मुथुट दरोड्याप्रकरणी सॅम्युअलचा खुनी परमेंदर सिंगला अटक,कुख्यात टोळींशी सबंध

live
live

नाशिक 25 : उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्स कार्यालयावरील दरोडा आणि सॅम्युअल हत्त्येच्या गुन्ह्याची उकल होऊ लागली आहे. या दरोड्‌याच्या कटाचे धागेदोरे कुख्यात गोल्ड फायनान्स कार्यालयांवर दरोडे टाकणाऱ्या सुबोध सिंह याच्यापर्यंत पोहोचले आहेत. या गुन्ह्यात आज दुसरा संशयित परमेंदर राजेंद्र सिंग यास कडोदरा (सुरत, गुजरात) येथून अटक करण्यात आली. परमेंदर यानेच सजू सॅम्युअल यांच्यावर तीन गोळ्या झाडून हत्त्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

  अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीमध्ये कौशल्याने तपास करणाऱ्या गुन्हेशाखेला पोलीस आयुक्‍तांनी 2 लाख 10 हजार रुपयांचा रिवॉर्ड जाहीर केला. पण या पथकाने ही रिवॉर्डची रक्कम घटनेत दरोडेखोरांशी दोन हात करतांना स्वत:च्या जीव गमवावा लागलेल्या सजू सॅम्युअल यांच्या कुंटूंबियांना देण्याचे जाहीर केले आहे. 
 
गेल्या 14 तारखेला उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर भरदिवसा सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास सहा संशयितांनी दरोड्याचा प्रयत्न केला. याच घटनेत दरोडेखोरांशी दोन हात करताना अभियंता सजू सॅम्युअल यांच्यावर पाच गोळ्या झाडून निर्घृण हत्त्या करण्यात आली होती. याप्रकरणी नाशिक शहर गुन्हेशाखेच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करीत घटनेच्या दहा दिवसांनंतर पहिला संशयित जितेंद्र विजय बहादूर सिंग राजपूत यास अटक केली होती. तर आज (ता.25) पहाटेच्या सुमारास गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने कडोदरा (सुरत, गुजरात) येथून कुख्यात दरोडेखोर परमेंदर राजेंद्र सिंग (मूळ रा. तिलसवा, पो. राजापूर, उत्तरप्रदेश) यास अटक करण्यात आली आहे. परमेंदर सिंग याचा प्रत्यक्ष दरोड्याच्या घटनेतील सहभाग निष्पन्‌ न झाला असून त्यानेच सजू सॅम्युअल यांच्यावर गावठी कट्ट्यातून तीन गोळ्या झाडल्याचीही कबुली दिली आहे. 
    ही कामगिरी पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, विशाल काठे, राहुल पालखेडे, प्रवीण चव्हाण, दीपक जठार, स्वप्निल जुंद्रे या पथकाने बजावली.  सायबर तांत्रिक विभागाकडूनही या पथकाला संशयित परमेंदरची हालचालींची माहिती मिळत होती. 

कुख्यात सुबोध सिंगचे कनेक्‍शन 
संशयित परमेंदर सिंग याच्यावर उत्तरप्रदेश, बिहार या राज्यांमध्ये दरोडा, प्राणघातक हल्ला यासारख्या गंभीर स्वरुपाचे सुमारे 15 गुन्हे दाखल आहेत. उत्तरप्रदेशातील कारागृहात असतानाच त्याची ओळख कुख्यात सुबोध सिंग याच्याशी झाली होती. देशभरात गोल्ड फायनान्स करणाऱ्या, त्यातही विशेष करून मणप्पुरम गोल्ड व मुथूट फायनान्स याच कंपन्यांच्या कार्यालयांची रेकी करून दरोडे टाकून सोने लुटून नेणारा अशी सुबोध सिंग यांची ओळख आहे. सध्या तो उत्तरप्रदेशातील कारागृहात असून परमेंदर सिंग आणि सुबोध सिंग याची ओळख झाली होती. मनिष राय या कुख्यात दरोडेखोराचाही यात संबंध असून यांच्यातील संभाषणाची तांत्रिक माहितीही पोलीस तपासात समोर येते आहे. सुबोध सिंग यानेच गोल्ड फायनान्सच्या कार्यालयावर दरोड्याच्या क्‍लृपत्या संशयितांना दिल्याचेही समोर येते आहे. नाशिकमधील मुथूट दरोड्याशीही सुबोध सिंग याचे कनेक्‍शन स्पष्ट झाले होते आहे. 

परमेंदरची माजी मंत्र्यांशी जवळीक 
परमेंदर सिंग हा एका शिक्षकाचा मुलगा असून त्याचे भाऊ सुरतमध्ये स्थायिक आहेत. तर परमेंदर सिंग हा उत्तर प्रदेशातील एका माजी बाहुबली मंत्र्याच्या बंगल्यावर चार ते पाच वर्षे कामाला होता असेही तपासातून समोर येते आहे. परमेंदर याच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल असून, क्षुल्लक कारणावरून गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडणे ही त्याची पद्धत आहे. कुख्यात सुबोध सिंग याचा हस्तक म्हणूनही त्याची ओळख आहे. नाशिक मुथूट फायनान्स दरोड्यात आत्तापर्यंतचा त्याचा सहभाग निष्पन्न झाला असला तरी अद्याप त्या माजी बाहुबली मंत्र्यांचे काही कनेक्‍शन आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. सदरचा दरोडा यशस्वी झाला असता तर, परमेंदर सिंग यास मुख्य सूत्रधार जितेंद्र सिंग याने 1 कोटी रुपये देण्याचे कबुल केले होते. 

दरोड्यासाठी 11 संशयितांची टोळी कार्यरत 
मुथूट फायनान्स दरोड्यासाठी सहा संशयित हे प्रत्यक्ष दरोड्यात सहभागी होते तर पाच संशयित हे त्यांना बाहेरून पाठपुरावा करणारे असल्याचे पोलीस तपासातून समोरे येते आहे. परमेंदर याने चौकशीतून पोलिसांना महत्त्वाची माहिती दिलेली आहे. आत्तापर्यंत जितेंद्र सिंग, आकाश सिंग, परमेंदर, अनुज साहू, सुभाष गौड, गुरु या सहा जणांचा सहभाग होता. त्यात कुख्यात सुबोध सिंग, मनिष राय, उमेश तिवारी, राहुल, मांझी यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. 
 

अत्यंत बारकाईने केली रेकी 
संशयित मनिष रायच्या माध्यमातून आकाश सिंग याच्याशी ओळख झाल्यानंतर परमेंदर यास जितेंद्र सिंग याने 28 मे रोजी फोन करून सुरतला बोलावून घेतले. 3 जून रोजी परमेंदर सुरत, कडोदरा येथे आला. त्याला नाशिक मुथूट फायनान्स दरोड्याचा कट सांगण्यात आला. 5 जून रोजी जितेंद्र सिंग याने त्यास 2 हजार रुपये देत, नाशिकला रवाना केले. सुभाष गौड याच्या श्रमिकनगर येथील घरी तो आश्रयाला आला. त्यापूर्वीच त्याठिकाणी संशयित अनूज साहू, राहुल हे संशयित आलेले होते. यावेळी परमेंदर याने स्वत:चे नाव गौरव असे संशयितांना सांगितले. 6 जून रोजी संशयित राहुल आणि अनूज साहू यांनी मुथूट फायनान्स कार्यालयाची पुन्हा रेकी केली. रस्त्यांची माहिती गुगल मॅपवरून करून घेतली. गुजरातच्या दिशेने जाण्यासाठीचे रस्त्यांची अत्यंत बारकाईने रेकी केली. ज्या रस्त्याने जायचे, त्या रस्त्यावर कोण-कोणत्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत हेदेखील त्यांनी पाहून घेतले. जेणेकरून दरोड्यानंतर पसार होताना, ज्या ठिकाणी सीसीटीव्ही आहे त्याठिकाणी दुचाक्‍यांवरील संशयितांनी आपले चेहरे लपविण्याचा प्रयत्न केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com