माजी मंत्र्यांच्या जामनेरात २२ हजार केशरी कार्डधारकांना धान्याची प्रतीक्षा 

सुरेश महाजन
Thursday, 23 April 2020

अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर मिळणाऱ्या धान्याची अद्याप वाटप सुरूच झालेली नाही. त्यांची ही प्रतीक्षा केव्हा संपणार याच विवंचनेत आजही अनेक कुटुंबीय आहेत. 

जामनेर : तालुक्यामध्ये गेल्या दीड महिन्यांभरापासून केंद्र- राज्यशासन निर्णयानुसार स्वतधान्य दुकानांमार्फत अंत्योदय व आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब कुटुंबांना गहू, तांदूळ मिळत आहे. मात्र, सुमारे २२ हजार केशरी कार्डधारकांसाठी जाहीर झालेल्या अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर मिळणाऱ्या धान्याची अद्याप वाटप सुरूच झालेली नाही. त्यांची ही प्रतीक्षा केव्हा संपणार याच विवंचनेत आजही अनेक कुटुंबीय आहेत. 

नक्‍की पहा - अरेच्चा...वाघिणीच्या गुहेत रंगली कोल्हेकुई 

कोरोनाच्या फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन व सोशल डिस्टन्सिंग वापरण्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक उद्योगधंदे-व्यवसाय बंदच आहेत, परिणामी त्या ठिकाणी काम करणाऱ्या व हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत व सवलतीच्या दरात धान्य देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना वरील प्रमाणे गहु-तांदुळाचे वाटप सुरू झाले आहे. मात्र, राष्ट्रीय अन्न-सुरक्षा योजनेच्या बाहेर असलेल्या कुटुंबीय सुध्दा आर्थिक संकटात सापडला आहे. अशा केशरी कार्डधारकांसाठी राज्य मंत्रिमंडळाने सवलतीच्या दरामध्ये स्वस्तध्यान्य दुकानांतून गहु-तांदुळ देण्याचे ठरविले. त्यानुसार अशा केशरी कार्डधारकांना प्रतीव्यक्ती तीन किलो गहू ८ रुपये प्रतिकिलो दराने, तर दोन किलो तांदूळ १२ रुपये प्रतिकिलो दराने असे एकूण ५ किलो धान्य देण्यात येणार आहे. 

वंचितांचे धान्य काळ्याबाजारात जाऊ नये... 
केंद्र व राज्यशासनाच्या योजनांमधून अत्यल्प व अल्पदरात आणि मोफत मिळणारे धान्य लाभार्थ्यांनाच मिळायला हवे. ते शेकडो क्विंटल धान्य काळ्याबाजारात जाऊन संबंधित रास्त दुकानदारांची चांदी होणार. त्यासाठी मात्र, केशरीकार्डधारक सवलतीच्या दरातील अन्न-धान्यापासून वंचित राहणार नाही. याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. 

तालुक्यांमध्ये एकूण २१ हजार ९८५ केशरीकार्डधारक असून, त्यामध्ये ९४ हजार ७७७ सदस्य संख्या आहे. त्यासाठी २ हजार ८८३ क्विंटल गहू, तर १ हजार ८९६ क्विंटल तांदूळ विभागाला प्राप्त झाला आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये सर्व स्वस्तधान्य दुकानांमधून त्याचे वितरण होणार आहे. स्वस्तधान्य दुकानातील माल काळ्या बाजारात जाऊ नये म्हणून विशेष पथकाद्वारे लक्ष ठेवले जात आहे. 
-विठ्ठल काकडे, पुरवठा निरीक्षक जामनेर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner 22 thousand keshari card people waiting Grain