esakal | झेंडूच्‍या फुलांनी खाल्ला भाव;उत्पादकांमध्ये आनंद !
sakal

बोलून बातमी शोधा

झेंडूच्‍या फुलांनी खाल्ला भाव;उत्पादकांमध्ये आनंद !

यंदा अतिवृष्टीमुळे अनेकांची फुलझाडे शेतात सडली. अनेकांना बाजारपेठ, ट्रान्सपोर्ट, मंदिरे व विवाह सोहळा, सत्कार समारंभ बंद असल्याने फुलशेतीवर नांगर फिरवावा लागला आहे.

झेंडूच्‍या फुलांनी खाल्ला भाव;उत्पादकांमध्ये आनंद !

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार  ः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना मागणी वाढली आहे. मात्र, बाजारपेठेत फुलांची अत्यल्प आवक झाली. गुरुवारी (ता. १२) झेंडूचे फुले ११५ रुपये किलो दराने विकले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचा चेहऱ्यावर आनंद फुलला होता. पुढील दोन दिवसांतही हा दर टिकून राहिल्यास फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची खरोखरच दिवाळी आनंदात जाणार आहे. 

वाचा- गहू, तांदुळ द्या अन्‌ घेवून जा हवे ते; दिवाळीमुळे मिळतोय फराळ
 

नंदुरबार शहरासह आष्टे, निजामपूर, नवापूर परिसरातील अनेक शेतकरी फुलशेती करतात. दसरा-दिवाळीत उत्पादन सुरू होईल या नियोजनाने झेंडूची लागवड करतात. यंदा अतिवृष्टीमुळे अनेकांची फुलझाडे शेतात सडली. अनेकांना बाजारपेठ, ट्रान्सपोर्ट, मंदिरे व विवाह सोहळा, सत्कार समारंभ बंद असल्याने फुलशेतीवर नांगर फिरवावा लागला आहे. त्यातही ज्यांचे थोडे फार क्षेत्र वाचले. त्यांनी दसरानिमित्त बाजारपेठेत फुले आणली. मात्र, झेंडूचा फुलांना कोणी विचारले नाही. १० ते २३ रुपये किलो फुले विकली गेली. नंतर अक्षरशः फुले फेकावे लागले होते. 

गुरुवारी वसूबारस या दिवशी फुलांना मागणी नव्हती. खरेतर धनत्रयोदशीला व लक्ष्मीपूजनाला झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते. गुरुवारी झेंडूचे फुले घेऊन काही शेतकरी भाजीपाला मार्केटमध्ये विक्रीसाठी आले होते. विक्रेत्यांनी ११५ रुपये किलो दराने ते खरेदी केले. चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा चेहऱ्यावर समाधान होते.