Vidhan sabha : तापी मेगा रिचार्ज, शेळगाव बॅरेजसह सर्वांगीण विकासाला प्राधान्य : हरिभाऊ जावळे 

Haribhawu javle
Haribhawu javle


केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभार व सुशासन जनतेला दिले. त्यामुळे देश व राज्य वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वच्छ सरकारचा एक घटक म्हणून काम करण्याची संधी मला जनतेने दिली. या विकासकामांच्या जोरावरच पुन्हा मी जनतेसमोर जात आहे. शेळगाव बॅरेजसाठी ९६८ कोटींचा निधी आणल्याने काम प्रगतिपथावर आहे. तर तापी मेगा रिचार्ज प्रकल्पासाठीही पाठपुरावा सुरू आहे. हिंगोणा (ता. यावल) येथे केळी संशोधन केंद्र व खिरोदा (ता. रावेर) येथे हॉर्टिकल्चर महाविद्यालय मंजूर केले आहे. मतदारसंघात चौफेर विकासकामे केल्याने जनता आपल्या पाठीशी आहे, असा विश्‍वास रावेर-यावल मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. 

आपली भूमिका स्पष्ट करताना हरिभाऊ जावळे म्हणाले, गेल्या पाच वर्षांत आपण जातपात, धर्म असा भेदभाव न करता 'आमदार' हा आम जनतेचा 'लोकप्रतिनिधी' असतो, या भावनेतून रावेर - यावल मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली. या कामांचा लेखाजोखा 'बांधिलकी' या कार्यवृत्तांतमधून जनतेसमोर ठेवला आहे. मतदारसंघातील एकही गाव असे नाही, की त्याठिकाणी आपण विकास केला नाही. ग्रामीण मतदारसंघ असलेल्या रावेर, यावल तालुक्यात केळी, कपाशी, ऊस आदी मुख्य पिके आहेत. शेतमालाची वाहतूक करण्यासाठी रस्ते महत्त्वाचे असल्याने गावांना जोडणारे रस्ते पक्के केले. तर कच्च्या रस्त्यांचे खडीकरण करून जाळे विणले. 

विकासाला प्राधान्य 
आरोग्य सेवेसाठी आभोडा, पातोडा, पाडळसे, भालोद, कोसगाव, चिनावल येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व सहस्रलिंग, बामणोद येथे आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम केले. अहिरवाडी, हंबर्डी, पिपरुड, राजोरा, मारुळ, हिंगोणा, डोंगर कठोरा, बामणोद, कासवा, वाघोड, रोझोदा, खानापूर, निंभोरा, रसलपूर या गावातील पाणी पुरवठा योजना मार्गी लावल्या. तसेच सामाजिक सभागृह, वीज उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, गावागावांत हायमस्ट दिवे, बऱ्हाणपूर-अंकलेश्र्वर या प्रमुख रस्त्याचे नूतनीकरण आदी कामे केली. भिकनगाव, पाल, खिरोदा, पिंपरुड रस्त्याचे काम सुरू आहे. सातपुड्यातील दुर्गम आदिवासी भागातील गावांमध्येही रस्ते व विकास कामे केली. रावेर, यावल येथील पंचायत समिती प्रशासकीय इमारत, शासकीय गोदाम उभारले. यावल, फैजपूर, रावेर पोलिस ठाणे, तहसील कार्यालय, आरोग्य विभाग, महिला बालविकास, भूमी अभिलेख विभाग, औषध निर्माण, जिल्हा परिषद शाळा यांना संगणक उपलब्ध करून दिले. विविध गावांमधे पेव्हर ब्लॉक बसविले. पाल (ता. रावेर) येथे आदिवासी बांधवांसाठी सांस्कृतिक संकुल केले. यावल-रावेर तालुक्यातील ६३ शाळांमध्ये स्वछतागृहाचे बांधकाम केले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत विविध रुग्णांना आर्थिक मदत मिळून दिली. 

पाण्याची समस्या सुटणार 
पाण्याची समस्या सुटावी, यासाठी संसद व विधानसभेत तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाची संकल्पना मांडून पाठपुरावा केला. या प्रकल्पाला मंजुरी आधीच मिळाली असून, या प्रकल्पाचे हवाई सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. निवडणुकीनंतर या प्रकल्पाला गती मिळेलच. शेळगाव बॅरेजसाठी ९६८ कोटी उपलब्ध करून कामाला गती दिली. तसेच राजकारणाच्या पलीकडे जाऊन संतमंहत यांचे सोबत लोकसहभागातून रावेर-यावलमध्ये जलसंधारणाचा उपक्रम राबवला. ज्यामध्ये १५ नद्या आणि ३ नाल्यांचे खोलीकरण झाले. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने या अभियानाचा खूप फायदा भूजल पातळी वाढीसाठी झाला. 

केळी प्रक्रिया उद्योग 
केळी खोडावर प्रक्रिया करुन त्याद्वारे सेंद्रिय द्रव्य खते तयार करणारा देशातील पहिला प्रायोगिक तत्त्वावरील ताप्ती व्हॅली बनाना प्रकल्प फैजपूर (पिंपरूड) येथे उभारला व केळी खोडापासून धागे, सेंद्रिय द्रवरूप खत, गांडूळ खत व कम्पोस्ट ची निर्मिती केली जात आहे. फैजपूर येथे २०१६ मध्ये महाआरोग्य शिबिर घेतले, त्याचा गोरगरीब जनतेला मोठा फायदा झाला. महाराष्ट्रातील पहिले अटल महा कृषी शिबिर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने फैजपूर येथे यशस्वीरीत्या घेतले. 

कृषी तंत्रज्ञान शेती बांधापर्यंत घेऊन जाणार 
महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून शेतकरी बांधवांसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. या विभागांतर्गत येणाऱ्या विविध कृषी विद्यापीठ, प्रयोग शाळांमध्ये होणारे संशोधन हे शेतकऱ्यांपर्यंत पोहवण्याचा आपला प्रयत्न आहे. तसेच अडचणीतील मधुकर साखर कारखान्याला शासनाच्या माध्यमातून यापूर्वीही मदत केली असून, पुढेही प्रयत्न राहणार आहेच. 

सेव्ह बनाना चळवळ 
केळी करपा निर्मूलनासाठी यापूर्वी मोठे अनुदान आणले. तर आता सेव्ह बनाना ही चळवळ सुरू केली आहे. रोगमुक्त दर्जेदार केळीचे उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महिला बचत गटांना विविध उद्योग सुरू करण्यासाठी चालना दिली आहे. त्यांच्या मालाचे ब्रँण्डिंग होऊन सक्षमीकरणासाठी कार्यशाळा आयोजित केल्या. तसेच मोठ्या कंपनीशी लिंकिंग करून देण्यात आले. मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या बळावर आपला विजय निश्‍चित आहे, असे आमदार जावळे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com