बंडखोरीचा भाजपला दोन जागांवर फटका 

बंडखोरीचा भाजपला दोन जागांवर फटका 

जळगाव : जिल्ह्यात अकरापैकी चार-पाच मतदारसंघांमध्ये अधिकृत उमेदवारांसमोर बंडखोर अपक्ष उमेदवारांनी डोकेदुखी निर्माण केली होती. त्यापैकी मुक्ताईनगरात सेनेच्या बंडखोराला राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळून त्याने थेट खडसेंच्या कन्येचा पराभव केला. रावेरमध्ये अनिल चौधरींची उमेदवारी भाजपच्या हरिभाऊ जावळेंच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. तर सेनेकडे असलेल्या जळगाव ग्रामीण, पाचोरा व चोपडा या तीन मतदारसंघात भाजपच्या बंडखोरांना निष्प्रभ ठरवत शिवसेनेने वर्चस्व राखले. 
यंदाची विधानसभा निवडणूक राज्यभरात भाजप-शिवसेनेतील बंडखोरीवरुन गाजली. जळगाव जिल्हाही त्यास अपवाद नव्हता. जळगाव जिल्ह्यातील अकरापैकी चार- पाच मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी उपद्रव करण्याचा प्रयत्न केला. 

मुक्ताईनगरात सरशी 
माजी मंत्री एकनाथराव खडसेंचे कट्टर विरोधक असलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी केली, त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. खडसेंना धक्का देत पाटील यांनी खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंचा अवघ्या 1900 च्या मतफरकाने पराभव केला. 

पाचोऱ्यात बंडखोर दुसऱ्या स्थानी 
पाचोरा- भडगाव मतदारसंघात आमदार व शिवसेना उमेदवार किशोर पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे दिलीप वाघ अशी लढत होती. मात्र, त्यात भाजप बंडखोर अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी करत चुरस निर्माण केली. विशेष म्हणजे, याठिकाणी शिंदे दुसऱ्या स्थानी राहिले. मतमोजणीच्या पहिल्या फेऱ्यांमध्ये तर अमोल शिंदे आघाडीवर होते. मात्र, अखेरच्या फेऱ्यांमध्ये किशोर पाटलांनी निर्णायक आघाडी घेत अवघ्या 2084 मतांनी विजय मिळविला. त्यांना 75 हजार 699 तर अपक्ष उमेदवार अमोल शिंदेंना 73 हजार 615 मते मिळाली. 

"जळगाव ग्रामीण'मध्ये उत्सुकता 
जळगाव ग्रामीण मतदारसंघात राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर भाजपचे बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांनी आव्हान निर्माण केले. राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा महाजन कुठेही स्पर्धेत दिसल्या नाहीत. बंडखोर उमेदवार अत्तरदे यांनी 59 हजार मते मिळाली, तर गुलाबरावांनी त्यांना निष्प्रभ ठरवत 46 हजार 729 मतांचे मताधिक्‍य घेत 1 लाख 5 हजारांवर मते मिळवत विजय मिळविला. 

चोपड्यातही बंडखोर निष्प्रभ 
चोपडा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार लता सोनवणे व राष्ट्रवादीचे उमेदवार जगदीश वळवी यांच्यात लढत झाली. याठिकाणी जिल्हा परिषदेत सभापती असलेले भाजप बंडखोर प्रभाकर सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी केली. त्यांना तब्बल 32 हजार 459 मते मिळाली. मात्र, त्यांनी या लढतीत चुरस निर्माण केली होती. अखेरीस सेना उमेदवार लता सोनवणे यांनी जगदीश वळवींवर 20 हजारांवर मताधिक्‍य घेत हा गड राखला. 
एकंदरीत जळगाव जिल्ह्यातील लढतींमध्ये बंडखोरांचा फटका खऱ्या अर्थाने भाजपलाच मुक्ताईनगर व रावेर मतदारसंघात बसला. या दोन्ही भाजपकडील जागा पक्षाला गमवाव्या लागल्या. तर पाचोरा, जळगाव ग्रामीण व चोपडा या तीन सेनेच्या मतदारसंघात भाजप बंडखोरांना निष्प्रभ ठरवत सेनेचे शिलेदार विजयी झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com