दुष्काळ, पाणी टंचाई तरीही जि. प. अध्यक्षांची सभेकडे पाठ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

जळगाव ः सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असून, पाणी टंचाईचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात काय उपाययोजना करता येतील, याचा आढावा सभा बोलावून घेतला जात आहे. परंतु, जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची सभा असताना त्याकडे अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी पाठ फिरविल्याचा प्रकार आज घडला. अध्यक्षांकडून सभाच तहकूब करण्यासाठी सर्व सदस्यांना रात्रीच फोन करून सांगण्यात आले होते. 

जळगाव ः सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असून, पाणी टंचाईचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात काय उपाययोजना करता येतील, याचा आढावा सभा बोलावून घेतला जात आहे. परंतु, जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची सभा असताना त्याकडे अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी पाठ फिरविल्याचा प्रकार आज घडला. अध्यक्षांकडून सभाच तहकूब करण्यासाठी सर्व सदस्यांना रात्रीच फोन करून सांगण्यात आले होते. 

जिल्हा परिषदेची दर महिन्याला होणारी नियमित जलव्यवस्थापन समितीची सभा आज (ता.16) आयोजित करण्यात आली होती. सकाळी अकराला सभा घेण्याचे निश्‍चित असताना जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील यांनी आपल्या वैयक्‍तिक कामासाठी बुधवारी (ता. 15) रात्रीच समितीच्या सर्व सदस्यांना फोन करून सभा तहकूब करायची असून, न येण्याचे सांगितले होते. अर्थात जिल्ह्यात भीषण टंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यादृष्टीने आढावा घेण्याबाबत अध्यक्षांनी सभा घेणे अपेक्षित होते. मात्र खुद अध्यक्षांनी सभा तहकूब करण्यासाठी फोन केले होते. मुळात टंचाईच्या प्रश्‍नाबाबत दुसरीकडे विशेष सभा घेऊन आढावा घेतला जात आहे. मात्र इकडे अध्यक्षांनीच सभेकडे पाठ फिरविणे अपेक्षित नव्हते. 

सदस्यांच्या आग्रहात्सव सभा 
अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी सभा न घेण्याचे फोनवरून सांगितले होते. यामुळे बहुतांश सदस्य हे आले नाही. मात्र समिती सदस्य लालचंद पाटील, पल्लवी सावकारे आले होते. त्यावेळी अध्यक्षा श्रीमती पाटील या जिल्हा परिषदेत उपस्थित होत्या. सदस्या सावकारे यांनी उपाध्यक्ष तसेच अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांची भेट घेऊन भुसावळ तालुक्‍यात पाणी टंचाईचा प्रश्‍न गंभीर असून त्याबाबत काही उपाययोजना करणे गरजेचे आहे, सभा घेण्यात यावी अशी मागणी केली. मात्र अध्यक्षांनी त्यास नकार देत निघून गेल्या होत्या. यानंतर दोन्ही सदस्यांनी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्याकडे आपला विषय मांडला असता, उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्याचे निश्‍चित झाले. सभेला सभापती पोपट भोळे, प्रभाकर सोनवणे, श्रीमती सावकारे, लालचंद पाटील उपस्थित होते. 

टंचाईवर घेतला आढावा 
जलव्यवस्थापन समितीच्या सभेत जिल्ह्यातील टंचाईबाबत आढावा घेण्यात आला. या सभेत आठ हातपंप बसविण्यास मंजुरी देवून त्याची टेंडर प्रक्रिया करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच विहिरी अधिग्रहण आणि खोलीकरण करण्यासंदर्भात तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देखील उपाध्यक्ष महाजन यांनी दिल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jilha parishad president absend sabha