अपघातांच्या मालिकेमुळे सटाणा-मालेगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

सटाणा : अपघातांच्या मालिकेमुळे सतत चर्चेत असलेला सटाणा-मालेगाव रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याने आजपर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचा बळी घेतला असून काल (ता.२८) रोजी पहाटे या रस्त्यावर पुन्हा सात जणांचा बळी गेल्याने रस्ता सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सटाणा : अपघातांच्या मालिकेमुळे सतत चर्चेत असलेला सटाणा-मालेगाव रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याने आजपर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचा बळी घेतला असून काल (ता.२८) रोजी पहाटे या रस्त्यावर पुन्हा सात जणांचा बळी गेल्याने रस्ता सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गुजरात राज्याकडून धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून नगर, नाशिक, शिर्डीकडे जाणारी अवजड वाहने भावडबारी घाटातील व चांदवडजवळील महागडा टोल नाका टाळण्यासाठी सटाण्याहून मालेगावमार्गे पुढे जातात. आठ ते अठ्ठावीस टायरी मालवाहू वाहनांमुळे या रस्त्यावर इतरांना नेहमी जीव मुठीत धेऊन चालावे लागते. त्यातच रात्रभर प्रवास केल्याने कंटाळलेल्या अवजड वाहनाच्या चालकांचा ताबा सुटतो किंवा अतिवेगाने जात असल्याने लहान वाहने दुचाकींना कट मारल्याने अनेक निष्पाप व्यक्तींचे बळी गेले आहेत.

सटाणा - आराई, सटाणा - ब्राह्मणगाव, लखमापूर, आघार ते थेट मालेगावपर्यंत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळ्यापिवळ्या गाड्या, रिक्षांमध्ये दररोज पहाटेपासूनच मोठी स्पर्धा चाललेली असते. नंबर आल्याबरोबर क्षमतेपेक्षाही जास्त प्रवाशांची बेकायदा वाहतूक सुरु आहे. रिक्षाचालकास बसण्यासही जागा नसते. चालकाच्या डाव्या व उजव्या बाजूकडे मोठ्या संख्येने प्रवाशी भरले जातात. मागच्या बाजूसही बसणाऱ्यांना असह्य होईल, इतक्या प्रवाशांची भरती केली जात असते. 

प्रवाशांच्या इच्छेप्रमाणे त्याचा थांबा आला, की वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून चालक अचानक ऐन रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा थांबवतो. त्यामुळे मागून वेगात येणारे वाहन या वाहनावर आदळते किंवा वाहनाची गती कमी करण्याच्या प्रयत्नात असलेला मागील वाहनचालक वाहन नियंत्रित येत नसल्याने आपले वाहन रस्त्याच्या बाजूला खोल गटारीत टाकतो.

या रस्त्यालगत असलेल्या शेतशिवारात राहणारे अनेक आबालवृद्ध आपल्या शेताच्या बांधावर उतरता येईल, म्हणून रिक्षातून प्रवास करणे पसंत करतात व स्व:ताचा जीव धोक्यात घालतात. सटाणा बस आगारातून मालेगावसाठी चक्री बससेवा चालू ठेवल्यास पर्याय मिळेल व या अवैध वाहतुकीवर जनतेला विसंबून राहावे लागणार नाही.

गेल्या आठ दिवसांपूर्वीच सटाणा - मालेगाव रस्त्यावर शेमळीजवळ मालेगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार अनिल बन्सीलाल अहिरे यांचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाला होता. तर लखमापूर येथे बसथांब्यावर शेतकरी प्रकाश दळवी यांनाही ट्रेलरने चिरडले होते. 

महिनाभरापूर्वी शेमळी पुलाजवळ असलेल्या बापू पुंजाराम सोनवणे यांच्या घरात सकाळी अवजड वाहतूक करणारा टँकर अपघातग्रस्त होऊन पडला. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. राज्यमार्गात सटाणा - मालेगाव रस्त्याचा समावेश झाला असून रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या सुरु आहे. ते पूर्ण झाल्यावर अपघातांची मालिका खंडित होईल, या समजूतीवर निष्पाप जनता विसंबून आहे.

Web Title: marathi news local news satana news satana malegaon road