मेहूणबारे पोलीसांचे हातभट्टी दारू अड्यांवर छापे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 एप्रिल 2020

मेहूणबारे पोलीस ठाण्या अंतर्गत लॉकडाऊनच्या काळात संबंधीत गावांमध्ये पोलीसांकडून अनेक उपाययोजना सुरु आहेत. मेहूणबारे व रहीपुरी येथे बेकायदा गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : कोरोना या जीवघेण्या विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे.या काळात जीवनावश्यक वस्तु वगळता सर्व व्यवसाय बंद आहेत.मात्र दुसरीकडे या लॉकडाऊनचा फायदा घेऊन चाळीसगाव तालुक्यात ग्रामीण भागात पोलीसांना न जुमानता सर्रासपणे बेकायदा गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात आहे. मेहूणबारे पोलीसांनी आज बुधवारी मेहूणबारे व रहिपुरी येथे गावठी हातभट्टी दारू अड्यांवर छापे टाकून हजारो लिटर रसायन जागेवरच नष्ट केले.या कारवाईने दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अवघा देश संकटात सापडला आहे. देशात आतापर्यंत 31 लोकांचा बळी गेला तर एक हजार हून अधिक रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने सध्या 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषीत केला आहे.या काळात सर्व आस्थापनांसह देशी विदेशी दारूचे दुकाने, वॉईन शॉप 14 एप्रिलपर्यंत बंद असतांना  ग्रामीण भागात मात्र सर्रास देशी, विदेशी दारूसह गावठी हातभट्टीची दारू मिळत असल्याची ओरड आहे. त्यामुळे दारू विक्रेत्यांनी या लॉकडाऊनचा पुरता फज्जा उडवला आहे.

मेहूणबारेत मोहाची दारू
मेहूणबारे पोलीस ठाण्या अंतर्गत लॉकडाऊनच्या काळात संबंधीत गावांमध्ये पोलीसांकडून अनेक उपाययोजना सुरु आहेत. मेहूणबारे व रहीपुरी येथे बेकायदा गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, उपनिरीक्षक हेमंत शिंदे, पृथ्वीराज कुमावत, योगेश मांडोळे,मच्छिंद्र तारडे यांच्या पथकाने छापे टाकून हजारो लिटर दारूचे रसायन जप्त करून जागीच नष्ट केले.मेहूणबारे गावाच्या पश्चिमेला गिरणेच्या काठी बाभळीच्या झाडाच्या आडोश्याला भिवा गायकवाड हा गैरकायदा गावठी हातभट्टीची दारू तयार करीत असतांना मिळून आला. दुपारी12.35 वाजेच्या सुमारास हा छापा टाकला. यावेळी पोलीसांनी 4500 रूपये किंमतीचे गुळ व मोह मिश्रीत रसायन, 7 हजार रूपये किंमतीची 250 लिटर तयार दारू व 800 रूपये किंमतीचे दारू तयार करण्यासाठी लागणारे साहीत्य असे 18 हजार 800 रूपयांचा ऐवज जप्त करून तो जागेवरच नष्ट केला. याप्रकरणी माननीय पंतप्रधान, भारत सरकार यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने संपुर्ण देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषीत केलेले असतांना त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, जळगाव यांनी जनतेला विनाकारण घराबाहेर पडण्यास निर्बंध घालून दिलेले असतांना लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करून गैरकारदा हातभट्टीची दारू तयार करीत असताना मिळून आल्याप्रकरणी मेहूणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रहिपुरी येथेही दारू अड्ड्यावर कारवाई
रहिपुरी (ता.चाळीसगाव) येथे गिरणा नदीकाठालगत झुडूपात गावठी हातभट्टीची दारु तयार केली जात असल्याची माहिती मिळाली असता चाळीसगाव उपविभागीय कार्यलयाचे पथक आमोल कुमावत,दिनेश पाटील,नंदकिशोर निकम,मुकेश पाटील, मेहुणबारे पोलीस ठाण्याचे हवलदार पृथ्वीराज कुमावत यांनी आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास छापा टाकून सुमारे 18 हजार रूपये किंमतीचे दारू रसायन जप्त केले. मात्र पोलीस आल्याची कुणकुण लागताच दारू अड्डाचालक पळून जाण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी अज्ञात इसमाच्या विरोधातही मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवलदार पृथ्वीराज कुमावत हे करीत असुन या दोन्ही कारवायांनी परिसरात खळबळ उडाली आहे.पोलीसांनी ही मोहीम तीव्र करून आणखी कारवाया कराव्यात अशी मागणी होत आहे.

तीन दुचाक्या जप्त
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने संपुर्ण देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी,जळगाव यांनी जनतेला विनाकारण घराबाहेर पडण्यास निर्बंध केलेले आहेत. रस्त्यावर विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांना मेहूणबारे पोलीसांनी गस्त दरम्यान 7 जणांवर कलम 188 प्रमाणे कारवाई केली.मेहूणबारे दोन रहिपुरी येथे 1 दुचाक्या पोलीसांनी जप्त केल्या.या धडक कारवाईने घराबाहेर विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mehunbare Police raid on Mehun about liquor barricades