कामगंध सापळ्यांची हेराफेरी...बोंडअळी सापळ्यात येणार कशी?

जगन्नाथ पाटील
Friday, 7 August 2020

कृषी विभागाने सजगता दाखवित कामगंध सापळ्यांविषयी माहिती व प्रत्यक्ष प्रायोगिता दाखवायला सुरुवात केली आहे. बाजारात कामगंध सापळ्यांना मागणी वाढल्याने विक्रेत्यांकडून हेराफेरी सुरु झाली आहे.

कापडणे : धुळे जिल्ह्यात सात जूनपासूनच सातत्यपुर्ण पावसामुळे पिकांची वाढ जोमदार झाली आहे. कापूस वाढीला अधिकच पोषक वातावरण असल्याने चांगलेच बहरली आहेत. कापसाची चांगली स्थिती असतांना बोंडअळीचा प्रादुर्भाव जाणवायला सुरूवात झाली आहे. कृषी विभागाने सजगता दाखवित कामगंध सापळ्यांविषयी माहिती व प्रत्यक्ष प्रायोगिता दाखवायला सुरुवात केली आहे. बाजारात कामगंध सापळ्यांना मागणी वाढल्याने विक्रेत्यांकडून हेराफेरी सुरु झाली आहे.

बोंड अळीच्या प्रादुर्भावास सुरुवात
धुळे जिल्ह्यात कापसाचे पासष्ट टक्‍के क्षेत्र आहे. शेतकऱ्यांची पुर्ण आर्थिक भिस्त कापसावरच अवलंबून आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावास सुरूवात झाल्याने; शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी कृषी सहाय्यक शेती शिवारात फिरुन निरीक्षण करीत आहेत. त्यांनाही प्रादुर्भाव होत असल्याचे जाणवू लागले आहे. आतापासूनच उपाय करण्याच्या सुचना कृषी सहाय्यक देत आहेत.

कामगंध सापळ्याच्या किंमतीत वाढ
बोंड अळीच्या प्रजननापूर्वीच उपाय म्हणून कामगंध सापळ्यांची मागणी वाढली आहे. बरेचसे दुकानदार अद्याप उपलब्ध नसल्याचे सांगत आहेत. तर काही कृषी केंद्रांनी पन्नासपासून ते ऐंशीपर्यंत विक्री सुरु केलीय. एकरी दहा ते पंधरा सापळे लावण्याचेही केंद्र संचालकच सुचवित आहे. एकरी अधिक सापळे लावण्याचे सुचविणे, अधिक भाव आकाराने, उपलब्ध नसल्याचे सांगत आतापासूनच सापळे उपलब्ध नसल्याचे सांगत, सापळ्यांची हेराफेरी सुरु झाली आहे.

हवेत अनुदानाचे सापळे
कृषी विभागाने वेळीच जागे झाले पाहिजे. प्रत्येक गावात दोन चार सापळे लावत, प्रयोग करण्यापेक्षा अनुदानाचे सापळे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तर सापळ्यांच्या हेराफेरीवर लक्ष ठेवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kapdane dhule bondali kamgandh sapda fraud salesman