चोपड्याच्या शाळेत अवतरली थ्रीडी सूर्यमाला! 

live photo
live photo

चोपडा ः येथील विवेकानंद विद्यालयालतील विद्यार्थ्यांनी आभासी सूर्यमालेचा अनुभव घेत स्वत: ग्रह आणि सूर्यमाला हाताळली. थ्रीडी या आधुनिक तंत्रज्ञानाच्या किमयेतून हा आगळावेगळा प्रयोग राबवून शाळेने विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. 
विद्यालयात विविध उपक्रम राबवणारे कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी गुगलवरून ऑनलाइन एक्सप्लोरर फॉर मर्ज क्यूब’ हे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन डाउनलोड केले. त्यावरून क्यूब कसा तयार करावा, याची माहिती घेत कार्बन कॉपी करून या कॉपीद्वारे क्यूब तयार केला. या क्यूबला ‘स्पेस ४ डी’ हे मोबाईलमधील ॲपवर धरल्यास कृतीयुक्त प्रत्यक्ष हृदयाची स्पंदने, विविध भाग विद्यार्थ्यांना पाहता येतात. यात माहितीही सांगितली जाते. यामुळे टीव्हीवरील चित्रपट बघण्यापेक्षा द्रुकश्राव्य माध्यमातून आनंददायी शिक्षण घेत असल्याचा अनुभव येत आहे. याद्वारे या तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना भूगोल, विज्ञान, कला आदी विषयाचे ज्ञान दिले. यात खासकरून प्रत्येक ग्रह आणि त्याच्या उपग्रहांची माहिती, विविध मानवी अवयव (मेंदू, हृदय, डोळे, यकृत) अशा विविध संग्रहालयातील मूर्तींची माहिती थ्री-डी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत त्यांना ती स्वतः हाताळण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांची जिज्ञासू वृत्ती वाढत असल्याने त्यांची अध्ययन प्रक्रिया दर्जेदार होत आहे. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. 
मुलांना शाळेत आनंददायी शिक्षणाबरोबरच नावीन्यपूर्ण पद्धतीने शिक्षण मिळावे, त्यांच्यात कुतूहल, जिज्ञासा जागी व्हावी, मुलांमध्ये शिक्षणातील गोडी वाढून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा व स्मार्टफोनचा योग्य वापर करून शिक्षण घ्यावे, या उद्देशाने संध्या ए. टी. एम. अर्थात कृतिशील शिक्षक महाराष्ट्र ग्रुप अंतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विवेकानंद विद्यालय चोपडा येथे शाळेत सूर्यमाला, मानवी अवयव, संग्रहालयातील मूर्ती कशा बघाव्या, याबाबत माहिती देण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. 

डाउनलोड कसे करावे 
विसपुते म्हणाले, की मोबाईलमध्ये ‘एक्सप्लोरर फॉर्म क्यू’ हे ॲप गूगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून त्याची मार्कर इमेज असणारी मर्ज क्यूब डाउनलोड करून घ्यावी. मोबाईलमधील ॲप उघडून मर्ज क्युबवर स्कॅन केल्यास थ्रीडी स्वरूपात सूर्यमाला, मानवी अवयव, संग्रहालयातील मूर्त्या दिसतात. दिसणाऱ्या भागाला स्पर्श केल्यास त्याची माहिती प्रक्षेपित होते व त्या मुलांना अधिक चांगल्या पद्धतीने समजतात. दीर्घकाळ लक्षात राहतात व मुलांचा शिक्षणातील शिकण्याचा आनंद वाढतो. 

हे ॲप डाउनलोड करा 
स्पेस ४ डी, मिस्टर बॉडी, थ्री डी म्युझियम, ए. आर. मेडिकल, सूर्यमाला, मर्ज थिंग्स, ऑब्जेक्टिव्ह व्हीव्हर, मोमेंट ए. आर. हे फ्री ॲप डाउनलोड करून हे सर्व अभ्यासता येते. कोणत्या ॲपवर कोणती माहिती यासाठी लिंक आहे. त्यावरून अध्यपन करता येते. थ्री-डी इफेक्ट्स स्वतः विद्यार्थ्यांना अनुभवता येत आहे. 

खर्च एक रुपया 
विद्यार्थ्यांस घरी हे सर्व मोबाईलवर अनुभवता येणार आहे. कार्बन कॉपी काढून त्याचा क्यूब तयार करून ॲपद्वारा अनेक प्रिंट काढून अभ्यास करता येईल. प्रत्येक कॉपीसाठी एक रुपया खर्च येईल. मात्र, आनंददायी शिक्षण घरबसल्या घेता येईल. हा उपक्रम राबवण्यात विद्यालयातील उपशिक्षक पवन लाठी, जावेद तडवी, सरला शिंदे, नूतन चौधरी यांच्‍यासह सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, विश्वस्त सुधाकर केंगे, मंगला जोशी यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ, शिक्षकवृंद यांनी कौतुक केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com