अरेच्चा...वाघिणीच्या गुहेत रंगली कोल्हेकुई 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 एप्रिल 2020

बळजबरी निवासस्थानाची चावी घेतली व आतील पोर्चमध्ये खुर्च्या, टेबल टाकून दोघांसह दारू प्यायला बसले. दुपारी दीडच्या सुमारास श्रीमती बाविस्कर या अचानक निवासस्थानी आल्या असता त्यांना पोर्चमध्ये तिघे दारू पीत असल्याचे त्यांना आढळून आले.

पाचोराः वाघिणीने आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी गुहेबाहेर पडावे अन्‌ कोल्ह्यांनी अनधिकृतरीत्या गुहेत प्रवेश करून तिथे कोल्हेकुई रंगवावी, असा काहीसा प्रकार पाचोरा येथे पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानी घडला. येथील भडगाव रोड परिसरातील पुजारीनगरातील मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या शासकीय निवासस्थानात पालिकेचे आरोग्य निरीक्षक धनराज पाटील व त्यांच्या सोबतचे दोघे, असे तिघे जण दारू पीत असल्याचे खुद्द मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनाच आढळून आले. 

आर्वजून पहा : जळगाव जिल्ह्यात आणखी एक "कोरोना'बाधित; "त्या' मृताचा अहवाल..
 

याबाबत श्रीमती बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, पालिकेचे आरोग्य निरीक्षक धनराज पाटील यांना अटक केली आहे. उर्वरित दोघे फरार झाले आहेत. या संदर्भात शोभा बाविस्कर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या गेटवरील शिपायाशी आरोग्य निरीक्षक धनराज पाटील यांनी अरेरावी केली. त्याच्याकडून बळजबरी निवासस्थानाची चावी घेतली व आतील पोर्चमध्ये खुर्च्या, टेबल टाकून दोघांसह दारू प्यायला बसले. दुपारी दीडच्या सुमारास श्रीमती बाविस्कर या अचानक निवासस्थानी आल्या असता त्यांना पोर्चमध्ये तिघे दारू पीत असल्याचे त्यांना आढळून आले. श्रीमती बाविस्कर यांना पाहताच दोघे पळून गेले व आरोग्य निरीक्षक धनराज पाटील हे त्यांच्या मागे मागे आले. त्यावर "माझ्या मागे येऊ नका' असे श्रीमती बाविस्कर यांनी त्यांना वारंवार बजावले. सध्या सर्वत्र कोरोनाची साथ सुरू असताना तसेच पालिकेचे आरोग्य निरीक्षक हे महत्त्वाचे पद असताना धनराज पाटील यांनी तोंडावर "मास्क' न लावता शासकीय अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानात कोरोना संसर्गाचा फैलाव व्हावा, या उद्देशाने हे कृत्य केले. 

श्रीमती बाविस्कर यांच्या अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, एस. टी. सावळे व गौतम निकम (दोघे रा. पाचोरा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील धनराज पाटील यांना अटक करण्यात आली असून, फरार एस. टी. सावळे व गौतम निकम यांचा पोलिस शोध घेत आहेत. 

क्‍लिक कराःआदेशाला हरताळ... कापूस खरेदी बंदच! 
 

वरिष्ठांना दिली माहिती 
या घटनेमुळे आश्‍चर्य व्यक्त होत असून, असा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून मुख्याधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानात चालत असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर या पाचोरा येथेच मुख्यालयात थांबून असतात. आपले कर्तव्य बजावून त्या थोडी विश्रांती घेण्यासाठी आपल्या शासकीय निवासस्थानी जातात. आज घडलेल्या प्रकाराबाबत श्रीमती बाविस्कर यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्यासह नाशिक व मुंबई येथील आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. काही वरिष्ठ अधिकारी रात्रीच पाचोरा येथे भेट देऊन या प्रकाराची माहिती घेणार असल्याचे सांगण्यात आले. 

नक्की वाचा :  विद्यार्थी रमले "डिजिटल' विश्‍वात..."लॉकडाउन' काळातील वेळेचा सदुपयोग
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Pachora Alcohol party of the health inspector at the chief's residence