योगसाधनेसोबतच हजारोंना मिळाला रोजगार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

जळगाव : इंद्रियांवर नियंत्रण मिळविण्यासह आरोग्य समृद्ध करणाऱ्या योगसाधनेचे गेल्या एक-दीड दशकात रुपडेच पालटून गेले असून, त्याकडे आता केवळ शरीर व मनःस्वास्थ्य म्हणून नव्हे; तर करिअरच्या दृष्टीनेही साधक बघू लागले आहेत. त्यातून हजारोंना रोजगार मिळाला असून, 21 जूनला जागतिक योग दिनाचा दर्जा मिळाल्यानंतर योगाला आधुनिक "टच'ही प्राप्त होत आहे. 

जळगाव : इंद्रियांवर नियंत्रण मिळविण्यासह आरोग्य समृद्ध करणाऱ्या योगसाधनेचे गेल्या एक-दीड दशकात रुपडेच पालटून गेले असून, त्याकडे आता केवळ शरीर व मनःस्वास्थ्य म्हणून नव्हे; तर करिअरच्या दृष्टीनेही साधक बघू लागले आहेत. त्यातून हजारोंना रोजगार मिळाला असून, 21 जूनला जागतिक योग दिनाचा दर्जा मिळाल्यानंतर योगाला आधुनिक "टच'ही प्राप्त होत आहे. 

योग म्हटला, की साधारणत: आसनांचीच कल्पना आपल्यासमोर उभी राहते; परंतु आसने योगाचा एक अष्टमांश भाग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यानधारणा आणि समाधी ही योगाची अष्ट अंगे आहेत. गेल्या तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र साजरा करण्यात येत असल्याने त्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. 

तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. यानिमित्त अनेक जणांनी योगसाधना करायला सुरवात केली. आज जगभरात "फिटनेस'साठी योगसाधनेची मोठी "क्रेझ' आहे. पण, पारंपरिक योगामध्ये बदल होऊन नवे "ट्रेंड' देशातही रुळू लागले आहेत. तणावमुक्तीसह "फिटनेस'साठी बरीच मंडळी याकडे वळत आहे. 
 

हजारोंना मिळाला रोजगार 
खानदेशात काही मोजक्‍या महाविद्यालयांमध्ये योगशिक्षण दिले जाते. यात डिप्लोमा, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह योगप्रवेश अभ्यासक्रमदेखील शिकविला जातो. नाशिक येथील योगविद्या गुरुकुलअंतर्गत दरवर्षी हजारो साधक योग प्रशिक्षण घेतात. महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. 
 
योगाला नृत्याविष्काराची जोड! 
पूर्वी योग हा फक्त आसनांपर्यंतच मर्यादित होता. मात्र, आता योगाचे स्वरूप बदलत असून, त्यातही नवनवीन प्रकार समोर येत आहेत. यात "रिदमिक योगा' हा प्रकार सध्या सर्वाधिक प्रचलित झाला असून, यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून येत आहे. 

सातवीला असताना मला योगाची आवड निर्माण झाली. यानंतर मी सतत योगा करत गेली. यातून माझे मन व आरोग्य प्रसन्न राहत असल्याने मी योग स्पर्धांमध्ये सहभागी होत गेले. आज मी योगातच करिअर करत असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविले. 
- राधिका पाटील 

शाळेत असताना मला योगाची आवड होती. त्यामुळे मी लहान कोर्सदेखील केला होता. लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी मी पुन्हा याकडे वळली. आज गर्भसंस्कार व योगनिद्रा या इतक्‍या आवश्‍यक गोष्टी झाल्या आहेत, की मी महिलांसह मुलींना शिबिरातून ते देण्याचा प्रयत्न करत आहे. 
- हेमांगिनी सोनवणे 

आई योगशिक्षिका असल्याने मी तिच्यासोबतच योगा करत असे. विविध योग स्पर्धांमध्ये सहभाग घेत मी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविले असून, मी सध्या योगाचे योग्य असे शिक्षण घेत आहे. यातच मला करिअर करायचे असून, तरुणाईचा यात सहभाग वाढवायचा आहे. 
- श्रद्धा पाटील 

Web Title: marathi news jalgaon yoga