युसूफ मेमनचे शवविच्छेदन धुळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 June 2020

युसूफ मेमनचे शवविच्छेदन धुळे येथील जिल्हा रुग्णालयात करावयाचे असल्याने त्याचा मृतदेह काल रात्रीच येथील जुन्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. आज दुपारी अडीचला त्याचे पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात शवविच्छेदन झाले.

धुळे : सारा देश हादरविणाऱ्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी युसूफ अब्दुल रज्जाक मेमन (वय 55) याचा शुक्रवारी (ता. 26) नाशिक येथील कारागृहात हृदयविकाराने मृत्यू झाला होता. शासकीय नियमानुसार युसूफ मेमनचे शवविच्छेदन धुळे येथील जिल्हा रुग्णालयात करावयाचे असल्याने त्याचा मृतदेह काल रात्रीच येथील जुन्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. आज दुपारी अडीचला त्याचे पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात शवविच्छेदन झाले. यानंतर रुग्णवाहिकेने मृतदेह मुंबईला नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
मुंबईतील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटात 257 जणांचा मृत्यू, तर एक हजार 400 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. या दहशतवादी हल्ल्याचा कट कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन यांनी रचला होता. या कटात टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमन आणि इसाक मेमन यांचाही समावेश होता. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने युसूफ मेमन व इसाक मेमन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबईतील ऑर्थर रोड, औरंगाबादच्या कारागृहात शिक्षा भोगत होते. यात 2018 मध्ये युसूफ मेमनची नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली होती. जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना युसूफ मेमन (वय 55) याचा काल सकाळी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातच हृदयविकाराने मृत्यू झाला. 

मेडिकल बोर्ड धुळ्यात 
युसूफ मेमनचा मृतदेह विच्छेदनासाठी धुळ्यातील जुन्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. धुळे, नंदुरबारसह जळगाव आणि नाशिक या चार जिल्ह्यांचे मेडिकल बोर्ड धुळ्यात असल्याने त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धुळ्यात आणला गेला. आज दुपारी अडीचला पोलिस बंदोबस्तात मृत युसूफ मेमनचे शवविच्छेदन झाल्यानंतर नाशिक पोलिसांच्या बंदोबस्तात मृतदेह मुंबईला पाठविण्यात आला. शहर पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील, हवालदार सी. एस. पाटील, भूषण खेडवंत, व्ही. एस. शिंपी, विलास पाटील, दिनेश महाले यांच्यासह नाशिक कारागृहाचे दोन अधिकारी, पाच पोलिस कर्मचारी उपस्थित होते. 

सुलेमान मेमनने स्वीकारला मृतदेह 
युसूफ मेमनचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याचा भाऊ सुलेमान मेमन धुळ्यात आला होता. शहर पोलिस उपअधीक्षक हिरे यांनी कोरोनाची सध्याची स्थिती पाहता शक्‍य झाल्यास धुळ्यातच अंत्यसंस्कार करावेत, अशी सूचना सुलेमान मेमनला केली. मात्र, सुलेमानने मृतदेह मुंबईलाच नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तो रवाना करण्यात आला.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mumbai bombspot yusuf meman pm dhule medical collage