मालेगाव महापौर निवडणुकीत शिवसेना किंगमेकर 

live
live

मालेगाव ः राज्यातील राजकारणात मॅजिक फिगर 145 च्या खेळात शिवसेनेचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले होते. त्याचीच फलश्रुती म्हणून महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेला संधी मिळाली. मालेगाव महापालिकेतही अशीच परिस्थिती असून, 84 सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत 13 सदस्यीय शिवसेना किंगमेकर आहेत. कॉंग्रेस किंवा महागटबंधन आघाडीला महापौरपद काबीज करण्यासाठी शिवसेनेशिवाय पर्याय नाही. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसची महाविकास आघाडी झाल्याने तोच कित्ता येथे गिरविला जातो, की शिवसेना महागटबंधन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. 

     महापौरपद ओबीसी महिला राखीव आरक्षित झाल्याने अडीच वर्षांसाठी महिलाराज असेल. रविवारी (ता. 1) रात्री हुसेन शेठ कंपाउंडमध्ये झालेल्या महागटबंधन आघाडी व एमआयएम नगरसेवकांच्या बैठकीत आघाडीतर्फे (पै.) ज्येष्ठ नेते निहाल अहमद यांच्या कन्या शानेहिंद निहाल अहमद यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाले. बैठकीला महागटबंधन व एमआयएमचे 32 पैकी 30 नगरसेवक उपस्थित होते. शानेहिंद यांचे चुलत बंधू अतिक कमाल व महागटबंधनचे नगरसेवक एजाज बेग अनुपस्थित होते. बेग यांच्या पत्नी यास्मीन एजाज बेग यांचेही नाव महापौरपदासाठी चर्चेत होते. या दोघा सदस्यांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. कॉंग्रेसतर्फे माजी महापौर ताहेरा शेख यांचे नाव आघाडीवर आहे. महापौर निवडणुकीसाठी लागणारी आर्थिक रसद पाहता ऐनवेळी कॉंग्रेस, शिवसेनेला महापौरपदासाठी संधी देणार का? याविषयी चर्चा सुरू आहे. 

हालचाली गतीमान

कॉंग्रेस व महागटबंधन आघाडीचे नेते महापौरपदासाठी माजी मंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधून आहेत. श्री. भुसे रविवारी रात्री मुंबईहून मालेगावी परतल्यानंतर हालचाली गतिमान झाल्या. कॉंग्रेसचे नेते महापौर शेख व माजी आमदार आसिफ शेख यांनी श्री. भुसे यांची मुंबईतच भेट घेतली. महागटबंधन आघाडीचे नेते आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माइल यांनीही श्री. भुसे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांच्याशी चर्चाही केल्याचे समजते. सोमवारी (ता. 2) श्री. भुसे यांची शानेहिंद यांचे पती जनता दलाचे सरचिटणीस मुश्‍तकीम डिग्निटी यांनी भेट घेऊन चर्चा केली.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार मग इकडे

श्री. भुसे यांनी सोमवारी संपर्क कार्यालयात शिवसेना नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. अडीच वर्षे शिवसेना महापालिकेत कॉंग्रेससोबत आहे. राज्यातील आघाडीचा पॅटर्नची येथे यापूर्वीच अंमलबजावणी झाली आहे. कॉंग्रेसचे रशीद शेख महापौर, तर शिवसेनेचे सखाराम घोडके उपमहापौर आहेत. सत्तेच्या या बिकट आकडेवारीत शिवसेना अधिकाधिक पदे पदरात पाडून घेतानाच विकासकामे होण्यासाठी कोणत्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेणार, यावरच महापौर निवडणुकीचे गणित अवलंबून आहे. उपमहापौरपदाबरोबरच दोन्ही वर्षे स्थायी समिती सभापतिपदासाठी शिवसेनेतर्फे दावा केला जाऊ शकतो. गेल्या वेळी एका वर्षासाठी शिवसेनेचे जे. पी. बच्छाव यांना एक वर्षासाठी स्थायी समिती सभापतिपदाची संधी मिळाली होती. 


इच्छुक मातब्बरांचा हिरमोड 
मनपातील पक्षीय बलाबल पाहता शिवसेना किंगमेकर असली, तरी नऊ सदस्य असलेल्या भाजपची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कॉंग्रेस, शिवसेना एकत्र आल्यास त्यांच्या मतांची बेरीज 42 होते. महागटबंधन आघाडी, एमआयएम व भाजप एकत्र आल्यास त्यांच्या मतांची बेरीज 41 होते. त्यामुळे कोणत्याही गटाला शिवसेनेशिवाय पर्याय नाही. यातच आरक्षण महिला राखीव निघाल्याने महापौरपदासाठी इच्छुक मातब्बरांचा हिरमोड झाला आहे. महापौरपदाचा कार्यकाळ 15 डिसेंबरला संपणार आहे. लवकरच महापौर निवडीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्‍यता आहे. 

महापालिका पक्षीय बलाबल 
* कॉंग्रेस - 29 
* महागटबंधन आघाडी - 25 
* शिवसेना - 13 
* भाजप - नऊ 
* एमआयएम - सात 
* रिक्त - एक 
------------------------------ 
एकूण सदस्य - 84 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com