esakal | नंदुरबारच्या विकासाची संधी आणखी वाढणार !
sakal

बोलून बातमी शोधा

नंदुरबारच्या विकासाची संधी आणखी वाढणार !

धुळे- नंदुरबारसारख्या आदिवासी दुर्गम भागातील लोकप्रतिनिधींना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देऊन भाजपच्या नेत्यांनी एका अर्थाने नंदुरबार लोकसभा मतदार संघाला न्याय दिला. 

नंदुरबारच्या विकासाची संधी आणखी वाढणार !

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार: भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीत खासदार डॉ. हिना गावित यांच्याकडे प्रवक्तेपदाची जबाबदारी देत नंदुरबारसारख्या आदिवासी -दुर्गम भागातील लोकसभा मतदारसंघाला प्रतिनिधित्वाची संधी दिली. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे, म्हणजेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघाकडे एका अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष आहे. हे पुन्हा या माध्यमातून सिद्ध झाले आहे. या निवडीने नंदुरबार जिल्ह्याचे वजन दिल्ली दरबारी वाढले आहे. 
  

आवश्य वाचा- रहस्‍यमय..जंगलातील धबधब्‍यावर गेले; युवक अचानक झाला गायब

पहिल्यांदाच निवडणूक लढवीत सतत दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीतही मताधिक्याने विजयी होत खासदार डॉ. हीना गावित यांनी दिल्ली दरबारी जिल्ह्याचे वर्चस्व अबाधित ठेवले. एवढेच नव्हे, तर तरूण खासदारांमध्ये अभ्यासू व विविध प्रश्न मांडून संसद रत्न पुरस्काराने सतत दोनदा जिल्ह्याचे नाव दिल्लीच्या तख्तावर झळकविले. कमी वयात राजकीय संघटनकौशल्य, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याची तळमळ साऱ्या देशाने त्यांचा संसदेतील भाषणातून पाहिली आहे. त्याची दखल घेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा त्यांना केवळ नंदुरबार लोकसभा मतदारसंघापुरतेच मर्यादित न ठेवता त्यांचा कौशल्याचा पक्षाचा संघटनासाठी उपयोग करून घेण्यासाठी खासदार गावित यांची थेट राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. ही निवड त्यांचा कार्यकर्त्यांसाठी नक्कीच आनंदाची घटना आहे. धुळे- नंदुरबारसारख्या आदिवासी दुर्गम भागातील लोकप्रतिनिधींना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देऊन भाजपच्या नेत्यांनी एका अर्थाने नंदुरबार लोकसभा मतदार संघाला न्याय दिला. 

राष्ट्रीयस्तरावर आवाज गुंजणार 
खासदार डॉ. हीना गावित यांची राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून निवड केल्यामुळे त्या आता नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदारच नव्हे तर भाजपच्या संघटनेसाठी देशातील वेगवेगळ्या राज्यात, प्रांतात जाऊन काम करावे लागणार आहे. त्यामुळे त्या आता राष्ट्रीयस्तरावरील भाजपच्या नेत्या झाल्या आहेत. विविध राज्यात जाऊन पक्षाची भूमिका मांडावी लागणार आहे. त्यामुळे या आदिवासी जिल्ह्यातील ही कन्या आता महाराष्ट्राचा आवाज म्हणून पक्ष संघटनाचे कार्य करणार आहे. 

वाचा- नंदुरबार जिल्हा : अतिवृष्टीने १५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
 

अशी झाली राजकीय कारकीर्द 
माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. त्यावेळी डॉ. हीना गावित या २०१२-१३ मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून नुकत्याच बाहेर पडल्या. त्यांच्याकडे डॉ. विजयकुमार गावित यांचे वारसदार म्हणूनच पाहिले जात होते. त्याच काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉ. हीना गावित यांच्यातील कौशल्य हेरले. खासदार सुळे यांनी हिना गावित यांच्यावर राष्ट्रवादी युवती आघाडीची जबाबदारी सोपविली. अल्पकाळातच डॉ. हीना गावित यांनी युवतींचे संघटन करून दाखविले. पक्षाचे ग्रामीण स्तरापर्यंत संघटन पोहोचविले. महिलांचे प्रश्न सोडविले. त्यानंतर भाजपने त्यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली. आगामी (२०१४-१५) लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची संधी मिळू शकते म्हणून त्यांनी भाजप प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने भाजपला नंदुरबार जिल्ह्यात चांगला उमेदवार मिळाला. खासदारकीसोबतच जिल्ह्यातील भाजप संघटनाची जबाबदारी त्यांच्‍यावर सोपविली. संसदेत नंदुरबार लोकसभेचे अनेक प्रश्न हिरिरीने मांडले. परदेशातील अभ्यास दौऱ्यांमध्ये संधी मिळाली. त्यांना दोनवेळा संसद रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे