जिद्द- अंगठेबहाद्दर निर्मलाताई बनल्या शाळेच्या मालकीण

residentional photo
residentional photo

      कुटुंबातील प्रतिकूल परिस्थिती ही आपली परीक्षा घेण्यासाठीच येत असते. प्रसंग कसाही असो, महिलांनी खचून जाऊ नये. प्रतिकूल परिस्थिती ही तुमच्यातील संयम बघण्यासाठी येत असते. आयुष्यातील यश खेचून आणताना महिलांनी खचून जाऊ नये, असा सल्ला देणाऱ्या निर्मलाताई अहिरे या स्वतः अंगठेबहाद्दर असूनदेखील खडतर प्रवासातून जिद्दीच्या जोरावर अनेक चढ-उतार पचवत इतरांसाठी मार्गदर्शक ठरल्या आहेत. 


निर्मलाताई तुळशीराम अहिरे, वय 50, शिक्षण अंगठेबहाद्दर... माहेर तिळवण, तर सासर बिलपुरी येथील... दोन्हीही बागलाण तालुक्‍यातील. सध्याचे वास्तव्य पंचवटीतील मार्केट कमिटीजवळ. माहेरी धर्मा बच्छाव यांच्या पत्नी आणि मुलांसह आठ जणांचे कुटुंब... मात्र गरिबी वडिलोपार्जित पाचवीलाच पूजलेली... रोजचा दिवस ढकलत आयुष्य पुढे नेणारे कुटुंब... निर्मलाताई यांनाही शिकून स्वतःची ओळख निर्माण करायची होती. मात्र तिसरीत असतानाच निर्मलाताईंच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे आईवर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. परिणामी, निर्मलाताई या शाळेची पायरीही चढू शकल्या नाहीत. कुटुंबाची जबाबदारी कमी व्हावी, यासाठी आईने सर्व मुलींची लग्ने लवकर करून दिली. पती तुळशीराम यांचेही शिक्षण इयत्ता तिसरी. सासरीही अठराविश्‍व दारिद्य्र. पोटाची खळगी भरण्यासाठी तुळशीराम अहिरे यांचे कुटुंब नाशिकला आले. मात्र शिक्षणाअभावी नोकरीची शाश्‍वती नव्हती. वेठबिगार म्हणून, बांधकाम मजूर म्हणून काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. 
कुटुंबाला आधार मिळावा म्हणून निर्मलाताई याही बांधकामावर कामासाठी जात होत्या. यातच अहिरे कुटुंबात मुले रवींद्र, सचिन आणि मुलगी अनिताच्या निमित्ताने कुटुंबाची संख्या पाचवर गेली. मात्र आयुष्यात परिस्थितीमुळे शाळेपासून दूर राहावे लागलेल्या निर्मलाताईंनी मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरविले. प्रारंभी पंचवटीतील अवधूतवाडी येथील झोपडपट्टी परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होते. 

    पती तुळशीराम हे ठेकेदाराकडे वॉटरप्रूफिंगच्या कामावर मजूर म्हणून काम करत असतानाच त्यांच्या मदतीसाठी निर्मलाताई याही रोजंदारीवर जात होत्या. या कामातून मिळणाऱ्या पैशांतून निर्मलाताईंनी अवधूतवाडी परिसरात छोटीशी टपरीवजा दुकान सुरू केले. याच काळात पतीचे आजारपणाने डोके वर काढले. मात्र निर्मलाताई डगमगल्या नाहीत. कुटुंबासह मुलांसाठी आधार होत त्यांनी मुलांसाठी खाऊ विकण्याबरोबरच त्यांनी मासे विक्रीही सुरू केली. यातून दिवसाकाठी मिळणारी कमाई होती फक्त 50 रुपये. येथूनच निर्मलाताई यांच्या यशाला कलाटणी मिळाली. मुलांना सीडीओ मेरी शाळा जवळ असल्याने तिघांची शिक्षणाची व्यवस्था येथेच झाली.

  दोन वर्षे मासे विक्री करत असतानाच पतीला त्यांनी स्वतःच घरांच्या वॉटरप्रूफिंगचा ठेका घेण्याबाबत इच्छा बोलून दाखविली. निर्मलाताई यांच्यातील व्यावसायिक वृत्ती ओळखून पती तुळशीराम यांनी मदत केली. पावसाळ्याच्या दिवसांत कॉलनीतील घरांसाठी वॉटरप्रूफिंगची छोटी कामे निर्मलाताई यांनी पतीच्या मदतीने घेण्यास सुरवात केली. या व्यवसायात गरजेपुरता पैसा मिळण्याबरोबरच गरजू, गरिबांसाठी काम उपलब्ध होण्यास मदत झाल्याने त्यांनी यात लक्ष घातले. 


कुटुंबांसाठी बनल्या आधार 
पतीच्या आजारपणामुळे त्यांना फार कष्ट न करू देता त्या पुढे सरसावल्या. आपल्या आयुष्यात आलेले प्रसंग इतर कुणाच्याही वाट्याला येऊ नये, यासाठी या कुटुंबाने चंगच बांधला. या व्यवसायात जम बसवतानाच पंचवटी परिसरातील चाकरमान्यांसाठी निर्मलाताई मसिहा ठरल्या. या व्यवसायात त्यांनी सुमारे पन्नासच्या वर गरजूंना रोजगार उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्यास सुरवात केली. 

मुलांनी केले स्वप्न पूर्ण 
कुटुंबात आईचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलगा सचिन इंजिनिअर, रवींद्र आणि कन्या अनिता याही पदवीचे शिक्षण पूर्ण करून प्रगती करण्यासाठी कष्ट घेत होते. केवळ मुलेच नाहीत तर सचिन यांच्या पत्नी नंदिनी आणि सचिनची पत्नी मंजिरी याही उच्चशिक्षित असून, शिक्षणाच्या बाबतीत मागे असलेल्या अहिरे परिवारात आज उच्चशिक्षित कुटुंब म्हणून समाजात पाहिले जाते. स्वतः कमी शिकलेल्या असताना त्यांनी सुनांच्या मदतीने स्वतःची इंग्रजी माध्यमाची शाळा हिरावाडी परिसरात सुरू केली आहे. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कुठलीही गोष्ट अशक्‍य नाही, या विचाराने निर्मलाताई यांनी परिसरातील गरजूंसाठी सुरू केलेली इंग्रजी माध्यमाची शाळा गुणवत्तेच्या जोरावर चर्चेचा विषय ठरत आहे. 


सामाजिक बांधिलकी 
नुकत्याच आलेल्या महापुरात नुकसान झालेल्या सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी निर्मलाताई यांच्या परिवाराने विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक साहित्य "सकाळ रिलीफ फंडा'कडे जमा करत सामाजिक बांधिलकी जपलीय. दोन्ही सुना तनिष्का सदस्य असून, कुटुंबावर आलेली प्रतिकूल परिस्थिती कुणावरही येऊ नये, असे सांगतानाच त्यांचे डोळे पाणवतात. पंचवटी परिसरात चाकरमान्यांची संख्या अधिक असतानाच या परिसरातील महिलांना रोजगाराची गरज लक्षात घेऊन तनिष्का व्यासपीठानिमित्ताने महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी निर्मलाताई प्रयत्नशील आहेत. 

संपर्क ः निर्मलाताई अहिरे ः 8766470965 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com