#BATTLE FOR NASHIK मनसेचे बळ महाआघाडीला  राज ठाकरे यांच्या सभेतून मिळाले उत्तर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

नाशिक ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लोकसभा निवडणुकीत काय भूमिका राहील, या प्रश्‍नाचे उत्तर शनिवार (ता. 6)च्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून नाशिकमधील मनसेच्या कार्यकर्त्यांना मिळाले असून, राज ठाकरे यांनी मोदी-शहा या दोन व्यक्तींना विरोध करण्यासाठीच राज्यभर प्रचारदौरे करणार असल्याचे स्पष्टीकरण दिल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघात "मनसे'चे बळ कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या "महाआघाडी'ला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. निवडणुकीचे पारडे फिरविण्याची ताकद मनसेत असल्याने महाआघाडीच्या गटात ठाकरे यांच्या भाषणाने चैतन्य आल्याची चर्चा शहरात सुरू झाली. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला म्हणून नाशिककडे पाहिले जाते. 2007 च्या महापालिका निवडणुकीत 12 नगरसेवक मनसेचे निवडून आले. त्यानंतर 2009 मध्ये या शहराने मनसेला तीन आमदार दिले, तर 2012 मध्ये थेट महापालिकेची सत्ता देऊन विश्‍वास दाखविला. 2009 मध्ये मनसेने नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढविली. त्या निवडणुकीत मनसेकडून उभे असलेले हेमंत गोडसे यांना दुसऱ्या क्रमांकाची दोन लाख 16 हजार 674 मते मिळाली. विजयी उमेदवाराला 36.34 टक्के, तर मनसेच्या उमेदवाराला 32.98 टक्के मतदान पडल्याने मनसेची ताकद दिसून आली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे डॉ. प्रदीप पवार यांना 63 हजार 50 मते मिळाली. या आकडेवारीवरून नाशिक शहरात मनसेची ताकद असल्याचे दिसून येते. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसेचे काय, असा सवाल मनसे कार्यकर्त्यांना होता. पक्षाच्या वर्धापन दिन मेळाव्यात लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले; परंतु त्यानंतरही मग कोणाचा प्रचार करायचा, असा सवाल कार्यकर्त्यांमध्ये विचारला जात होता. श्री. ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मेळावा झाला. ठाकरे यांनी थेट पंतप्रधान मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल करत या दोन व्यक्तींपासून देशाला वाचविण्याचे आवाहन केले. राज्यातील यापुढील सभा मोदी-शहा यांच्या विरोधातच राहणार असल्याचे जाहीर केल्याने भाजप व भाजपला साथ देणाऱ्या शिवसेनेविरोधातच राहणार असल्याचे उत्तर मिळाले; परंतु यानिमित्ताने मग कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीला साथ द्यायची का, या प्रश्‍नाचे स्पष्ट उत्तर जाहीर सभेतून ठाकरे यांनी दिले नसले तरी मोदी-शहा यांच्या महायुतीला दुसरा पर्याय म्हणजे महाआघाडीच राहणार असल्याचा अप्रत्यक्ष संदेश मनसेच्या मेळाव्यातून मिळाल्याने ठाकरे यांची रसद नाशिकमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीच्याच मागे राहणार हे आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीकडून यापूर्वीच मनसेला व्यासपीठावर निमंत्रित करण्यात आले आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची निवासस्थानी भेट घेतल्याने मनसेचा पाठिंबा राष्ट्रवादीलाच राहणार असल्याचे फक्त बोलले जात होते; परंतु गुढीपाडवा मेळाव्याच्या संदेशातून त्यावर शिक्कामोर्तब झाले. 

आता नाशिकमधील सभेकडे लक्ष 

राज ठाकरे राज्यात नऊ ते दहा सभा घेणार आहेत. अर्थात बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्येही त्यांची सभा होण्याची शक्‍यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची असल्याने सभेचे नियोजन मनसेकडून सुरू असल्याचे समजते. त्यादृष्टीने नाशिकच्या सभेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 
 
Web Title: marathi news MNS