लॉकडाउन'च्या काळात तनिष्कांचे "समाजभान' 

अमोल भट
मंगळवार, 7 एप्रिल 2020

सामाजिक कर्तव्य पार पाडत असताना तालुक्‍यातील टहाकाळी आणि सुसरी येथील ग्रामपंचायतीमार्फत प्रत्येकी 1 हजार मास्कची खरेदी करण्यात आली आहे

जळगाव  : शासनाने घालून दिलेल्या वैयक्तिक स्वच्छता, संचारबंदी व सोशल डिस्टसिंग या नियमांचे काटेकोरपणे पालन करत समाजभान जोपासत वरणगाव (ता. भुसावळ) येथील तनिष्का गटाच्या वतीने समाजभान जोपासत मास्कची निर्मिती करत आहेत. नफा कमावणे हा उद्देश डोळ्यांसमोर न ठेवता अत्यल्प दरात येथील तनिष्का सदस्या मास्क उपलब्ध करून देत आहे. 

गेल्या काही कालावधीपासून जगभरात कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. या रोगाच्या प्रतिबंधासाठी सर्व पातळीवरून खबरदारीच्या आवश्‍यक त्या उपाययोजना सुरू आहेत. भारतातही 24 मार्चपासून संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. प्रत्येक व्यक्ती आपआपल्या परीने शक्‍य आहे त्या स्वरूपात आपला सहभाग देत आहे. अशा आपत्तीच्या परिस्थितीत सॅनिटायझर व मास्क या दोन वस्तूंचा समावेश जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये करण्यात आला आहे. 
आपत्ती व संचारबंदीच्या काळात समाजाप्रती आपलेही काही कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून तनिष्का गटाच्या वतीने मास्क तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कोरोना या साथरोगाला आळा घालण्यासाठी मास्कचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. आपले हे सामाजिक कर्तव्य पार पाडत असताना तालुक्‍यातील टहाकाळी आणि सुसरी येथील ग्रामपंचायतीमार्फत प्रत्येकी 1 हजार मास्कची खरेदी करण्यात आली आहे. 

यांचा आहे सहभाग 
या गटात गटप्रमुख प्रतिभा तावडे, प्रीती शेळके, ज्योती सिंगार, सुनीता भोई, संगीता माळी, आरती चौधरी, प्रमिला माळी, सुशीला फालक, मंगला माळी आदी सदस्यांचा समावेश आहे. अमित तावडे याने गटाला आवश्‍यक वस्तूंसाठी सहकार्य केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgon Tanishq's "community hall" during lockdown