चांगल्या पावसामुळे मासे खाणाऱया खवय्यांची यंदा चंगळ !

जगन्नाथ पाटील   
Monday, 28 September 2020

माश्यांच्या उपलब्धतेमुळे मासेमारी अधिक प्रमाणात होत आहे. विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. गल्लीबोळात भाजीपाल्याच्या विक्रेत्यांप्रमाणे माश्यांची विक्री होत आहे.

कापडणे  : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून नदी नाले वाहत आहेत. तलाव, बंधारे, धरणे आणि प्रकल्प ओसांडून वाहत आहेत. पाण्याचे सर्वच स्र्तोत भरल्याने माश्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्यात स्थानिकच मासे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. मासेमारी करणार्‍यांना सुगीचे दिवस आले आहेत. तर खवय्यांनाही मोठी  पर्वणी ठरत आहे.

शेती शिवारातील नदीनाले, बंधार्‍यात मासेमारी
जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. बंधारे व लहान मोठे धरणे ओसांडत आहेत. पाण्याचे संचय मोठ्या प्रमाणात झाल्याने माश्यांची निर्मिती मोठी वाढली आहे. या ठिकाणी मासेमारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

मासे विक्रेत्यांची वाढती संख्या
माश्यांच्या उपलब्धतेमुळे मासेमारी अधिक प्रमाणात होत आहे. विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. गल्लीबोळात भाजीपाल्याच्या विक्रेत्यांप्रमाणे माश्यांची विक्री होत आहे. प्रत्येक गावात आठ दहा तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

स्थानिक मासे केवळ प्रती किलो एकशे वीस
जिल्ह्यातील मासेमारीच्या बाजारात आयात मासे अधिक प्रमाणात येतात. त्यांना समुद्री मासे म्हणून मोठी मागणी असते. सध्या या माश्याचे भाव प्रती किलो एकशे ऐंशीपासून दोनशे चाळीस पर्यंत आहेत. स्थानिक मासे अधिक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने समुद्री माश्यांची मागणी घटली आहे. तरीही दर चढेच असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. स्थानिक मासे केवळ प्रती किलो एकशे वीस ते एकशे चाळीस प्रमाणे विक्री होत आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kapadne fishing business booms due to good rains, fish eaters have fun this year