मुथूट दरोड्याची उकल,मुख्य सूत्रधाराला अटक,आंतरराज्य दरोड्याच्या टोळीचे कृत्य 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

नाशिक : मुथूट फायनान्सवरील दरोडा आणि हत्त्याप्रकरणाचा छडा लावताना नाशिक पोलीसांनी दरोड्याच्या मुख्य सूत्रधाराला सुरतमधून अटक केली आहे. तर, पाच संशयितांच्या मागावरील पोलीसांचे पथक परराज्यात तळ ठोकून आहेत. 

नाशिक : मुथूट फायनान्सवरील दरोडा आणि हत्त्याप्रकरणाचा छडा लावताना नाशिक पोलीसांनी दरोड्याच्या मुख्य सूत्रधाराला सुरतमधून अटक केली आहे. तर, पाच संशयितांच्या मागावरील पोलीसांचे पथक परराज्यात तळ ठोकून आहेत. 
     घटनेच्या दुसऱ्या दिवशी दिंडोरीरोडवरील आशावाडी येथे सापडलेल्या दुचाक्‍यांच्या वायरलुपवरील क्रमांकाच्या आधारे नाशिक पोलीस संशयितापर्यंत पोहोचले आणि गुन्ह्याची उकल झाली. गुन्ह्यातील संशयित हे गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यातील असून एक संशयित हा पश्‍चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचेही तपासातून समोर आले आहे. दरम्यान, सातपूर-अंबड परिसरातील परप्रांतियांमुळे नाशिकमध्ये पुन्हा गुन्हेगारी फोफावत असल्याचे तपासातून निष्पन्न झाले असून, काही वर्षांपूर्वी नाशिकची रेकी करणाऱ्या दहशतवाद्यालाही श्रमिकनगरमधूनच अटक करण्यात आली होती. 
 

 उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्सवर गेल्या 14 तारखेला भरदिवसा सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सहा संशयितांनी सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत प्रतिकार केल्यामुळे संशयितांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून सॅजू सॅम्युअल यांची निर्घृण हत्त्या केली होती. सदरच्या गुन्ह्यात नाशिक पोलिसांनी दरोड्याचा मुख्य सूत्रधार जितेंद्र विजय बहादूर सिंग राजपूत (34, रा. अंबिका रो-हाऊस, दिंडोली, सूरत, गुजरात. मूळ रा. बैसान, ता. मछलीशहर, जि. जोहानपूर, उत्तरप्रदेश) यास सूरतमधून अटक केली आहे. तर गुन्ह्यातील संशयित आकाश सिंग राजपूत, परमेंदर सिंग (रा. उत्तरप्रदेश), पप्पू उर्फ अनुज साहू (रा. पश्‍चिम बंगाल), सुभाष गौड (रा. श्रमिकनगर, सातपूर, नाशिक. मूळ रा. उत्तरप्रदेश), गुरु (बिहार) या आंतरराज्य टोळीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

संशयितावर खून, दरोडा, खंडण्यांसह गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पत्रकार परिषदेमध्ये पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील गुन्ह्याच्या तपासाची माहिती दिली. अजूनही पाच ते सहा पथके हे परराज्यात तळ ठोकून आहेत. दरम्यान, संशयित जितेंद्र राजपूत यास न्यायालयाने येत्या 3 जुलैपर्यंत 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

असा रचला कट 
संशयित जितेंद्र राजपूत हा मुझफ्फरनगर कारागृहात असताना मनिष रॉय, परमेंदर सिंग या अट्टल दरोड्यातील संशयिताशी ओळख झाली होती. त्याचठिकाणी अन्य संशयितांचीही ओळख झाल्यानंतर दरोड्याच्या तयारीचा कट रचण्यात आला. कारागृहातून बाहेर आल्यानंतर गेल्या फेब्रुवारी 2019 मध्ये सहा संशयित सुरतमध्ये एकत्र आले आणि त्यांच्यात महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, औरंगाबाद येथील मुथूट फायनान्सवर दरोड्याचा कट शिजला. या तीनही शहरातील मुथूट फायनान्स कार्यालयांची रेकीचीही जबाबदारी वाटून देण्यात आली. त्यानुसार नाशिकच्या रेकीची जबाबदारी संशयित सुभाष गौड याच्यावर होती. फेब्रुवारी ते गुन्हा घडेपर्यंत संशयित हे पाच ते सात वेळा नाशिकमध्ये येऊन गेले. तर, गेल्या मेच्या शेवटच्या आठवड्यापासून संशयित हे श्रमिकनगर, सातपूर येथे संशयित गौड व संशयित पप्पू उर्फ अनुज साहू याच्या बहिणीच्या घरी आश्रयाला होते, हे तपासातून निष्पन्न झाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news muthoot daccati