नंदूरबार जिल्ह्यातील ग्रामीण यंत्रणा सलाईनवर; रूग्णवाहिका झाल्या खिळखिळ्या! 

धनराज माळी
Wednesday, 9 September 2020

सहा वर्षे बी. व्ही. जी. कंपनी ही सेवा पुरवित आहे. त्यासाटी दोन शिप्टमध्ये पायलट (चालक) कॉन्ट्रक्ट पध्दतीने भरले आहेत. साधारणतः ३२ कमर्चारी आहेत.

नंदुरबार  ः जिल्ह्याच्या दुर्गम, ग्रामीण भागात आरोग्य सेवेत रूग्णवाहिकांचा महत्वाचा वाटा असतो. मात्र वेळेवर रूग्णाला रूग्णालयात पोहोचविणाऱ्या या रूग्णवाहिकाच खिळखिळ्या झाल्या आहेत. जिल्ह्यात अटलवाहिनीच्या १३ व १०८ च्या १४ अशा २७ रूग्णवाहिका रात्रंदिवस जिल्ह्यातील रस्त्यांवर धावताहेत. बिघाड झालेल्या रूग्णवाहिकेचा दुरूस्तीला आठ दिवसापेक्षा जास्त दिवस लागणार असेल तर त्या रूग्णवाहिकेवरील पायलटला वेतनही दिले जात नसल्याचा तक्रारी आहेत. 

नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था भयानक आहे. काही टिकाणी तर रूग्णवाहिकाही पोहचू शकत नाहीत. अशा स्थितीत बी.व्ही.जी. कंपनीतर्फे जिल्ह्यात अटलवाहिनी व १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिका रात्रंदिवस रूग्ण सेवेसाठी धावत आहेत. साधारण सहा वर्षे बी. व्ही. जी. कंपनी ही सेवा पुरवित आहे. त्यासाटी दोन शिप्टमध्ये पायलट (चालक) कॉन्ट्रक्ट पध्दतीने भरले आहेत. साधारणतः ३२ कमर्चारी आहेत, मात्र पायलटांवरही कंपनीच्या काही नियमांमुळे संकट आले आहे. 
 

रूग्णवाहिका दुरूस्तीला विलंब 
जिल्ह्यात आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे, त्यातच रूग्णवाहिका हा महत्वाचा घटकच कमजोर होत असेल तर त्यापेक्षा दुर्दैव काय म्हणावे? अनेक रूग्णवाहिका कुठेही बंद पडतात. तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. कंपनीतर्फे त्यांचा मेकॅनिक दुरूस्तीसाठी तत्पर राहतो. मात्र अनेकदा सुट्या भागांची अडचण येते. 
 

दुरूस्तीमुळे पायलट बेदखल 
एखादी रूग्णवाहिका दुरूस्तीसाठी उशिर लागणार असेल तर त्या रूग्णवाहिकावरील चालकास दुसरीकडे सेवेत ॲडजस्ट केले जाते. जर तशी जागा नसली तर त्या पायलटला घरी थांबावे लागते. आठ दिवसापेक्षा जास्त दिवस दुरूस्तीला लागत असतील तर कंपनीकडून त्या काळात पायलटला कोणताही मोबदला दिला जात नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. 

 
चालकाला घरी जाण्याचे आदेश 
दहा दिवसापासून एका रूग्णवाहिकेमध्ये इंजिनचा बिघाड झाला आहे. तरीही पायलट दररोज कंपनीच्या कार्यालयात येतात. वाहन दुरूस्त करण्याऐवजी त्याचे काही सुटे भाग इतर वाहनांच्या दुरूस्तीसाठी वापरले जात आहेत. संबधित पायलटला मात्र वाहन दुरूस्त होईपर्यत कामावर येऊ नका, कोणताही मोबदला व पगार मिळणार नाही, अन्यथा इतर तालुक्यात सेवेवर रूजू व्हा असे तोंडी आदेश कंपनीचे अधिकारींनी दिल्याचे संबंधित पायलटने सांगितले. दरम्यान, कंपनीचे अधिकारी मालविया यांच्या म्हणण्यानुसार असा कोणताही प्रकार झालेला नाही असे सांगितले. 

सहा-सात वर्षे झाल्याने व जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था बिकट असल्याने अनेक रूग्णवाहिकांचे इंजिन कामावर आले आहेत. तरीही तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न करीत असतो. आठ दिवसापेक्षा जास्त दिवस वाहन दुरूस्तीला लागत असेल तर त्या रूग्णवाहिकेच्या पायलटचा पगार दिला जात नाही, हा कंपनीचा नियम आहे. 
- कांचन बिडवे, विभाग प्रमुख बी.व्ही.जी कंपनी, नगर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Ambulance for transporting patients from remote areas of Nandurbar district is out of order