esakal | तमाशाकडे वळणारे पाय वळले कीर्तनाकडे 
sakal

बोलून बातमी शोधा

viswnat maharage imege

कीर्तनकार होण्यासाठी एखाद्याच्या मनाची मशागत करणारे साधुत्व तमाशा चालवणाऱ्या विठाबाईंमुळे आपण कीर्तनकार झाल्याने विश्‍वनाथ महाराज वाडेकर त्यात धन्यता मानतात. 

तमाशाकडे वळणारे पाय वळले कीर्तनाकडे 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः ढोलकीच्या तालावर वग म्हणण्याऐवजी नारदीय कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या लोकनाट्य सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांनी दिलेला सल्ला बहुमोल मानत गेल्या पाच दशकांपासून खानदेशातील ह. भ. प. विश्वनाथ महाराज वाडेकर महाराज हे वयाच्या ६३ व्या वर्षीही समाजजागृतीचे काम करीत आहेत. तमाशाकडे वळणारे त्यांचे पाय कीर्तनाकडे वळवणारे वाडेकर महाराजांच्या आयुष्याची वाटचाल प्रेरणादायी ठरली आहे. 

वाडे (ता. भडगाव) येथे अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या घरात त्यांचा जन्म झाला. त्यामुळे मिळेल ते काम करून गुजराण करणारे विश्‍वनाथ महाराज आपल्या मित्रासोबत १९८८ मध्ये कजगाव (ता. भडगाव) येथे विठाबाई नारायणगावकर यांचा तमाशा पाहण्यासाठी गेले. तमाशात काम मिळावे म्हणून त्यांनी तमाशा मालक विठाबाई नारायणगावकर यांची भेट घेतली व ‘मला तमाशात काम द्या, मी गातो, विनोद करतो, सर्वांना रडवतो, तुम्हाला नक्की आवडेल’ असे या तरुणाने विठाबाईंना सांगून गाणेही म्हणून दाखवले. त्याचे गायन ऐकून त्या प्रभावित झाल्या. मात्र, भविष्यात या तरुणाची परवड होऊ नये म्हणून विठाबाईंनी त्याला ‘तमाशामध्ये न येता तू भजन, कीर्तन कर’ असा सल्ला दिला. तेव्हापासून विश्वनाथ महाराज वाडेकर हे नामवंत व्यावसायिक कीर्तनकार झाले. १९८९ पासून ते कीर्तने करतात. आतापर्यंत महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व गुजरात राज्यात त्यांनी दहा हजारांवर कीर्तने केली आहेत. सध्या त्यांचे चाळीसगावात वास्तव्य असून रामकथा सोबतच भागवत कथाही ते करतात. बोलताना मराठीसह अहिराणीचा मुक्त वापर करून वाडेकर महाराजांनी आपल्या विनोदी शैलीतून मोठा लौकिक प्राप्त केला आहे. त्यांच्या निरूपणात सामान्य माणसाच्या जगण्यातील ताणेबाणेपणा, विसंगती, अंधश्रद्धा, त्यांच्या अनुभवासह अध्यात्म आदींचा अंतर्भाव असतो. 

क्‍लिक कराः  जळगाव कलेक्‍टर टोचतात सिव्हील यंत्रणेचे कान..तेव्हा !
 

महाराष्ट्रातील एकमेव घटना 
आपले कीर्तनकार होण्याचे सर्व श्रेय विश्वनाथ महाराज वाडेकर हे विठाबाई नारायणकर यांना देतात. त्या तमाशा कलावंत असल्या तरी त्यांच्या मनात वारकरी संप्रदायाविषयी अपार श्रद्धा होती. केवळ दारिद्र्यामुळे पोट भरण्यासाठी तमाशात काम मागायला आलेल्या तरुण कलावंताला तमासगीर महिलेने कीर्तनकार होण्याचा सल्ला द्यावा आणि ती प्रेरणा घेऊन या तरुणाने उत्तम व्यवसाय कीर्तनकार बनावे, ही महाराष्ट्रातील एकमेव घटना असावी. विठाबाईंचे अनुभव ऐकून अनेकांना आजही धक्काच बसतो. तमाशा कलावंत रघुवीर खेडकर हे देखील पावसाळ्यात चार महिने प्रवचन करतात. कीर्तनकार होण्यासाठी एखाद्याच्या मनाची मशागत करणारे साधुत्व तमाशा चालवणाऱ्या विठाबाईंमुळे आपण कीर्तनकार झाल्याने विश्‍वनाथ महाराज वाडेकर त्यात धन्यता मानतात. 

नक्की वाचा :धक्कादायक...! पती समोरच झाला पत्नीवर अतिप्रसंग 
 

loading image
go to top