अखेर शिवसेनेने रघुवंशींना दिलेला शब्द पाळला !

धनराज माळी
Friday, 6 November 2020

राजकीय करिअरचा विचार करून चंद्रकांत रघुवंशी यांनी मागील वर्षभरापूर्वी झालेल्या विधान सभा निवडणुकीचा वेळेस कॉंग्रेसचा विधान परिषदेचा आमदारकीचा राजीनामा देऊन मातोश्री वर जाऊन शिवबंधन बांधले.

नंदुरबार ः वर्षभरापूर्वी कॉंग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यावर शिवसेनेचे प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेचा माध्यमातून आमदारकी बहाल करण्याचा शब्द दिला होता. तो आज राज्यपालांकडे नाव पाठवून खरा ठरविला आहे. त्यामुळे शिवसेनेने शब्द पाळला. त्यामुळे धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनाकार्यकर्ते व रघुवंशी समर्थकांमध्ये आनंदाची लहर आली आहे. 

आवश्य वाचा- मी शिवसेनेचा सोंगाड्या, खासदार पाटील यांना नाचविणार ! -

नंदुरबार जिल्हा हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ज्यांच्‍यामुळे ओळखला जात होता. त्या रघुवंशी कुटुंबाच्या दोन पिढ्या कॉंग्रेसमध्येच गेल्या. त्यामुळे कॉंग्रेस व रघुवंशी परिवार असे एक समीकरण बनले होते. त्यामुळे रघुवंशी कुटुंब कधीही कॉंग्रेस सोडणार नाही. अर्थात त्यांनी वेळोवेळी तसे जाहीर सभांमधून जाहीरही केले होते.(कै.) बटेसिंहदादा रघुवंशी यांनाही विधान परिषदेतून वेळोवेळी आमदारकी मिळाली. त्यानंतर कॉंग्रेसने धुळे-नदुरबार विधान परिषदेतून चंद्रकांत रघुवंशी यांना दोन वेळेस व राज्यपाल नियुक्त कोठ्यातून एकदा असे तीन वेळेस आमदारकी दिली होती. राजकीय संघर्ष, कॉंग्रेसकडून जिल्ह्याकडे झालेले दुर्लक्ष व आघाडीमुळे जिल्ह्यातील बिघडलेले राजकीय समीकरणे यामुळे चंद्रकांत रघुवंशी यांना जिल्ह्यातील राजकारणात संघर्षासोबतच तारेवरची कसरत करावी लागत होती.

त्यातच त्यांच्यावर झालेल्या एका शस्त्रक्रियेमुळे राजकारणात संघर्ष न करता त्यांनी मुलगा ॲड. राम रघुवंशी यांना राजकारणात पुढे केले. मात्र ते करत असताना ते कॉंग्रेसचे विधान परिषदेचे आमदार होते. पुढील राजकीय समीकरणांचा विचार केल्यास राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असेल, असा कयास सर्वांना होता. तसाच त्यांनी लावला. शिरपूरचे नेते अमरिशभाई पटेल यांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेचे उमेदवाराचे दावेदार श्री. पटेल होते. त्यामुळे पुढील राजकीय करिअरचा विचार करून चंद्रकांत रघुवंशी यांनी मागील वर्षभरापूर्वी झालेल्या विधान सभा निवडणुकीचा वेळेस कॉंग्रेसचा विधान परिषदेचा आमदारकीचा राजीनामा देऊन मातोश्री वर जाऊन शिवबंधन बांधले. शिवसेनेलाही एक तगे वर्चस्व असलेला नेता मिळणार असल्याने त्यावेळी श्री. रघुवंशी यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता. तेही न मागता देण्याची जाहीर ग्वाही धडगाव येथील प्रचार सभेत दिली होती. 

वाचा- आदीवासी विद्यार्थ्यांना आता ‘सीबीएसई’तून मिळणार शिक्षण ! -

मातोश्रीवरून बोलावणे 
कोरोनामुळे चंद्रकांत रघुवंशी बाहेर जाणे व फिरणे टाळत होते. मागील आठवड्यात ते रूटींग आरोग्य तपासणीसाठी मुंबई येथे जाऊन आले. त्यानंतर राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांचा नियुक्तीचा कामाला वेग आला. त्यावेळी मातोश्री वरून श्री. रघुवंशी यांना अर्जंट रात्रीतून मुंबईला बोलावणे आले. शिवसेनेचा चार जागांसाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा होती. मात्र श्री. रघुवंशी यांनी त्यांचा नावासाठी आग्रह धरला नाही. अखेर शिवसेनेतर्फे जे चार नावे राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आले. त्यात चंद्रकांत रघुवंशी यांचा नावाला प्राधान्यक्रम देण्यात आले आहे. त्यामुळे धुळे- नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते व रघुवंशी समर्थकांमध्ये आनंदाची लहर आली आहे. सर्वांकडून अखेर शिवसेनेने शब्द पाळल्याचा भावना व्यक्त केल्या जात आहेत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nanadurbar chandrakant raghuvanshi's name in the list of shiv sena for the Legislative council