कोरोनामूळे दसऱ्याला होणारी काठी संस्थानची अश्‍व स्पर्धा झाली रद्द 

धनराज माळी
Monday, 26 October 2020

घोड्यांची शर्यत पाहण्यासाठी दुपारी चारपासून गर्दी जमलेली होती. पोलिसांनी घोड्यांची शर्यत नसल्याचे आवाहन केल्यानंतर लोक आपापल्या घराकडे परतले. 

सिसा ः काठी (ता. अक्कलकुवा) येथील संस्थानातर्फे विजया दशमीला घोड्यांची शर्यत लावली जाते. हजारो लोकांच्या उपस्थितीत ही स्पर्धा होती. या स्पर्धेत ऐतिहासिक महत्त्व आहे. दऱ्या-खोऱ्यातून अनेक नागरिक जातिवंत घोडे घेऊन या स्पर्धेत सहभागी होतात. मात्र कोरोनामुळे शासन-प्रशासनाच्या आदेशाचे पालन करीत यंदा ही स्पर्धा रद्द करण्यात आली. मात्र स्पर्धा रद्द झाल्याचा निरोप दऱ्या खोऱ्यातील स्पर्धकांपर्यंत न पोहोचल्याने अनेकांनी काल हजेरी लावली. अनेक नागरिकांनाही परत जावे लागले. दरम्यान, साध्या पद्धतीने पूजन करण्यात आले. 

राजवाडी दसरानिमित्त दिवसभर संस्थानिकांचे वारसदार पूजा विधी करतात. त्यानंतर सातपुड्याचा दऱ्या-कपाऱ्यातून सायंकाळी हजारो नागरिक व महिला मोलगी -धडगाव रस्त्यावर डोंगरावर जमतात. त्या रस्त्यावर अश्‍व स्पर्धा होते. विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येते. यावर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा रद्द झाली. 

यांनी केली पूजा- विधी 
काठी संस्थानचे राजवंशज असलेले पृथ्वीसिंग उदेसिंग पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत दसऱ्याची पूजा करून सर्व विधी पार पाडण्यात आली. घोड्याची शर्यत रद्द झाली असली तरीही घोड्याची पूजा करून घेण्यासाठी मात्र मोठ्या संख्येने घोडेस्वार येथे दाखल झाले होते. तसेच नागरिकांनीही गर्दी केली होती. यावेळी नवय खुट, नवय पूजन, अश्‍व पूजन करण्यात आले. दरम्यान, घोड्यांची शर्यत पाहण्यासाठी दुपारी चारपासून गर्दी जमलेली होती. पोलिसांनी घोड्यांची शर्यत नसल्याचे आवाहन केल्यानंतर लोक आपापल्या घराकडे परतले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nanadurbar outbreak of corona dussehra kathi institution Horse racing canceled