ठिबकची नळी काढण्यास गेला अन्‌ त्याला रोटाव्हेटरने गुंडाळले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने शेतीची मशागत केली जात आहे. यात ठिबकच्या नळ्या अंथरण्यासाठी प्रामुख्याने रोटाव्हेटरच्या सहाय्याने काम सुरू आहे. यातच पिंपळगाव येथे दुर्घटना घडली. 

पहूर, (ता. जामनेर) : शेतात पेरणीपुर्व मशागतीचे काम सुरू आहे. ट्रॅक्‍टरद्वारे टिलर, नागरणी करून रोटाव्हेटर करत शेतीची मशागत केली जात आहे. पण शेतात रोटाव्हेटर सुरू असताना त्यात अडकलेली ठिबकची नळी काढण्याच्या प्रयत्नात यंत्रामध्ये अडकून जखमी तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना जामनेर तालुक्‍यातील पिंपळगाव खुर्द येथे घडली. 

नक्‍की पहा - खडसे पुन्हा मैदानात...काय आहे कारण 

कोरोनाचे व्हायरसचे संकट असताना शेतकरी आपल्या कामात व्यस्त आहे. पावसाळा जवळ येत असून यापुर्वी शेतीची मशागत करण्याचे काम सगळीकडे सुरू आहेत. पुढील आठवड्यात उन्हाळी कपाशी पेरण्यास सुरवात होण्याची शक्‍यता आहे. त्या दृष्टीने शेत शिवारात पेरणी पुर्व मशागतीची कामे सुरू आहेत. ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने शेतीची मशागत केली जात आहे. यात ठिबकच्या नळ्या अंथरण्यासाठी प्रामुख्याने रोटाव्हेटरच्या सहाय्याने काम सुरू आहे. यातच पिंपळगाव येथे दुर्घटना घडली. 

नळीने केला घात 
पिंपळगाव खुर्द येथील अमोल रामदास जवखेडे यांच्या शेतात ट्रॅक्‍टर रोटाव्हेटरच्या सहाय्याने शेती तयार करण्याचे काम सुरू होते. आज मुन्ना राजू भिलखेडे (वय 35) हे रोटाव्हेटर यंत्र चालवित होते. दरम्यान ठिबक सिंचनची नळी यंत्रात अडकल्याने ती नळी बाजूला करण्याच्या प्रयत्नात द्रॅक्‍टर चालक मुन्ना भिलखेडे खाली कोसळले आणि रोटाव्हेटर यंत्रात अडकला. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने जळगाव येथे खासगी रुग्णालायात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा सकाळी साडेअकराच्या सुमारास मृत्यू झाला. मयत मुन्ना भिलखेडे यांना एक माहिन्यांचा चिमुकला मुलगा आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, वडिल असा परीवार आहे. 

पत्नीने फोडला हंबरडा 
मुन्ना भिलखेडे यांचा गेल्यावर्षीच विवाह झालेला होता. तर महिनाभरापुर्वीच त्यांना मुलगा झाला होत. मुन्नाच्या मृत्यूने एक महिन्याच्या चिमुकल्याचे पितृछत्रच हरपले. दरम्यान पतीचा मृतदेह पाहताच त्यांच्या पत्नीने हंबरडा फोडत आपल्या चिमुकल्याला कोण सांभाळणार..उठा असा आक्रोश केला. हे ह्रदयस्पर्शी स्पर्शी दृष्य पाहून उपस्थितांना गहीवरून आले. 

काळजी घेणेच महत्त्वाचे 
रोटाव्हेटर यंत्रात अडकून मृत्यू होण्याच्या घटना अनेकदा घडलेल्या आहेत. एक लहान चुकी जीवाशी येत असते. यामुळे रोटाव्हेटर चालविताना काही महत्त्वपूर्ण गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने लहान मुलांना रोटाव्हेटरपासून दूर ठेवावे. रोटाव्हेटरमध्ये अडकलेला काडी- कचरा किंवा नळी मशिन बंद करूनच काढावे. रोटाव्हेटर सुरू असताना मोबाईलवर बोलू नये. विहीर, विजेचे खांब यांची माहिती काम सुरू करण्यापुर्वीच चालकाने समजून घ्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner farmer tractor rotavator one death