Vidhan sabha 2019 : समोर विरोधक नाहीत, मग मोदी, शहांच्या सभा कशासाठी? : जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

जळगाव : राज्यात मला समोर विरोधक दिसत नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री करतात, मग पंतप्रधान मोदींच्या सहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्या दहा सभा महाराष्ट्रात कशासाठी लावतात, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. जळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

जळगाव : राज्यात मला समोर विरोधक दिसत नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री करतात, मग पंतप्रधान मोदींच्या सहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्या दहा सभा महाराष्ट्रात कशासाठी लावतात, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. जळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, गुलाबराव देवकर, जळगाव शहर मतदार संघातील उमेदवार अभिषेक पाटील, विलास भाऊलाल पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, राज्यात मला पहिलवान विरोधक दिसत नाहीत, असे असेल तर त्यांनी घरी बसूनच निवडणुका जिंकल्या पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहा सभा तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्या दहा सभा महाराष्ट्रात घेत आहेत. विरोधकच नाहीत, तर या सभांची आवश्‍यकता काय? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे घाबरलेले आहेत. त्यांनी शरद पवार यांची धास्ती घेतलेली आहे. त्यामुळे त्यांच्यासह त्यांचे नेते अमित शहा हे राज्यात शरद पवार यांच्यावरच आरोप करीत आहेत. 

जिल्ह्याकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष 
जळगाव जिल्ह्याच्या विकासाकडे सत्ताधारी पक्षाचे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. ते म्हणाले, जिल्ह्यातील पाटबंधारे मंत्री असतानाही सिंचनाचा एकही प्रकल्प पूर्ण केलेला नाही. पाडळसरे प्रकल्प पूर्ण झालाच नाही. तर गिरणा नदीवर बलून बंधारे बांधण्याची केवळ घोषणा करण्यात आली आहे. त्याचेही काम झालेले नाही. "मेगा रिचार्ज'ची फक्त घोषणाच केली आहे. त्यामुळे आता घोषणा करणारे हे सरकार आता जनतेला नकोसे झाले आहे. 

विरोधकांची ताकद दिसून येईल. 
राज्यात विरोधकच नाही म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी नेत्यांच्या मागे "इडी', "आयटी' विभाग लावून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला आता हे कळले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालात राज्यात सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधी पक्षाची ताकदच अधिक दिसून येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news modi amit shaha sabha jayant patil