : "त्या' दोघी राजकीय महिलांच्या भावनांचे अश्रू! 

कैलास शिंदे
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

जळगाव ः लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी पक्षाने कापल्याने त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; तर लोकसभेच्या रावेर मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन केले, त्यावेळी त्यांचे सासरे एकनाथराव खडसे हे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाही मोबाईलवरून कार्यकर्त्यांना रक्षा खडसेंना विजयी करण्याचा संदेश दिला, त्यावेळी त्यांनीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यामुळे उपस्थितांची मने हेलावली. 

जळगाव ः लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी पक्षाने कापल्याने त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; तर लोकसभेच्या रावेर मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन केले, त्यावेळी त्यांचे सासरे एकनाथराव खडसे हे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाही मोबाईलवरून कार्यकर्त्यांना रक्षा खडसेंना विजयी करण्याचा संदेश दिला, त्यावेळी त्यांनीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यामुळे उपस्थितांची मने हेलावली. 
"रोते रोते हसना सिखो... हसते हसते रोना...!' हे "अंधा कानून' चित्रपटातील गीत जीवनातील सुख-दु:खाच्या क्षणाचा सार सांगून जाते. जीवनात कोणत्या क्षणी तुमच्या सुख-दु:खाचे क्षण येतील, त्यावेळी डगमगून जाऊ नका. त्याला सामोरे जा. अगदी याच गीताच्या ओळीचा सार जिल्ह्यातील दोन राजकीय महिलांना लागू पडत आहे. लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील उमेदवार आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी पक्षाने अचानक रद्द केल्याने त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; तर रावेर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी आज प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन केले, त्यावेळी त्यांचे सासरे एकनाथराव खडसे यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाही मोबाईलवरून कार्यकर्त्यांना रक्षा खडसेंना विजयी करण्याचा संदेश दिला. त्यावेळी रक्षा खडसेंनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 
जळगाव मतदारसंघात भाजपतर्फे आज जोरदार घडमोडी घडल्या. पक्षाच्या अधिकृत उमेदवार आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून चाळीसगाव येथील आमदार उन्मेष पाटील यांना ती देण्यात आली. त्यामुळे आमदार स्मिता वाघ यांचा गट नाराज झाला आहे. स्मिता वाघ यांना मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक- कार्यकर्ते भेटण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांनीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षादेशाबाबत समाजावून सांगितला. आपण निष्ठावान आहोत. पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे आपण कार्य करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून कार्यकर्त्यांचे डोळेही पाणावले. 

रक्षा खडसेही रडल्या... 
रावेर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार व भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांच्या मतदारसंघात प्रचार कार्यालय उद्‌घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, त्यांचे सासरे एकनाथराव खडसे अनुपस्थित होते. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत आहेत. मात्र, तरीही त्यांनी कार्यकर्त्यांसाठी मोबाईलवरून संवाद साधला. ते म्हणाले, "आपण सिटीस्कॅनसाठी मुंबईत हॉस्पिटलमध्ये आहोत. आणखी दोन- तीन दिवसांनी आपण जळगावला येणार आहोत. मात्र, आजपर्यंत आपल्याला कार्यकर्त्यांच्या बळावरच यश मिळाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बळावरच रक्षा खडसेंचा विजय होईल. यावेळी उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली, त्यावेळी उपस्थित असलेल्यांची मनेही हेलावली. 

Web Title: marathi news jalgaon woman candidate political