esakal | शासन करतेय कांदा उत्पादकांच्या संसाराची राख रांगोळी !
sakal

बोलून बातमी शोधा

शासन करतेय कांदा उत्पादकांच्या संसाराची राख रांगोळी !

निर्यातबंदी घालुन शेतकर्‍यांच्या प्रपंचाची राख रांगोळी केली आहे. माजी अध्यक्ष आत्माराम पाटील म्हणालेत, शेतकर्‍यांनी निवडुन दिलेल्या लोकप्रतिनिधींनी शेतकर्‍यांची बाजू मांडण्याचे काम लोकसभेत करायचे असते.

शासन करतेय कांदा उत्पादकांच्या संसाराची राख रांगोळी !

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे  : कांदा निर्यातबंदीमुळे शेतकर्‍यांच्या संसाराची 'राख रांगोळी' करणार्‍या केंद्र शासनाचा व त्यांच्या प्रतिनिधींचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे राज्यातील सर्व खासदारांच्या घरासमोर एकाचवेळी कांदा पिकाची राख करून त्याची रांगोळी काढून कांदा निर्यातबंदीचा निषेध करण्यात आला. खासदारांनी लोकसभेत आवाज उठवून कांदा निर्यातबंदीचा आदेश मागे घेण्यास सरकारला भाग पाडावे यासाठी हे आंदोलन करण्यात आले. 

खासदार सुभाष भामरे यांच्या धुळे शहरातील राहत्या घरासमोर संघटनेने राख रांगोळी आंदोलन केले. यावेळी चौदा सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने काढलेला निर्यातबंदी आदेश जाळून निषेध झाला. जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी म्हणालेत, कोविड 19 या सहा महिनेच्या काळात कांदा मातीमोल भावाने विकला. आता कुठे किमान खर्च भरुन निघेल असे भाव मिळू लागले होते. केंद्र शासनाने अचानक निर्यातबंदी करुन कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी संकटात असताना शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍या सरकारला अशा पद्धतीने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान करण्याचा कोणताही अधिकार नाही. या निर्यातबंदीमुळे शेतकर्‍यांचेच नव्हे तर देशाचेही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. निर्यातबंदी घालुन शेतकर्‍यांच्या प्रपंचाची राख रांगोळी केली आहे.
माजी अध्यक्ष आत्माराम पाटील म्हणालेत, शेतकर्‍यांनी निवडुन दिलेल्या लोकप्रतिनिधींनी शेतकर्‍यांची बाजू मांडण्याचे काम लोकसभेत करायचे असते. परंतू शेतकर्‍यांनी निवडुन दिलेले खासदार आपले कर्तव्य विसरले आहेत. शेतकर्‍यांप्रतीचे कर्तव्यही विसरले आहेत. कांदा निर्यातबंदी करुन शेतकर्‍यांच्या प्रपंचाची राख रांगोळी केली आहे. 

जून महिन्यात केंद्र शासनाने शेती माल व्य़ापार कायद्यात दुरुस्ती करुन शेतीमाल व्यापार खुला करुन कुठेही विकण्याची परवानगी दिली. कांदा आवश्यक वस्तू कायद्यातून वगळला आहे. शेतकरी संघटनेने शासनाच्या या निर्णयाला पाठिंबा‍ही दिला होता. पण तीनच महिन्यात पुन्हा निर्यातबंदी लादुन शेतकर्‍यांचा विश्वासघात केला आहे. देशांतर्गत तसेच विदेशातही कांद्याला चांगली मागणी असताना केलेली निर्यातबंदी ही शेतकर्‍यां बरोबर निर्यातदारांचे ही मोठे नुकसान करणारी आहे. अांतरराष्ट्रीय बाजारात भारताची विश्वासहार्यता संपत चालली आहे.

निर्याती बाबत भारताच्या धरसोड भुमिकेमुळे भारताकडुन कांदा आयात करणारे देश इतर देशांकडे वळत आहेत.जागतिक कांदा बाजार एकेकाळी ऐंशी टक्के असलेला भारताचा वाटा आता चाळीस टक्क्यावर वर आला आहे. प्रांतिक सदस्य शांतूभाई पटेल एकूणच देशाच्या व शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करुन केंद्र शासनाने त्वरित निर्यातबंदीचा आदेश मागे घ्यावा. अन्यथा पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल. कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा सहनशीलतेचा अंत शासनाने बघू नये, असा इशाराही दिला.


दरम्यान शेतकरी संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी, आत्माराम पाटील, प्रांतिक सदस्य शांतूभाई पटेल, जिल्हा युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष रवींद्र वाणी, धुळे तालुकाध्यक्ष भगवान पाटील, नारायण माळी, मनोहर पाटील, रामदास जगताप आदीं आंदोलनात सहभागी झाले. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image