पुन्हा बिबट्याचा हल्ला अन् भीती कायम!

शिवनंदन बाविस्कर
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

पिलखोड(ता. चाळीसगाव) : बिबट्या ठार झाल्यामुळे परिसरातील हल्ले थांबतील, असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र, बुधवारी(20 डिसेंबर) पुन्हा सायगाव शिवारात बिबट्याने वासराचा फडशा पाडला असून गिरणा परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.

पिलखोड(ता. चाळीसगाव) : बिबट्या ठार झाल्यामुळे परिसरातील हल्ले थांबतील, असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र, बुधवारी(20 डिसेंबर) पुन्हा सायगाव शिवारात बिबट्याने वासराचा फडशा पाडला असून गिरणा परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.

हैदराबाद येथील शार्प शूटर नवाब अली खान यांनी 8 डिसेंबरला पिंपळवाड म्हाळसा शिवारात बिबट्याला ठार केले होते. त्यानंतर गिरणा परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. शिवाय नवाब अली खान यांनी या भागात अद्यापही बिबट मादी व बछडे असल्याचे म्हटले होते. बिबट्या ठार झाल्याने हल्ले थांबले असे वाटत होते. मात्र, सायगाव येथील शेतकरी विठ्ठल काशिनाथ माळी यांच्या वासरीचा बिबट्याने फडशा पाडला. 

मन्याड धरणाच्या फाट्यालगत विठ्ठल माळी यांची शेती आहे. शेतात दोन गायी व वासरु बांधले होते. बुधवारी(20 डिसेंबर) सकाळी साडेआठच्या सुमारास बिबट्याने दोन गायींच्या मध्यभागी बांधलेल्या वासरुला ओढुन नेले. जवळच्या उसाच्या शेतात त्याच्यावर हल्ला करुन फडशा पाडला. बिबट्याने मानेवर वार करुन मागच्या उजव्या पायाचा भाग खाल्ला. माळी हे शेतात आले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. 

दरम्यान, वन विभागाला माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी हजर झाले. हल्ला झालेल्या परिसरात 'ट्रॅप कॅमेरा' व काही अंतरावर पिंजरा लावला असल्याचे शेतकरी माळी यांनी सांगितले. या घटनेमुळे पुन्हा परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी जीव मुठीत धरुन शेतात जात आहेत.

दरेगाव भागात बिबट्याचे दर्शन
4 डिसेंबरला दरेगाव शिवारात बिबट्याने मुलाला जखमी केले होते. त्यानंतर बिबट्या ठार झाला. मात्र, बुधवारी(20 डिसेंबर) सकाळी साक्री येथून आलेल्या मेंढपाळ कुटूंबियांना व शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे मेंढपाळ कुटुंबियांनी आपला वाडा वरखेडे शिवारात हलविला. दरम्यान, पुन्हा बिबट्याच्या दर्शनामुळे या भागात भीती पसरली आहे.

Web Title: marathi news marathi websites Chalisgaon News Leopard