"राजधानी' हवाई प्रवेशाचा नारळ फुटला,जेट एअरवेजचे उड्डाण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

नाशिक : नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने आज एक ऐतिहासिक पाऊल पडले. अनेक वर्षांपासून नाशिक-दिल्ली हवाई सेवा सुरु करण्याची मागणी आज प्रत्यक्षात अडिच वाजता दिल्लीहून ओझर विमानतळाच्या धावपट्टीवर उतरलेल्या विमानाने पुर्ण झाली.

नाशिक : नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने आज एक ऐतिहासिक पाऊल पडले. अनेक वर्षांपासून नाशिक-दिल्ली हवाई सेवा सुरु करण्याची मागणी आज प्रत्यक्षात अडिच वाजता दिल्लीहून ओझर विमानतळाच्या धावपट्टीवर उतरलेल्या विमानाने पुर्ण झाली.

पहिल्याच दिवशी दिल्लीहून 126 तर नाशिकहून दिल्लीला 120 प्रवासी पोहोचले. विशेष म्हणजे जेटच्या कार्गो सेवेला देखील उस्फुर्त प्रतिसाद मिळताना तीन टन केसरी आंबे लंडन तर एक टन हिरवी मिरची दुबईच्या बाजारपेठेकडे रवाना झाली. हवाई सेवेच्या उदघाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी पायाभुत सुविधा पुरविण्याचे आश्‍वासन दिले तर कंपनीचे जेट एअरवेजचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार यांनी निरंतर सेवा सुरु ठेवण्याचे आश्‍वासन दिले. 

    केंद्र सरकारने उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जेट एअरवेज मार्फत दिल्ली- नाशिक हवाईसेवा सुरू करण्यात आली. "एचएएल' च्या ओझर येथील टर्मिनसवर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, सरचिटणीस श्रीकांत बच्छाव, एचएएलचे जनरल मॅनेजर बी.एच.व्ही. शेषगिरी राव, प्रोजेक्‍ट हेड एस.पी. खापली आदी मान्यवर उपस्थित होते.

   यावेळी बोलताना कंपनीचे शिवकुमार म्हणाले, दिल्ली-नाशिक हवाई सेवेमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये जलदगतीने पोहोचणे सोपे होणार आहे. प्रथमचं बी 737 हे 168 आसनी क्षमतेचे विमान वापरल्याने कार्गो क्षमताही वाढली आहे. प्रति विमान अडिच हजार टन मालवाहतुक देशाच्या बाजारपेठेत नेता येईल. नाशिक टर्मिनलवर कर्मचारी पुरविण्याबरोबरचं सेवेची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यासाठी मार्केटिंग वर भर देणार.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळारील पार्किंगची अपुरी व्यवस्था लक्षात घेता संरक्षण विभागाने परवानगी दिल्यास ओझर विमानतळाचा पर्यायाचा विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन म्हणाले, प्रारंभी चेक इन काऊंटरचे उदघाटन व प्रथम प्रवासी खासदार हेमंत गोडसे यांना बोर्डींग पास देवून सत्कार करण्यात आला. 
 
नाशिक, शिर्डी या धार्मिक स्थळांना भेट देणारे भाविक, मुंबई पासूनचे जवळचे अंतर, वाईनची राजधानी, फळे व फुलांचे माहेरघर, संरक्षण व एअरोस्पेस उत्पादनाचे केंद्र यामुळे जेट एअरवेजला सेवेची मोठी संधी आहे. नाशिककरांनी प्रतिसाद दिल्यास सेवेचा विस्तार करू.- राज शिवकुमार, वरिष्ठ उपाध्यक्ष, जेट एअरवेज. 

निरंतर सेवा सुरु ठेवण्यासाठी सेवेला नाशिककरांनी प्रतिसाद द्यावा, विमानतळावर पायाभुत सुविधा पुरविण्याच्या सुचना देण्यात आल्या असून धुळे, जळगाव येथील प्रवाशांना देखील सेवेचा लाभ घेता येईल. नाशिक ते विमानतळापर्यंत ओला टॅक्‍सी सर्व्हीस सुरु करण्यासाठी प्रयत्न करू.- बी. राधाकृष्णन, जिल्हाधिकारी. 

विमानसेवेत महत्वाचे 
- जेट एअरवेजचे 168 सीटरचे विमान. 
- 12 आसने विशेष श्रेणीसाठी, तर 156 सर्वसाधारण. 
- आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार सेवा. 
- दिल्ली येथून दुपारी बाराला तर ओझरहून दोन वाजून 35 मिनिटांनी उड्डाण. 
- ऑनलाईन बुकींगसह टर्मिनल येथे ऑफलाईन तिकीट व्यवस्था. 
- उडान योजनेंतर्गत पहिल्या चाळीस सिटससाठी 2890 एका बाजुचा प्रवाशी दर. 
- सर्वसाधारण सिटससाठी 4658 प्रवासी दर. 
- बिझनेस क्‍लासच्या बारा सीटससाठी 18,693 दर. 
- हैदराबाद, बेंगळुरू, अहमदाबाद, गोवा, भोपाळ या शहरांशी तत्काळ कनेक्‍टिव्हीटी
 

Web Title: marathi news jet airways